आरोग्यवर्धक पदार्थांचा लँडमार्क
esakal August 24, 2025 12:45 PM

प्रशांत ननावरे - nanawareprashant@gmail.com

मुंबईतील माटुंगाच्या किंग्ज सर्कल येथील महेश्वरी उद्यानाजवळील तेलंग क्रॉस रोड नं. ३ वर पटेल महल या इमारतीमध्ये असलेले हेल्थ ज्यूस सेंटर हे आरोग्यवर्धक पदार्थांसाठीचा लँडमार्क झाला आहे. काही निवडक फळांचे ज्यूस आणि बसण्यासाठी पाच-सहा खुर्च्यांपासून सुरू झालेला हा व्यवसाय आता नावीन्यपूर्ण प्रयोगांसाठी ओळखला जातो. येथे भेट दिल्यावर प्रत्येकवेळी काहीतरी नवीन चाखायला मिळणारच, याची ग्राहकांना खात्री असते.

‘टाकाऊपासून टिकाऊ’ ही संकल्पना सर्वांना माहिती आहे, पण ‘टिकाऊपासून आणखी टिकाऊ’ ही संकल्पना नवीन म्हणायला हवी. फळे, भाज्या हे नाशवंत पदार्थ आहेत. ठरावीक वेळेत त्यांचा वापर केला गेला नाही, तर त्या गोष्टी वाया जातात. या गोष्टींचा व्यवसाय करणाऱ्यांना त्याचे आर्थिक नुकसानदेखील सहन करावे लागते. यामध्ये आणखी एक गोष्ट होते, ती म्हणजे त्या गोष्टी पिकवणाऱ्या शेतकऱ्यांची आणि शेतातून बाजारपेठेत किंवा ग्राहकांपर्यंत पोहोचवणाऱ्या लोकांची मेहनतसुद्धा वाया जाते. पैशाचं आणि मेहनतीचं मोल जाणणारे खूप कमी लोकं आजूबाजूला असतात. यशवंत डोंगरे ही असामी अशा काही निवडक लोकांपैकी एक. आपल्या फळविक्रीच्या धंद्याला जोडधंदा म्हणून त्यांनी फळांचे ज्यूस बनवण्याच्या धंद्यात गुंतवणूक केली आणि आज त्या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे.

साधारण ऐंशीच्या दशकात वयाच्या १५-१६ व्या वर्षीच यशवंत डोंगरे पुण्याहून मुंबईला आले. माटुंगा परिसरात मिर्ची, कोंथिबीर, लिंबू विकायला सुरुवात केली. पुढे धंदा वाढवायचा म्हणून त्यांनी कांदे-बटाटे विकायला सुरुवात केली. त्यात चांगला जम बसला होता; पण मग त्यांना वाटलं की फळांमध्ये जास्त आर्थिक फायदा आहे. फळविक्रीला सुरुवात केल्यानंतर धंदा तर वाढला, फळे नाशवंत असल्याने ताजेपणा उतरणाऱ्या फळांचं नुकसान न होता काय करता येईल, असा प्रश्न त्यांना पडला. हा साधारण नव्वदचा काळ होता. त्यांनी मुंबईतील रात्री उशिरापर्यंत चालणारी ज्यूस सेंटर शोधून काढली आणि त्यांना उरलेली फळं कमी किमतीत विकण्याची शक्कल काढली. संपूर्ण फळं विकत घेताना ते दिसायला चांगलंच असावं लागतं; पण ज्यूससाठी हा नियम लागू होत नाही. चांगली फळं कमी किमतीत मिळत असल्याने ज्यूस सेंटरवाल्यांनीही हसतमुखाने याला होकार दिला.

यामध्ये किंग्ज सर्कल येथील ‘हेल्थ ज्यूस सेंटर’देखील होते. काही अडचणींमुळे त्याच्या मालकाने हे दुकान विक्रीला काढले. यशवंत यांच्याकडे विचारण झाली. फळं विकणे आणि ज्यूस बनवून विकणे यामध्ये भरपूर फरक आहे. मात्र सतत प्रयोगशील राहण्याच्या वृत्तीने इथेही डोकं वर काढलं आणि यशवंत डोंगरे यांनी १९९६ मध्ये चौथ्यांदा सीमोल्लंघन केले. दरम्यान, त्यांना मुलगा विलास हादेखील मोठा झाला होता. आपल्याला जमलं नाही तर मुलगा त्याची धुरा सांभाळेल म्हणून त्यांनी हे धाडस करायचं ठरवलं. वडिलांचेच संस्कार मुलावर झालेले असल्याने विलास यांनी वडिलोपार्जित व्यवसाय फक्त सांभाळला नाही तर वाढवला आणि भरपूर प्रयोगही केले. माटुंग्यापासून सुरुवात झालेल्या या व्यवसायाच्या आता वाशी, बोरिवली, भाईंदर, परेल, गिरगाव, नेरूळ, अहमदनगर, दिल्ली या ठिकाणीदेखील शाखा आहेत.

हेल्थ ज्यूस सेंटरमध्ये ज्यूसचे तब्बल बाराशे प्रकार आहेत. यामध्ये ताज्या फळांचे ज्यूस, मिल्कशेक आणि कॉम्बिनेशन ज्यूसचा समावेश आहे. वर्षभर उपलब्ध असणाऱ्या फळांसोबत विशिष्ट ऋतूला येणाऱ्या फळांचे ज्यूस खास आकर्षण असतात. विलास यांनी गेल्या तीन दशकांमध्ये ज्यूसमध्ये असंख्य प्रयोग केले आहेत. अनेक वेगळे फ्लेवर्स स्वत: तयार केले असून आजतागायत बाजारात त्याची कॉपी इतर कुणीच करू शकलेलं नाही. मिल्कशेक प्रकारात ॲप्रिकॉट ऑरेंज, काजू चॉकलेट, कोल्ड कॉफी, व्हॅनिला, गुलकंद, चिक्की बदाम, गवती चहा, फणस, पान मसाला, रातराणी, मोगरा, बबलगम हे कुठेही न ऐकलेले आणि न मिळणारे ज्यूस इथे मिळतात. लोकांना खायला आवडणाऱ्या, सुवासिक पदार्थांचे सिरप बनवण्यात विलास यांचा हातखंडा आहे. एखादा फ्लेवर आवडला तर त्याची इत्थंभूत माहिती घेऊन सिरप तयार करण्यात येते. त्याच्या निर्मितीसाठी एक विशेष टीम त्यांच्याकडे आहे. त्याचप्रमाणे त्याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नये म्हणून तपासणीसाठी अन्न संशोधकांचीही टीम आहे. कोणताही नवीन फ्लेवर बाजारात येण्याआधी सर्व चाचण्या करून आणि ग्राहकांच्या सूचनांची अंमलबजावणी करून नंतरच तो मेन्यूमध्ये दाखल केला जातो.

कॉम्बिनेशन ज्यूसचा एक वेगळा विभाग मेन्यूमध्ये आहे. लिची काला जामून, स्ट्रॉबेरी किवी, शालीमार किट कॅट, बिस्कॉफ, सिल्व्हर गोल्ड अशी नावीन्यपूर्ण नावे असलेले ज्यूस आहेत. हे ज्यूस कॉम्बिनेशन, चव, रंग आणि पोत अशा सर्वच बाबतीत वेगळे आहेत. त्यासाठी वापरण्यात येणारी सिरप विविध घटकांचा वापर करून तयार केलेली आहेत. त्यामध्ये सर्वच गोष्टींचा बारकाईने विचार केलेला दिसतो, म्हणूनच की काय इथला प्रत्येक ज्यूस नावाला साजेसा आहे.

व्यवसाय म्हटला की आर्थिक बाजूचा विचारही करावा लागतो. अनेक वर्षे केवळ ज्यूसविक्री केल्यानंतर सर्वप्रथम सँडविच त्यानंतर रोल्स आणि आता पास्ता, पावभाजी, गार्लिक ब्रेडसारख्या पदार्थांचे प्रकारही मेन्यूत दाखल झाले आहेत. त्यातही वडापाव टोस्ट, समोसा टोस्ट, चॉकलेट टोस्ट, पहाडी ग्रील असे वेगळ्या प्रकारचे सँडविच आहेत. व्हाइट आणि रेड पास्तासोबत पिंक पास्तादेखील येथे मिळतो. चोको लावा केकच्या धर्तीवर गार्लिक ब्रेडचा एक अनोखा प्रकार त्यांनी तयार केला आहे. ब्रेडच्या आतमध्ये लिक्विड चीज असते. जे ब्रेडचा चावा घेतल्यानंतर ओघळत बाहेर येते. तरुणाईला हे प्रकार प्रचंड आवडतात.

आरोग्याचा विचार करताना केवळ पदार्थांचा विचार करून चालत नाही. त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तूदेखील पदार्थांच्या प्रतीवर परिणाम करत असतात. साधारणपणे ज्सूसरच्या जारचे ब्लेड ॲल्युमिनियमचे असतात जे कालांतराने घासून घासून त्याची भुकटी पदार्थांमध्ये नकळत मिसळत असते. त्याचा गांभीर्याने विचार करून विलास यांनी पितळेचे ब्लेड तयार करून घेतले आहेत. ज्यूसमध्ये मोठ्या रेस्टॉरंटप्रमाणे आईस क्यूबच वापरले जातात जेणेकरून त्यातून तयार होणाऱ्या पाण्यामुळे कुणालाही त्रास होणार नाही. सादरीकरण ही कला आहे. अनेक पदार्थ खावे किंवा प्यावेसे वाटतात कारण ते विशिष्ट पद्धतीने सर्व्ह केले जातात. ज्यूस असो वा सँडविच त्याचा प्रकार, आकार, रंग आणि पोत लक्षात घेऊन त्याला साजेसे ग्लास आणि प्लेटमध्येच सर्व्ह केले जातात.

ताजेपणा, नैसर्गिक, आरोग्यवर्धक आणि लॅब टेस्टेड अशा चार महत्त्वाच्या खांबांवर हेल्थ ज्यूस सेंटर आपली विश्वासार्हता गेली तीन दशके टिकवून आहे. आजवर असंख्य प्रयोग करूनही विलास यांची प्रयोग करण्याची उत्सुकता कमी झालेली नाही. वेगळ्या प्रदेशात गेल्यानंतर किंवा पदार्थांना एखादा नवीन ट्रेंड आल्यानंतर तो फ्लेवर लोकांच्या पसंतीस उतरत असेल तर त्याचे सिरपमध्ये कसे रूपांतर करता येईल, याबाबत त्यांची विचारचक्रे फिरू लागतात. इतरांचे पाहून नव्हे तर आपलं काहीतरी नवीन निर्माण करण्याची विलास यांची संशोधक वृत्ती फार कमी लोकांमध्ये दिसते आणि हीच गोष्ट ग्राहकांना इथे पुन:पुन्हा येण्यास भाग पाडत असते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.