जाधववाडी, ता. २३ ः कुदळवाडी परिसरातील मुख्य व उप रस्त्यांवर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांचे हाल होत आहेत. सतत अपघातांच्या घटना घडत आहेत. विशेषतः दुचाकीस्वारांचे तोल जाऊन किरकोळ ते गंभीर दुखापती होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून येत आहेत. सकाळ - संध्याकाळच्या गर्दीच्यावेळी खड्ड्यांमुळे वाहतुकीत मोठी कोंडी निर्माण होते.
कुदळवाडी हे छोटे औद्योगिक व निवासी क्षेत्र आहे. तेथून दररोज शेकडो नागरिक पुणे, चाकण, हिंजवडी, पिंपरी-चिंचवड व इतर भागांत प्रवास करतात. मात्र, रस्त्यांची वाईट अवस्था नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. कामगार, नोकरदार, शाळकरी मुले व रुग्णवाहिकांसाठी हा रस्ता मोठा अडथळा बनला आहे. खड्डे टाळण्यासाठी वाहन चालकांना अचानक वळावे लागते. त्यामुळे दुचाकीस्वार घसरून अपघात होतात. पावसाचे पाणी खड्ड्यात साचल्याने खड्डा किती खोलवर आहे ? हे समजत नाही, त्यामुळे धोका अधिकच वाढतो. गेल्या काही दिवसांत या रस्त्यावर दुचाकी घसरून पडल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यात काहींना गंभीर दुखापत झाली असून रुग्णालयात उपचार घ्यावे लागले आहेत.
सुरुवातीपासून दुरवस्था
पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच कुदळवाडी परिसरातील रस्त्यांची अवस्था अधिकच बिकट झाली आहे. कुदळवाडी ते जाधववाडी रस्त्याची तर अवस्था अत्यंत विदारक झाली आहे. या रस्त्याला लागूनच केंद्रीय शाळा आहे. त्या ठिकाणी जवळपास एक ते दीड मीटर लांबीचा मोठा खड्डा पडला आहे. त्यामुळे, विद्यार्थ्यांना अपघात झाल्यास जबाबदार कोण ? असा प्रश्न पालकांना पडत आहे. सर्व रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून दर्जेदार रस्ते तयार करण्यात यावेत, अशी मागणी नागरिक करत आहेत. अपघात टाळण्यासाठी खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्याची गरज आहे. अन्यथा नागरिक तीव्र आंदोलनाचा इशारा देत आहेत.
पक्के रस्ते कधी ?
स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या स्थापत्य विभागाकडे अनेक वेळा निवेदने दिली. खड्डे बुजविण्यासाठी लेखी तक्रारी, अर्ज केले. तरी देखील पक्क्या स्वरुपात रस्ते दुरुस्तीचे काम हाती घेतले गेले नाही.
तात्पुरत्या स्वरूपात मुरूम टाकून खड्डे बुजविले जात असल्याने दोन दिवसांत पुन्हा खड्डे तयार होत आहेत, असा नागरिकांचा आरोप आहे.
रोशन यादव (स्थानिक वाहन चालक)
‘‘ या रस्त्यावरून प्रवास करताना रोज भीती वाटते. आमच्या भागांतील रस्त्यांवर लक्ष द्यावे म्हणून वारंवार तक्रारी करूनही प्रशासन जागे होत नाही. एखादा मोठा जीवघेणा अपघात घडल्यानंतरच दखल घेतली जाणार का ?
- रोशन यादव, वाहनचालक
रात्री खड्डे दिसत नसल्याने अनेकवेळा पादचारी पडले आहेत. अनेकदा वाहनचालकाला खड्ड्यांचा अंदाज न आल्याने महिलांच्या अंगावर रस्त्यावरील पाणी उडते. त्यामुळे महिला रस्त्यावरून चालताना घाबरतात.
- झेबुनिसा चौधरी, स्थानिक महिला
सुनीलदत्त नरोटे (अभियंता स्थापत्य क प्रभाग)
कुदळवाडी परिसरात रस्त्यांचे काम सध्या सुरू आहे. अनेक ठिकाणी खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले आहे.
काही खड्ड्यांचे काम राहिले असेल; तर त्वरित करून घेऊ.
- सुनीलदत्त नरोटे, अभियंता (स्थापत्य) ‘क’ प्रभाग
JDW25A00253