यंदाच्या सार्वजनिक गणेशोत्सव तसेच नवरात्रोत्सवासाठी मंडप, स्टेज, कमानी परवानगी आणि अग्निशमन विभागाचा परवाना शुल्क पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. या खूशखबरीमुळे महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
पोलीस उपायुक्त आणि पालिकेच्या वतीने नुकतीच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची बैठक येथील अत्रे मंदिरात आयोजित केली होती. यावेळी गणेश मंडळांनी रस्त्यांवरील खड्डे आणि सांडपाण्यांच्या मुद्यावर नाराजी व्यक्त केली होती. शिवाय मंडप, स्टेज, कमानी उभारणीसाठी लागणारी वाहतूक शाखेची ‘ना हरकत प्रमाणपत्रे’, अग्निशमन, महावितरण मिळणाऱ्या परवानग्या तातडीने देण्याची मागणी केली होती. यावर ‘एक खिडकी योजना’ अंतर्गत ऑनलाइन प्रणालीचा अवलंब करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त अभिनव गोयल यांनी दिली होती. या पार्श्वभूमीवर मंडप, स्टेज, कमानी परवानगी तसेच अग्निशमन विभागाच्या परवानगीचे शुल्क आकारले जाणार नाही, असे पालिकेने स्पष्ट केले आहे. या निर्णयामुळे मंडळांनी पालिकेचे आभार मानले.
६०० मंडळांना फायदा
केडीएमसीने मंडप, स्टेज परवानगीसाठी शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतल्यामुळे ६०० मंडळांना फायदा होत आहे. प्रत्येक मंडळाला यापूर्वी परवानगी शुल्कापोटी कमीत कमी चार ते पाच हजार रुपये मोजावे लागत होते. आता मात्र शुल्क माफ केल्यामुळे दिलासा मिळाल्याची माहिती कल्याण पश्चिम येथील तेली गणेशोत्सव मंडळाचे खजिनदार पराग तेली यांनी दिली.