Asia Cup 2025 : नेपाळचा एका पराभवामुळे पत्ता कट, आशिया कपसाठी निवड कशी होते?
Tv9 Marathi August 24, 2025 02:45 AM

आशिया कप 2025 स्पर्धेचं बिगूल वाजलं आहे. या स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. यूएईकडे या स्पर्धेचं यजमानपद आहे. अबुधाबी आणि दुबईतील क्रिकेट स्टेडियममध्येच या स्पर्धेतील सर्व सामने खेळवण्यात येणार आहेत. तसेच यंदा या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. एका गटात 4 यानुसार 2 गटात 8 संघांचा समावेश आहे. या 8 पैकी स्पर्धेसाठी 4 संघांची घोषणा करण्यात आली आहे. भारत, पाकिस्तान, ओमान आणि यूएई ए ग्रुपमध्ये आहेत. यूएई आणि ओमानने संघ जाहीर केलेला नाही. तर दुसऱ्या बाजूला हाँगकाँग आणि बांगलादेशने संघ जाहीर केलाय. तर इतर 4 संघ अजूनही वेट अँड वॉचच्या भूमिकेतच आहेत.

यंदा टी 20 फॉर्मेटने ही स्पर्धा होणार आहे. 9 ते 19 सप्टेंबर दरम्यान प्रत्येक संघ आपल्या गटातील 3 संघांविरुद्ध प्रत्येकी 1-1 सामना खेळणार आहे. त्यानंतर 20 ते 26 सप्टेंबर दरम्यान सुपर 4 चा थरार पाहायला मिळणार आहे. सुपर 4 मधून दोन्ही गटातील 2 अव्वल संघ अंतिम फेरीत पोहचतील. त्यानंतर 28 सप्टेंबरला महाविजेता निश्चित होईल. अशाप्रकारे ही बहुप्रतिक्षित स्पर्धा पार पडणार आहे. टीम इंडिया गतविजेता आहे. आशिया कप 2023 स्पर्धा वनडे फॉर्मेटने झाली होती. तेव्हा या स्पर्धेत रोहित नावाच्या खेळाडूंकडे 2 संघाचं नेतृत्व होतं. मात्र यंदा हे दोन्ही खेळाडू या स्पर्धेतही नाहीत. तसेच 1 टीमही यंदा नाही.

रोहित शर्मा याने 2023 साली भारताला आशिया कप जिंकून दिला होता. मात्र यंदा टी 20 फॉर्मेटने ही स्पर्धा होतेय. रोहित टी 20I मधून निवृत्त झालाय. त्यामुळे रोहित यंदा या स्पर्धेत नाही. तर दुसऱ्या बाजूला गेल्या स्पर्धेत रोहित पौडेल याच्याकडे नेपाळ क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी होती. मात्र यंदा नेपाळ टीम आशिया कप स्पर्धेत नाही. नेपाळ टीम यंदा या स्पर्धेत नसण्याचं कारण काय? आशिया कप स्पर्धेसाठी पात्र ठरण्याचे निकष काय असतात? हे या निमित्ताने सविस्तर जाणून घेऊयात.

नेपाळची उल्लेखनीय कामगिरी

रोहित शर्मा याच्या नेतृत्वात भारतीय संघाने 2024 साली टी 20 वर्ल्ड कप जिंकला होता. भारताने 2007 नंतर पहिल्यांदा आणि एकूण दुसऱ्यांदा टी 20 वर्ल्ड कपवर नाव कोरलं होतं. ही वर्ल्ड कप स्पर्धा नेपाळसाठी अविस्मरणीय ठरली होती. नेपाळची तेव्हा कोणत्याही आयसीसी स्पर्धेत सहभागी होण्याची पहिलीच वेळ ठरली होती. नेपाळला तेव्हा 4 पैकी एकही सामना जिंकता आला नाही. मात्र नेपाळने इतर संघांना चांगलंच झुंजवलं होतं.

नेपाळ पात्रता फेरीत अपयशी आणि संधी हुकली

दक्षिण आफ्रिकेला तुलनेत लिंबुटिंबु असलेल्या नेपाळ विरुद्ध फक्त 3 धावांनीच जिंकला आलं होतं. नेपाळने त्या सामन्यासह साऱ्या क्रिकेट विश्वाला त्यांची दखल घेण्यास भाग पाडलं होतं. क्रिकेट चाहत्यांना नेपाळकडून त्यानंतर यापेक्षा सरस कामगिरीची अपेक्षा होती. तसेच नेपाळला टी 20i वर्ल्ड कपनंतर यूएईत होत असलेल्या आशिया कप स्पर्धेत सहभागी होण्याची संधी होती. नेपाळला त्यासाठी आशिया कप पात्रता फेरीत जिंकणं अनिर्वाय होतं. मात्र नेपाळ टीम अपयशी ठरली. त्यामुळे आशिया कप स्पर्धेत सहभागी होण्यासाठी काय निकष असतात? हे समजून घेऊयात.

बदललेल्या नियमांचा फायदा आणि 2 संघांची एन्ट्री

आशिया कप स्पर्धेत याआधी एकूण 6 संघ सहभागी व्हायचे. मात्र यंदा स्पर्धेआधी काही बदल करण्यात आले. त्यामुळे 6 ऐवजी 8 संघात चुरस पाहायला मिळणार आहे. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान हे आयसीसी पूर्ण वेळ सदस्य संघ आहेत. त्यामुळे या 5 संघांची आशिया कप स्पर्धेसाठी थेट निवड केली जाते. तर सहावा संघ एसीसी प्रीमियर कप स्पर्धेतून निश्चित व्हायचा. मात्र यंदा त्यात बदल केला गेला. एसीसी 2024 स्पर्धेतील विजेता, उपविजेता आणि तिसऱ्या स्थानी असलेला संघही या स्पर्धेत खेळणार, असा निर्णय घेतला गेला.

आणि नेपाळचा पत्ता कट

एसीसी प्रीमियर कप 2024 स्पर्धेतील अंतिम सामन्यात यूएईने ओमानवर विजय मिळवला. ओमानला उपविजेता म्हणून समाधान मानावं लागलं. यूएई विजेता ठरला. अशाप्रकारे या दोन्ही संघांनी आशिया कप 2025 स्पर्धेत धडक दिली.

त्याआधी यूएईने नेपाळला पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला होता. तर ओमानने हाँगकाँगचा धुव्वा उडवत फायनलमध्ये एन्ट्री घेतली होती. त्यानंतर आशिया कप स्पर्धेसाठी तिसऱ्या स्थानासाठी नेपाळ आणि हाँगकाँगमध्ये चुरस होती. नेपाळ विरुद्ध हाँगकाँग यातील विजेता संघ आशिया कपसाठी पात्र ठरणार हे निश्चित होतं. मात्र नेपाळचा या सामन्यात पराभव झाला. नेपाळचं या पराभवासह सलग दुसऱ्यांदा आशिया कप स्पर्धेत खेळण्याचं स्वप्न भंगलं.

नेपाळची रँकिंग ओमान-हाँगकाँगपेक्षा सरस

नेपाळ आयसीसी टी 20i रँकिंगमध्ये ओमान-हाँगकाँगपेक्षा सरस असल्याचं आकड्यांवरुन सिद्ध होतं. नेपाळ या रँकिंगमध्ये 17 व्या स्थानी आहे. नेपाळच्या खात्यात 171 रेटिंग पॉइंट्स आहेत. ओमान आणि हाँगकाँग नेपाळच्या मागे आहेत. ओमान 19 व्या तर हाँगकाँग 23 व्या स्थानी आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.