झोपताना फोन तुमच्यापासून इतक्या अंतरावर असावा, अन्यथा आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक
Tv9 Marathi August 24, 2025 02:45 AM

आजच्या डिजिटल युगात प्रत्येकजण स्मार्टफोन वापरत आहे. त्यातच आपण पाहतोच की आजकाल लहान मुलं सुद्धा मोबाईल फोनचा वापर अधिक करत आहे. कारण मोबाईल फोन आपल्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. सध्याच्या युगात जवळपास सर्वच कामं ही मोबाईलच्या माध्यमातून करणे सोपे झाले आहे. त्यामुळे लोकं दैनंदिन जीवनात सुद्धा फोनचा अधिक वापर करू लागले आहेत. सकाळी उठल्यावर पहिले आपण आपला फोन पाहतो आणि दिवसाची सुरूवात करतो, त्यानंतर रात्री झोपेपर्यंत फोनचा वापर करत राहतो. त्यातच आजच्या तरूण पिढीचा मात्र दिवसाचा बराचसा वेळ हा मोबाईल स्क्रोल करण्यात जातो. अशातच रात्री झोपताना बरेचजण फोन चार्जिंगला लावून ठेवतात किंवा उशीखाली ठेवून झोपतात. पण फोन उशी खाली किंवा बाजुला ठेऊन झोपणे तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.

कारण झोपताना फोन उशीखाली ठेवणे तुमच्या शरीरासाठी आणि मेंदूसाठी हानिकारक ठरू शकते. मोबाईलमधून निघणारा निळा प्रकाश आपल्या शरीरात तयार होणाऱ्या मेलाटोनिन हार्मोनवर परिणाम करतो, जो झोप येण्यास मदत करतो.

परिणामी तुम्हाला शांत आणि गाढ झोप लागत नाही. किंवा झोप येण्यास जास्त वेळ लागतो आणि झोपेची गुणवत्ता देखील खराब होते. हळूहळू या सवयीमुळे निद्रानाश, थकवा आणि नैराश्य देखील येऊ शकते.

याशिवाय फोनमधून सतत निघणाऱ्या रेडिओ फ्रिक्वेन्सी (RF) रेडिएशनचाही आपल्या शरीरावर परिणाम होतो. मोबाईलच्या संपर्कात जास्त वेळ राहिल्याने मेंदू आणि हार्मोनल सिस्टमवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. तज्ञांच्या मते फोनचे रेडिएशन आणि चार्जिंग दरम्यान निर्माण होणारी उष्णता आपल्या शरीराला नुकसान पोहोचवू शकते.

झोपताना मोबाईल फोनवर सतत येणारे नोटिफिकेशन किंवा मेसेजमुळेही झोपेत अडथळा येऊ शकतो. झोपेत व्यत्यय आल्याने संपूर्ण दिवस थकवा आणि चिडचिडे होऊ शकते.

म्हणूनच तज्ञांचा असा सल्ला आहे की रात्री झोपताना तुमचा मोबाईल फोन जवळ ठेवू नका. तो किमान 3 ते 4 फूट म्हणजेच सुमारे 1 मीटर अंतरावर ठेवावा. यामुळे तुम्हाला रेडिएशन किंवा निळ्या प्रकाशाचा सामना करावा लागणार नाही आणि तुमची झोपही पूर्ण होईल आणि आरोग्यही चांगले राहील.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.