ओतूर, ता. २३ ः ओतूर (ता. जुन्नर) येथील ग्रामविकास मंडळाच्या चैतन्य विद्यालयात विद्या विद्यापीठ संगमनेर, व्हिजन कोचिंग इन्स्टिट्यूट आणि ग्रामविकास मंडळ यांनी संयुक्तपणे २७० विद्यार्थ्यांसाठी करियर गायडन्सचे आयोजन केले होते. ग्रामविकास मंडळाचे अनिल तांबे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाल्याची माहिती मुख्याध्यापिका राजश्री भालेकर यांनी दिली.
या प्रसंगी प्राध्यापक राहुल कुमार मिश्रा यांनी दहावीला शंभर टक्के गुण कसे मिळतील त्याचबरोबर बारावीनंतरच्या असणाऱ्या स्पर्धा परीक्षांबाबत माहिती दिली. आपल्या व्याख्यानात ते म्हणाले की,‘‘निव्वळ गृहपाठ लिहिणे म्हणजे अभ्यास नाही. ‘रीड मच, थिंक मोर’ असा अभ्यास करावा. स्वयं अध्ययन, तज्ज्ञांची मदत आणि सतत वाचन, लेखनाचा सराव यावर विद्यार्थ्यांनी भर देणे गरजेचे आहे. आत्मविश्वास, स्वयंप्रेरणा यांद्वारे आपण यशापर्यंत पोहचू शकतो. "स्टार्ट अर्ली, फिनिश अर्ली" या उक्तीनुसार वेगळ्या पद्धतीने आपण आपला मुद्दा मांडला पाहिजे. त्यासाठी नियोजन आवश्यक आहे. नोव्हेंबर पर्यंत अभ्यासक्रम पूर्ण झाला पाहिजे.’’ त्याचबरोबर स्पर्धा परीक्षांसाठी जनरल अवेअरनेस, जनरल नॉलेज, जनरल स्टडी याबाबत माहिती असणे गरजेचे आहे. ‘मुझे नही पता की जीत मेरी होगी, पर इतना पता है मुझे कि मै हारुंगा नही’, अशी प्रेरणाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिली. सीइटी, नीट, आयआयटी जेईई इत्यादी परीक्षांबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी ग्रामव्हिजन कोचिंग इन्स्टिट्यूट आणि विद्या विद्यापीठाचे संस्थापक डॉ. नामदेव गुंजाळ, व्हिजनचे सेंटर हेड प्रा. राहुल कुमार मिश्रा, प्रा. सुनिल पांडव, प्रभाकर तांबे, पंकज घोलप, अनिल उकिरडे, भगवंत घोडे, बाळासाहेब साबळे, मंगेश तांबे, देवचंद नेहे, अजित डांगे, ईश्वर ढमाले, अरविंद आंबरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन भाऊसाहेब खाडे यांनी केले. अजित डांगे यांनी आभार मानले.