Gaza City: 'गाझा सिटी'ला उपासमारीचा विळखा! पाच लाख जणांना धोका; सप्टेंबरअखेरपर्यंत समस्या तीव्र होणार
esakal August 24, 2025 02:45 AM

गाझा सिटी (गाझा पट्टी) : गाझा पट्टीतील सर्वांत मोठे शहर असलेल्या ‘गाझा सिटी’ला उपासमारीने ग्रासले आहे. युद्धग्रस्त भागात युद्धविराम अन् मानवतावादी मदतीवरील निर्बंध उठवले गेले नाहीत तर उपासमारीची तीव्रता येत्या काळात वाढेल.

गाझातील सुमारे पाच लाख नागरिकांची म्हणजे एकूण लोकसंख्येच्या जवळपास चतुर्थांश लोकसंख्येची सध्या अत्यंत गंभीर उपासमारी होत आहे. कुपोषणामुळे मृत्यूंचा मोठा धोका असल्याचा इशारा ‘इंटिग्रेटेड फूड सेक्युरिटी फेज क्लासिफिकेशन’ (आयपीसी) या जागतिक स्तरावर अन्नसंकटावर देखरेख करणाऱ्या संघटनेने दिला आहे.

लाखो पॅलेस्टिनींच्या ‘गाझा सिटी’त या समस्येने उग्र रूप धारण केले आहे. मात्र, पुढील महिना अखेरीस हा दुष्काळ दक्षिणेकडील दिर अल-बलाह व खान युनिस येथेही पसरू शकतो. या अहवालात इशारा देण्यात आला आहे, की सप्टेंबरच्या अखेरीस गाझातील एक तृतीयांश लोकसंख्येची भयावह उपासमारी होईल. मानवतावादी मदतीवर इस्रायलचे निर्बंध आणि त्याची लष्करी मोहिमेमुळे पॅलेस्टिनी नागरिकांत विशेषतः मुलांचे उपासमारीने हाल होत आहेत. या संदर्भात अनेक महिने इशारे दिल्यानंतर ‘आययपीसी’ने हा गंभीर निष्कर्ष काढला.

पश्चिम आशिया प्रथमच उपासमारीने ग्रस्त घोषित केल्याने, इस्राईलवर आंतरराष्ट्रीय दबाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. ७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासच्या हल्ल्यानंतर इस्राईलने सुरू केलेल्या युद्धामुळे या भागातील परिस्थिती बिकट झाली आहे. इस्राईलने लवकरच ‘गाझा सिटी’ आणि ‘हमास’च्या इतर बालेकिल्ल्यांवर कब्जा करण्याचा इशारा दिला आहे. ज्यामुळे उपासमारीचे संकट आणखी तीव्र होईल, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली. तब्बल २२ महिन्यांच्या युद्धानंतर संपूर्ण प्रदेश भुकेकंगाल झाला आहे. उपासमारीने भयावह स्तर गाठला आहे. ‘इंटरनॅशनल क्रायसिस ग्रुप’चे विश्लेषक ख्रिस न्यूटन यांनी सांगितले, की इस्राइलने गाझावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपासमारीला आपल्या मोहिमेचाच जणू भाग बनवले आहे. त्यामुळे मुले व प्रौढांचे टाळता येण्याजोगे मृत्यू वेगाने वाढत आहेत.

इस्राईलचा इन्कार

इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी गाझामध्ये उपासमार असल्याचे फेटाळले अन् त्याला ‘‘हमास’चा खोटा प्रचार’ संबोधले आहे. मात्र, गाझामध्ये उपाशी मुलांचे फोटो व उपासमारीमुळे झालेल्या मृत्यूंच्या बातम्या समोर आल्यानंतर इस्राईलने अधिक मदत पुरविण्याची घोषणा केली. तथापि, संयुक्त राष्ट्रसंघटना आणि गाझातील पॅलेस्टिनींचे म्हणणे आहे की आतापर्यंत जी मदत मिळत आहे ती खूपच तोकडी आहे. इस्रायली लष्करी संस्थेने ‘आयपीसी’चा ही अहवाल फेटाळला असून, त्याला ‘खोटा अन् पक्षपाती’ म्हटले आहे. त्यांनी दावा केला की मदत वाढविण्यासाठी अलीकडे अनेक पावले उचलली आहेत.

‘गाझा’ उद्ध्वस्त होऊ शकते

दिर अल बलाह, ता. २२ (पीटीआय) : इस्राईलच्या अटी हमासने स्वीकारल्या नाही तर गाझा शहर उद्ध्वस्त होऊ शकते, असा इशारा इस्राईलचे संरक्षणमंत्री इस्राईल काट्झ यांनी आज दिला. गाझा शहरावर लष्करी ताबा मिळविण्यासाठी इस्राईलची तयारी सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा इशारा दिला आहे.

गाझा शहर ताब्यात घेण्यास इस्राईलच्या संसदेने मंजुरी दिली असून पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनीही काल (ता. २१) या शहरावर जोरदार हल्ला करण्याचे आदेश लवकरच देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. गाझा पट्टीत जवळपास दोन वर्षांपासून सुरू असलेल्या हल्ल्यांमध्ये इस्राईलने राफा आणि बैत हानौन ही शहरे जमीनदोस्त केली आहेत. हमासने इस्राईलच्या अटी स्वीकारल्या नाहीत तर गाझा शहराचीही अशीच स्थिती करू, असा इशारा आज काट्झ यांनी दिला आहे. हमासचे अनेक दहशतवादी अद्यापही गाझा शहरात असल्याचा इस्राईलचा दावा आहे.

Western Railway News : पश्चिम रेल्वेची एसी लोकल सुसाट ; एका दिवसात दोन लाख प्रवाशांचा प्रवास

‘‘हमासच्या खूनी आणि बलात्कारी प्रमुखांसाठी नरकाचे दरवाजे लवकर उघडणार आहेत. त्यामुळे त्यांनी युद्ध थांबविण्यासाठी आमच्या अटी स्वीकाराव्यात. अन्यथा आम्ही गाझा शहराचा पूर्ण नाश करू. हमासने अपहृतांची सुटका करावी आणि शस्त्रत्याग करावा, अशा आमच्या अटी आहेत,’’ असे काट्झ यांनी सोशल मीडियावर म्हटले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.