Satara Politics : प्रत्येक जण आपापला पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न करतो. त्यानुसार मंत्री जयकुमार गोरे त्यांचा पक्ष वाढवत आहेत. मी माझा पक्ष वाढवतोय. वाईचे मतदार मला नेहमीच वाढीव मताधिक्याने निवडून आणतात. मी दोन, तीन हजारांनी निवडून आलेलो नाही, असा खोचक टोला मदत आणि पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांनी (Makrand Patil) जयकुमार गोरे यांचा नामोल्लेख टाळून लगावला.
नियोजन भवनात झालेल्या बैठकीनंतर श्री. पाटील यांना बावधन येथील कार्यक्रमादरम्यान, मंत्री जयकुमार गोरे यांनी (Jaykumar Gore) केलेल्या वक्तव्याबाबत छेडण्यात आले. त्यावर त्यांनी खोचक उत्तर दिले. श्री. गोरे यांनी मकरंद पाटील यांच्या मतदारसंघातील कार्यक्रमादरम्यान त्यांचा नामोल्लेख टाळून टीका केली होती.
कोणीही बाभळीच्या झाडाखाली उभे राहात नाही, त्याला आंब्याची सावली लागते. बावधन गावाची ताकद राजकारण बदलविण्याची असून, आजची सभा ही परिवर्तनाची आहे, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले होते. यावरून जिल्ह्यात सध्या महायुती सरकारच्या नेत्यांमध्ये एकमेकांना डिवचण्याचे निमित्त साधले जात असल्याचे पाहायला मिळत आहे.
श्री. गोरे आणि श्री. पाटील यांनी एकमेकांच्या मतदारसंघात राजकीय कार्यक्रम घ्यायला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शीतयुद्ध सुरू झाल्याचे दिसत असतानाच, आज (रविवारी) मंत्री मकरंद पाटील यांच्याकडून माण विधानसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत माणचे नेते अनिल देसाई यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे.