दागिन्यांची हौस पडणार भारी
सणासुदीत लुटारूंची नजर, काळजी घेण्याचे पोलिसांचे आवाहन
विक्रम गायकवाड ः सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २३ : गौरी-गणपतीपासून नवरात्र, दिवाळीपर्यंतचा काळ हा उत्सवांचा असतो. या काळात गर्दी, मिरवणुका, मंदिर दर्शन अशा ठिकाणी सोनसाखळी चोरीच्या घटना वारंवार घडतात. रस्त्यावर फिरणारे भुरटे महिला विशेषतः वृद्धांना बोलण्यात गुंतवून कळत-नकळत किंवा खोट्या प्रलोभनातून मौल्यवान वस्तू लुबाडतात. त्यामुळे सणासुदीला दागिन्यांची हौस भारी पडणार नाही, यासाठी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन नवी मुंबई पोलिसांनी केले आहे.
नवी मुंबई पोलिस आयुक्तालय हद्दीत जानेवारी ते जुलै या सात महिन्यांत सोनसाखळी चोरीच्या ४२ घटनांची नोंद आहे. अशातच आता गणेशोत्सवाला सुरूवात होणार असल्याने सणासुदीच्या काळात अशा घटना वाढण्याची शक्यता अधिक आहे. सणांचा आनंद सुरक्षेसह अनुभवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. पोलिसांकडून गस्त तसेच त्वरित कारवाई अपेक्षित असली तरी नागरिकांनी कुटुंबाची सुरक्षा लक्षात घेऊन सावधगिरी बाळगणे अत्यावश्यक बाब आहे. त्यामुळे ‘सावधानता हीच सुरक्षा’ या सूत्रावर भर दिल्यास चोरी, फसवणूक, बतावणीसारख्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी खबरदारीचे काही उपाय पोलिसांनी सुचवले आहेत.
----------------------------------
खबरदारीचे उपाय
- गर्दीच्या ठिकाणी किंवा प्रवासादरम्यान मौल्यवान दागिने परिधान करणे टाळावे.
- अनोळखी व्यक्ती गोड बोलून कुठलेही प्रलोभन दाखवत आहे असे जाणवल्यास सावध व्हा.
- सार्वजनिक ठिकाणी दागिने उतरवायला सांगत असेल (उदा. तुमचे दागिने सुरक्षित नाहीत, काढून ठेवा) तर दुर्लक्ष करा.
- वृद्ध महिलांनी एकट्याने बाजारपेठेत किंवा मंदिरात जाणे टाळावे, शक्यतो सोबतीने जावे.
- संशयास्पद हालचाल दिसल्यास पोलिसांना त्वरित कळवावे.
-------------------------------------
पोलिसांकडून उपाययोजना
- गर्दीच्या ठिकाणी, बाजारपेठा, मिरवणुका, मंदिर परिसरात पोलिस पथके तैनात
- सार्वजनिक ठिकाणांवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांतून निरीक्षण ठेवणे
- फसवणूक, बतावणी प्रकारांबाबत महिला, वृद्ध नागरिकांशी संवाद
- सोनसाखळी चोरांना आळा घालण्यासाठी दुचाकी पथक
- फसवणूक प्रकरणात प्रतिसाद पथक नियुक्त करणे
- नागरी वेशातील गुप्तहेर तैनात करून संशयास्पद व्यक्तींवर लक्ष
- हेल्पलाइन क्रमांक ११२ वर संपर्क
--------------------------------------------
जानेवारी ते जुलै कालावधी
सोनसाखळी चोरी - ४२
दागिने मूल्य - ४४ लाख
उघडकीस आलेले गुन्हे - २६
वृद्ध महिलांची फसवणूक - १८
उघडकीस आलेले गुन्हे - ५
----------------------------------------------
सणासुदीच्या काळात महिलांच्या अंगावरील दागिन्यांकडे गुन्हेगारांची नजर असते. सोनसाखळी, बतावणी किंवा फसवणुकीसारखे प्रकार टाळण्यासाठी पोलिसांकडून विशेष गस्त, सीसीटीव्ही तपासणी, जनजागृती मोहिमा सुरू आहेत; मात्र नागरिकांनीही सावधगिरी बाळगणे तितकेच महत्त्वाचे आहे. गर्दीच्या ठिकाणी मौल्यवान दागिने घालणे शक्यतो टाळावे.
- पंकज डहाणे (पोलिस उपायुक्त, परिमंडळ एक)