US Tariff On India : भारताच्या बाजूने बोलले म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या जुन्या सहकाऱ्यावर असा काढला राग
Tv9 Marathi August 23, 2025 05:45 PM

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर FBI ने छापेमारीची कारवाई केली आहे. भारतासोबतचे अमेरिकेचे बिघडलेले संबंध आणि दंडात्मक टॅरिफ लावण्याच्या ट्रम्प यांच्या निर्णयांवर जॉन बोल्टन यांनी टीका केली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी जॉन बोल्टन यांच्या घरावर FBI कडून छापेमारीची कारवाई झाली. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव असलेले जॉन बोल्टन आता ट्रम्प यांचे कडवे टीकाकार आहेत. AP च्या रिपोर्टनुसार गोपनीय कागदपत्रांच्या तपासासंदर्भात ही छापेमारीची कारवाई केली.

ट्रम्प यांचे माजी सुरक्षा सल्लागार राहिलेल्या जॉन बोल्टन यांना ताब्यात घेतलेलं नाही तसच त्यांच्यावर कुठलाही आरोप लावलेला नाही. डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने अजूनपर्यंत कुठलही अधिकृत स्टेटमेंट जारी केलेलं नाही. पण FBI चे संचालक काश पटेल यांनी एक क्रिप्टिक म्हणजेच उपरोधिक पोस्ट केलीय. ‘कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही, FBI एजेंट्स मिशनवर आहेत’ असं छापेमारीनंतर काही वेळाने काश पटेल यांनी टि्वट केलेलं.

‘सणकी राष्ट्रपती’ म्हटलं

या प्रकरणात छापेमारीचा टायमिंग खूप महत्वाचा आहे. बोल्टन यांनी एक मुलाखत दिली. त्यात त्यांनी ट्रम्प यांना ‘सणकी राष्ट्रपती’ ठरवून त्यांच्यावर कठोर शब्दात टीका केली होती. अमेरिका-भारत संबंध सध्या खूप वाईट स्थितीमध्ये आहेत, असं सुद्धा बोल्टन म्हणाले.

फक्त भारताला टार्गेट केलय

“वास्तव असं आहे की, रशियावर कुठलेही नवीन निर्बंध लावले नाहीत. चीनवर सुद्धा कुठले प्रतिबंध नाहीयत. चीनच रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करतो. फक्त भारताला टार्गेट करण्यात आलय” असं बोल्टन त्या इंटरव्यूमध्ये म्हणाले.

व्हाइट हाऊसचा अजब तर्क

ट्रम्प यांनी आधीच भारतावर 25 टक्के टॅरिफ लावला होता. आता रशियाकडून तेल खरेदी सुरु असल्यामुळे ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ आकारला आहे. भारताच्या तेल खरेदीमुळे रशियाला युक्रेन विरोधात युद्ध सुरु ठेवण्यासाठी बळ मिळतं असा व्हाइट हाऊसचा अजब तर्क आहे.

बोल्टन यांचं विश्लेषण अमेरिकेसाठी चपराक

ट्रम्प सत्तेवर येण्याआधीची अमेरिकी सरकारं आशिया खंडात चीनचा प्रभाव संतुलित करण्यासाठी भारतासोबत मजबूत संबंध बनवण्याचा प्रयत्न करायची. बोल्टन यांचं म्हणणं आहे की, ‘ट्रम्प यांच्या टॅरिफ धमक्यांमुळे भारत चीन आणि रशियाच्या अधिक जवळ जाईल’ “भारताला एकट्याला टाकून दंडात्मक कारवाई करण्यातून अमेरिकेने भारताची साथ सोडलीय असा संदेश जातो. मला भिती आहे की, भारत यामुळे रशिया, चीनच्या बाजूला अजून झुकेल” असं बोल्टन म्हणाले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.