Mohol Ganeshotsav : नो डिजे नो डॉल्बी, मोहोळ पोलीसांचा संकल्प; 'दैनिक सकाळ'च्या डॉल्बी मुक्त सोलापूरसाठी मोहोळ पोलिसांचे पाठबळ
esakal August 24, 2025 02:45 AM

मोहोळ - आगामी काळात येऊ घातलेला गणेशोत्सव 'नो डीजे नो डॉल्बी' संकल्पनेतून साजरा करू. डॉल्बीमुळे अनेकांना शारीरिक आजार झाले आहेत, तर अनेकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे डॉल्बीमुक्त गणेशोत्सव ही संकल्पना सर्वांनी राबवावी. आम्ही डॉल्बी धारकांना त्यांची बैठक घेऊन डॉल्बी न लावण्या बाबत समज देणार आहोतच.

तरीही त्याला नाही समजले तर आमच्या पोलीसी भाषेत त्याला सांगू. ज्या मंडळांनी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी डॉल्बी साठी ऍडव्हान्स दिले आहेत त्यांनी ते रद्द करावेत. गणेशोत्सवासाठी 'दैनिक सकाळ व ज्येष्ठ नागरिक संघटना सोलापूर' यांनी डीजे मुक्तीसाठी जी चळवळ चालविली आहे, त्याला आमचा पूर्ण पाठिंबा असल्याचे प्रतिपादन मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी केले.

मोहोळ पोलीस ठाण्याच्या वतीने येत्या गणेशोत्सव व ईद ई-मिलाद या सणांच्या पार्श्वभूमीवर तालुक्याची शांतता कमिटीची बैठक आयोजित केली होती त्यावेळी पोलीस निरीक्षक शेडगे मार्गदर्शन करीत होते. यावेळी बोलावलेल्या बैठकी साठी नागरिकांनी, वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांनी, पोलीस पाटील, जेष्ठ नागरिक यांनी मोठी गर्दी केली होती.

नागरिकांनी ज्या ज्या सूचना केल्या आहेत त्याचे पालन करण्याचे आश्वासन पोलीस निरीक्षक शेडगे यांनी दिले. ते पुढे म्हणाले, गणेशोत्सवाच्या काळात व्यापारी, डॉक्टर व अन्य व्यवसायिकांना जबरदस्तीने वर्गणी मागण्याचे मोठे फॅड आहे. कोणी वर्गणी मागितली व नाही दिली तर त्याला धमकावण्याचे प्रकार होतात, त्यावेळी थेट माझ्याशी संपर्क करा असे आवाहन पोलीस निरीक्षक शेडगे यांनी बैठकीत केले.

प्रत्येक गणेशोत्सव मंडळासमोर जाऊन आवाजाचे "कंट्रोल सॅम्पल घेतले जाणार आहेत जो कोणी त्यात दोषी आढळेल त्याच्यावर थेट जिल्हा पातळीवर गुन्हे दाखल होणार आहेत. जी गणेशोत्सव मंडळे शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करतील त्यांना पोलीस ठाण्याच्या वतीने "उत्कृष्ट गणराया अवार्ड" देण्यात येणार आहेत. जी मंडळे डॉल्बी साठी हजारो रुपये खर्च करतात तीच रक्कम सामाजिक कार्यासाठी खर्च करावी. प्रत्येक मंडळांनी रक्तदान शिबिराचे ही आयोजन करावे. डीजे मुक्तची सुरुवात सोलापुरातून झाली आहे.

बैठकीसाठी आलेल्या मान्यवरांच्या प्रतिक्रिया पुढील प्रमाणे -

सुदाम वसेकर(सामाजीक कार्यकर्ते) -

नो डीजे नो डॉल्बी या संकल्पनेचे आम्ही स्वागत करतो. प्रत्येक मंडळाने स्वतःची आचारसंहिता तयार करावी. सणाचा निखळ आनंद घ्यावा.

संजय क्षीरसागर(नेते शरद पवार गट) -

सणा पुरतेच व मिरवणुका पुरतेच पोलिसांच्या सूचनेचे पालन होते. मात्र 365 दिवसां पैकी किमान 180 दिवस तरी जयंत्या, व पुण्यतिथी या साजरे होतात. त्यात डॉल्बी हा लावला जातोच. तसेच मंगल कार्यालयात ही डॉल्बी लावले जातात. मंगल कार्यालय मालकांची स्वतंत्र बैठक घेऊन त्यांना लेखी सूचना द्याव्यात.

हनुमंत कसबे (पश्चिम महाराष्ट्र उपाअध्यक्ष आरपीआय) -

डॉल्बी चालू करते कोण व बंद करते कोण हे पोलिसांनी शोधावे. जो नेता डॉल्बी संदर्भात फोन करतो त्याच्यावर अगोदर कारवाई करून त्याला जेलमध्ये टाका. व त्याच्या कडून ऑफी डेव्हिड करून घ्या, जेणेकरून डॉल्बीवर बंधन येईल.

डॉ. स्मिता पाटील -

जयंती पुण्यतिथी डीजे मुक्त होणे गरजेचे आहे महापुरुषांचे चरित्र वाचून त्या साजऱ्या कराव्यात चीनमध्ये रोबोट सर्व कामे करतो पण आपण जयंती पुण्यतिथी साजऱ्या करण्यातच धन्यता मानतो हे बंद झाले पाहिजे प्रत्येकाने आत्मपरीक्षण करावे आपण प्रत्येक जण धर्मात विखुरलो आहोत सार्वजनिक उत्सव हा ज्ञानाचा उत्सव व्हावा यात सर्वांचेच हित आहे.

डॉक्टर प्रमोद पाटील -

जातीय सलोखा राखावा डीजेमुळे रक्तदाब वाढतो तसेच मेंदूत रक्तस्त्राव ही होतो कळते पण वळत नाही अशी आपली अवस्था आहे आमच्या रुग्णालयासमोरून अनेक मिरवणुका ह्या डॉल्बीच्या तालावर जातात. मात्र, आम्ही आमच्या रुग्णालयात ज्या माता-भगिनी प्रसूत झाल्या आहेत त्यांना त्यांची लहान बाळे छातीशी घट्ट धरावयास लावतो. जेणेकरून त्याला त्रास होऊ नये यात पुढार्यांनी भाग घेऊ नये, त्यांनी पोलीस प्रशासनास डीजे सुरू राहू द्या, म्हणून फोन करू नयेत. एखाद्याने फोन केलाच तर त्याचे रेकॉर्डिंग वायरल करावे.

नितीन आवारे -

पेनुर ग्रामीण भागातील अनेक गणेश मंडळे जबरदस्तीने वर्गणी मागतात. अन्यथा दमबाजी केली जाते. एका गावात एकाच गणेश मंडळाला परवानगी द्यावी.

व्ही. आर. देशमुख (सहाय्यक गटविकास अधिकारी) -

डॉल्बीमुक्त गणेशोत्सवा बरोबरच सोशल मीडियावर ही लक्ष राहणे गरजेचे आहे. कारण सोशल मीडिया म्हणजे दुधारी तलवार आहे. त्यामुळे अनेक वेळा शांतता भंग होण्याचा प्रकार होतो. डीजेला लाखो रुपये सुपारी देता त्याच पैशात सामाजिक उपक्रम राबवा, स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना मदत करावी. यावेळी नजीक पिंपरी या गावात गेल्या अनेक वर्षापासून डीजे लावला जात नाही. त्यासाठी नजीक पिंपरी हेगाव डीजे मुक्त झाल्याची माहिती नजीक पिंपरीचे पोलीस पाटील तात्या पाटील यांनी दिली.

प्रा. चंद्रकांत देवकते -

डीजे व लेझर लाईटच्या विरोधात सोलापूर शहरात सुरुवात झाली आहे. त्याचे सर्वांनी पालन करावे. पोलिसांची भूमिका निपक्षपाती असावी. बी. एम. कांबळे- डीजे बंदीसाठी तालुकास्तरीय एक समिती गठीत करावी. त्या समितीने पोलीस ठाण्याला फोन केल्यानंतर तातडीने त्या मंडळावर कारवाई करावी.

यावेळी सामाजिक कार्यकर्त्या रशिदा शेख, माजी नगरसेवक प्रमोद डोके, भारत नाईक, खाशेराव पाटील, डॉ शैलेश झाडबुके यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी चेंबर ऑफ कॉमर्स मोहोळ शाखेने डॉल्बी विरोधात पोलीस निरीक्षक शेडगे यांना निवेदन दिले व आम्ही तुमच्या सोबत असल्याचे सांगितले.

या बैठकीला आमंत्रित करून ही डीजे मालकांची उपस्थिती अत्यंत कमी होती. ही बाब काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस निरीक्षक शेडगे यांच्या लक्षात आणून दिली, त्यावेळी त्यांनी त्यांची वेगळी बैठक आम्ही आमच्या पद्धतीने घेतो असे त्यांनी सांगितले.

यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी विजयकुमार देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय अतकरे, किरण पाटील, गोपनीय विभागाचे अंमलदार गजानन माळी, गोपाळ साखरे, सामाजिक कार्यकर्त्या यशोदा कांबळे व्यापारी भैय्या आंडगे, नाना डोके आदी सह शहरातील व्यापारी सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया -

डॉल्बी संबंधात कुठल्याही नेत्याचा आम्हाला फोन अध्याप तरी आला नाही. पोलिसांना फोन आला तर डीजे चालू ठेवला जातो हा जो नागरीकांचा गैरसमज आहे तो त्यांनी मनातुन काढून टाकावा.

- हेमंत शेडगे, पोलीस निरीक्षक मोहोळ.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.