गुरुकुल शिक्षण संकुलात तब्बल १,२०० झाडांचे रोपण
वाणगाव, ता. २४ (बातमीदार) : वृक्षारोपण करणे सोपे आहे, परंतु झाडे जगवणे आणि संवर्धन करणे भविष्याच्या दृष्टिकोनातून फायदेशीर ठरणार आहे, असे प्रतिपादन जेएसडब्ल्यूचे प्लांट हेड प्रवीण माबीयान यांनी केले. गुरुकुल शिक्षण संकुलात वृक्षारोपण आणि संवर्धन या कार्यक्रमात ते बोलत होते.
वि. म. पाटील कृषी प्रतिष्ठान, आसनगाव या संस्थेमधील फार्मसी, डिझाईन, लॉ, हॉटेल मॅनेजमेंट, कृषी आणि जेएसडब्ल्यू स्टील कोटेड प्रॉडक्ट्स लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुकुल शिक्षण संकुलात वृक्षारोपण आणि संवर्धन उपक्रम राबविला. आसनगाव-वानगाव मुख्य रस्त्यापासून ते गुरुकुल शिक्षण संकुलाच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून जेएसडब्ल्यूचे प्लांट हेड प्रवीण माबीयान आणि ऊर्जा विभागाचे अधीक्षक अभियंता अशोक कामसे उपस्थित होते. या वेळी प्रतिष्ठानचे चेअरमन शिक्षण महर्षी मिलिंद पाटील, अभियंता अशोक कामसे, पालघर विद्युत निरीक्षक प्रशांत माने, जेएसडब्ल्यू असोसिएट उपाध्यक्ष प्रवीण नवलाखे, उपमहाव्यवस्थापक रघुनाथ धुमाळ, सहाय्यक जनरल मॅनेजर अमरसिंग, एचआर हेड विपिन सिंग, सीएसआर हेड संतोष महाजन, कृषी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मिलिंद पाटील, उपाध्यक्ष विकास पाटील, वित्त संचालक लुमेश देसाई, मानक संचालक नितीन टेकाडे, सहसचिव अक्षय पाटील, कॅम्पस डायरेक्टर डॉ. संकेत धाराशिवकर प्राचार्य, प्राध्यापक आणि कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.