शैलेश नागवेकर - shailesh.nagvekar@esakal.com
निवड समिती कोणत्याही स्पर्धा मालिकेसाठी संघ निवडताना भविष्याचा विचार करत असते; पण तसे करत असताना विद्यमान स्थिती आणि खेळाडूंचा फॉर्म लक्षात घेणे गरजेचे असते. श्रेयस त्याचा अखेरचा ट्वेन्टी-२० सामना खेळला, त्यात त्याने अर्धशतक केले होते. आयपीएलमधील कामगिरी पाहता तो फॉर्ममध्ये नाही, असे म्हणता येणार नाही. त्यामुळे फॉर्म, गुणवत्ता आणि क्षमतेविषयी श्रेयस सरसच आहे. तरीही श्रेयस नकोसा का झाला, यावर चर्चा सुरू आहे.
‘‘यात चूक ना श्रेयस अय्यरची ना आमची, त्याचा समावेश करण्यासाठी कोणाला वगळायला हवे होते? श्रेयसने संधीची वाट पाहावी!’’ हे उद्गगार आहेत, निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांचे. अमिरातीमध्ये होणाऱ्या आशिया करंडक ट्वेन्टी-२० स्पर्धेसाठी संघ निवड झाली आणि त्यात गेल्या दोन आयपीएलमध्ये वेगवेगळ्या संघांना अंतिम फेरीत नेणारा कर्णधार श्रेयस अय्यरचा समावेश करण्यात आला नाही, त्यामुळे अर्थातच अनेकांना आश्चर्य वाटणे स्वाभाविक होते. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी कसोटीतून निवृत्ती स्वीकारल्यानंतर इंग्लंड दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या संघात आणि कसोटी मालिका सुरू होण्याअगोदर इंग्लंड दौऱ्यासाठीच निवडण्यात आलेल्या भारत अ संघातही श्रेयसला स्थान नव्हते. त्यामुळे सलग दुसऱ्या संघ निवडीत आणि वेगळा प्रकार असतानाही श्रेयसला स्थान मिळू नये, यावरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटणे अपेक्षित होते. दोष नाही कुणाचा, असा प्रश्न करत आगरकर यांनी आपल्या निर्णयाचे समर्थन केले. त्यांनी काहीही म्हटले तरी खरंच श्रेयसला संघात घ्यायचे नाही, याबाबतचे प्रश्न उपस्थित होतात.
आखूड टप्प्याचा चेंडू तो व्यवस्थित खेळू शकत नाही, असे श्रेयसबाबत वारंवार बोलले गेले. त्यामुळे इंग्लंडमधील कसोटी मालिकेसाठी त्याची निवड न होणे एकवेळ पटणारे आहे; पण त्याच्याऐवजी संधी मिळालेले करुण नायर आणि साई सुदर्शन यांना एकेका कसोटीनंतर वगळण्याची वेळ आलीच होती. असो, तो मूळ संघ निवडीनंतरचा प्रश्न होता; परंतु व्हाईटबॉल क्रिकेटमध्ये उसळते चेंडू व्यवस्थित न खेळण्याचा प्रश्न येत नाही. बरं श्रेयसने असे चेंडू खेळण्यासाठी बरीच मेहनत घेतली. स्टान्स बसलला आणि बॅटची दिशाही बदलली. त्यामुळे तो आयपीएलसह एकदिवसीय क्रिकेटमध्येही चांगल्या पद्धतीने फटकेबाजी करत आहे. म्हणूनच चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत त्याने महत्त्वपूर्ण योगदान दिले. चॅम्पियन्स करंडक जिंकल्यानंतरच्या पत्रकार परिषदेत बोलतान रोहित शर्माने श्रेयसचे कौतुक केले होते. काही सामन्यांत त्याने मोक्याच्या क्षणी केलेली फलंदाजी मोलाची ठरली होती, असे रोहित म्हणाला होता.
ना कसोटीत, ना ट्वेन्टी-२० प्रकारात, अशी श्रेयसची अवस्था झालीय. चॅम्पियन्स करंडक स्पर्धेसाठी संघात स्थान मिळाले हे त्याच्यासाठी सुदैवच म्हणायचे. रोहित शर्मा कर्णधार होता. तो श्रेयसच्या निवडीसाठी आग्रही होता म्हणून त्याची निवड झाली, असेही आता बोलले जात आहे. खरे तर श्रेयस व्हाईटबॉल प्रकारासाठी कर्णधारपदाची निश्चितच गुणवत्ता असलेला आहे. दोन वेगवेगळ्या संघांना सलग दोन वर्षांत आयपीएलची अंतिम फेरी गाठून देणे आणि त्यातील एकदा विजेतेपद मिळवणे सोपे नाही. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या प्लेऑफसाठी जसप्रीत बुमरा भन्नाट मारा करत असताना त्याचा एक यॉर्कर जे सर्वात घातक अस्त्र समजले जाते, तो यॉर्कर श्रेयसने उचलून चौकार मारला होता. त्या फटक्याचे सर्वांनी कौतुक केले होते. त्याअगोदर श्रेयसने आपल्या नेतृत्वपदी मुंबईला मुश्ताक अली राष्ट्रीय स्पर्धेत विजेतेपद मिळवून दिले. म्हणजेच राष्ट्रीय ते व्यावसायिक स्पर्धा अशी चमक त्याच्या नेतृत्वातून दिसून आली आहे.
आशिया करंडक सर्धेसाठी संघ निवड होताच माजी खेळाडू अश्विनने लगेचच तोफ डागली. श्रेयसवर अन्याय होत असल्याचे तो म्हणाला. श्रेयसने अजून काय करायला हवे म्हणजे त्याला संघात स्थान मिळेल, असे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर म्हणाले. श्रेयसची संघात निवड व्हायला हवी होती, असे अनेक आजी-माजी खेळाडूंचे मत होते; मात्र निवड समिती वेगळा विचार करत होते, हा निश्चितच विरोधाभास आहे.
मुळात आशिया करंडक स्पर्धेसाठी संघ निवडीच्या अगोदर शुभमन गिलची निवड होणार नाही, अशी चर्चा होती. गिलची गुणवत्ता आणि क्षमता याबद्दल शंका नाही; पण ही स्पर्धा संपल्यानंतर लगेचच वेस्ट इंडीजविरुद्धची कसोटी मालिका आहे. कर्णधार असलेला गिल त्या मालिकेसाठी पूर्णपणे तंदुरुस्त असणे अत्यावश्यक आहे. गिलला आता तिन्ही फॉरमॅटचा एकच कर्णधार म्हणून पाहिले जात असल्याचे एकूणच या घटनेवरून दिसून येते. तसे नसते तर अक्षर पटेलकडे असलेले उपकर्णधारपद गिलकडे देण्यात आले नसते. गिलकडे तिन्ही फॉरमॅटचा कर्णधार म्हणून पाहताय मग रोहित-विराट यांचे पर्व संपत असताना अनुभवी श्रेयसकडे तिन्ही फॉरमॅटचा खेळाडू म्हणून का पाहिले जात नाही?
भारतात पुढील वर्षी ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धा होत आहे. आता सूर्यकुमार यादवकडे नेतृत्वाची जबाबदारी आहे. भविष्यात काय बदल होईल हे सांगता येत नाही. तसेच विराटसह रोहित शर्मा आता केवळ एकदिवसीय प्रकारात खेळणार आहेत. २०२७ मध्ये एकदिवसीय विश्वकरंडक होणार आहे, तोपर्यंत रोहित संघात राहील किंवा मध्येच निरोप दिला जाऊ शकतो. यातील दुसरी शक्यता अधिक असल्याची चर्चा आहे. म्हणूनच भविष्याचा विचार करून गिलला तीन प्रकार एक कर्णधार ही संकल्पना राबवली जात असावी. निवड समिती कोणत्याही स्पर्धा मालिकेसाठी संघ निवडताना भविष्याचा विचार करत असते; पण तसे करत असताना विद्यमान स्थितीही आणि खेळाडूंचा फॉर्म लक्षात घेणे गरजेचे असते.
श्रेयस त्याचा अखेरचा ट्वेन्टी-२० सामना खेळला, त्यात त्याने अर्धशतक केले होते. आयपीएलमधील कामगिरी पाहता तो फॉर्ममध्ये नाही, असे म्हणता येणार नाही; पण अशा खेळाडूसाठी जागा नाही, हे कारण सामान्य क्रिकेट चाहत्यांना पटणारे नाही. आयपीएलच्याच कामगिरीची तुलना करायची तर मुंबई इंडियन्सकडून खेळणारा तिलक वर्मा ज्याला आता मधल्या फळीत स्थान मिळाले आहे, तो कोठे फॉर्मात होता? एका सामन्यात त्याच्याकडून वेगात धावा होत नव्हत्या म्हणून त्याला बाद न होताच ड्रेसिंग रूममध्ये बोलावण्यात आले होते. हे कोणत्याही फलंदाजासाठी अपमानास्पद आहे. त्यामुळे फॉर्म, गुणवत्ता आणि क्षमता लक्षात घेता श्रेयसला स्थान मिळाले नाही, तर तो नकोसा झालाय, असेच दिसून येते. श्रेणीनुसार मानधन रचनेत त्याची ब वर्गात वर्णी लावण्यात आलेली आहे. २०२४च्या करारबद्ध खेळाडूंमध्ये श्रेयसला शिस्तभंगाची कारवाई म्हणून वगळण्यात आले होते.
शिस्तभंगाची कारवाई?शिस्तभंग हा कदाचित श्रेयसला शाप असावा. २०२३च्या विश्वकरंडक स्पर्धेत अंतिम सामना गमावल्यानंतर ड्रेसिंग रूममधील त्याचे वावरणे खटकणारे होते. त्यानंतर बीसीसीआयने रणजी क्रिकेट खेळण्याचे आदेश दिलेले असताना श्रेयसने कोलकाता संघाच्या सरावासाठी उपस्थित राहण्यासाठी रणजी सामना दुखापत असल्याचे कारण देत टाळले होते. म्हणूनच त्याच्यासह ईशान किशनला २०२४च्या वार्षिक करारातून वगळण्यात आले होते. तरी ही स्वारी बदलली नाही. चॅम्पियन्स करंडक जिंकल्यानंतर बक्षीस समारंभात बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी सर्व भारतीय खेळाडूंना ब्लेझर परिधान करत होते; पण श्रेयसने ते परिधान करून घेतले नव्हते. कोठे तरी अशा वर्तणुकीची दखल घेतली जात असते; पण संघात स्थान न देताना या कारणांचा कोणी उघडपणे उल्लेख करत नाही. आता आशिया करंडक स्पर्धेसाठी मूळ १५ खेळाडूंचा संघ त्यानंतर पाच राखीव खेळाडू निवडण्यात आले. या राखीव खेळाडूंतही श्रेयसला स्थान नाही. एकीकडे अजित आगरकर म्हणतात, कोणाला वगळून श्रेयसला स्थान द्यायचे? पण राखीव खेळाडूत असलेला रियान पराग यापेक्षा श्रेयस निश्चितच किती तरी पावले पुढे आहे. रियान पराग गोलंदाजी करू शकतो, असे कारण आगरकर यांनी दिल्यास आश्चर्य वाटणार नाही. एकूणच काय तर श्रेयस नकोसा झाल्याचे ठकळपणे जाणवत आहे. अशा प्रकारे चांगल्या गुणवत्तेचा उपयोग न होणे भारतीय संघासाठी चांगले नाही. अजित आगकर हेसुद्धा मुंबईचे आहेत. श्रेयसही मुंबईचा आहे. एकादा समोरासमोर बसून यातून मार्ग काढावा, अशीच अपेक्षा क्रिकेटप्रेमींनी केली, तर गैर नाही.