गल्लोगल्ली ढोलकीवर थाप
उत्तर प्रदेशातील विक्रेते पनवेलमध्ये दाखल
खारघर, ता. २४ (बातमीदार) : गणेशोत्सव तीन दिवसांवर आला आहे. अशातच उत्तर प्रदेशातील ढोलकीविक्रेते पनवेल परिसरात दाखल झाले असून, गावागावात तसेच शहरातील गल्लोगल्लींमध्ये दोनशे ते पाचशे रुपयांपर्यंत ढोलकीची विक्री केली जात आहे.
गणेशोत्सवाची तयारी जोरात सुरू आहे. व्यावसायिकदेखील गणेशभक्तांना लागणाऱ्या विविध प्रकारच्या वस्तू बाजारात विक्रीसाठी ठेवून सज्ज झाले आहेत. गणेशोत्सवात वातावरणनिर्मितीसाठी ढोलकी महत्त्वाचे साधन आहे. आरती, भजनासाठी अत्यावश्यक असल्यामुळे ढोलकीची मागणी लक्षात घेता पनवेल परिसरात उत्तर प्रदेशातील ढोलकीविक्रेते दाखल झाले आहेत. गावागावांत तसेच सिडको वसाहतीमधील गल्लोगल्ली ढोलकीविक्रीचा व्यवसाय करताना दिसत आहेत. प्लॅस्टिक पुठ्ठ्यापासून तयार केल्या जाणाऱ्या ढोलकी दोनशे ते अडीचशे रुपये, तर लाकडी खोडापासून तयार केल्या जाणारी ढोलकी चारशे ते पाचशे रुपयांपर्यंत विकल्या जात आहेत.
--------------------------------------------
चाळीस, पन्नास हजारांची मिळकत
उत्तर प्रदेशातील जवळपास पंचवीस कुटुंबे तळोजा येथील पेंधर उड्डाणपुलाखाली गणेशोत्सवापूर्वी पंधरा दिवस आदी दाखल होतात. ढोलकी तयार करणाऱ्यासाठी मोकळे खोड, चामडे, चाव्या, पॉलिश, शाई आणि दोरी व वादी आदी साहित्य वापरून ढोलकीची बांधणी केली जाते. आणलेल्या साहित्यातून ढोलकी तयार करून विक्री केली जाते. या व्यवसायातून महिनाभरात प्रति कुटुंब चाळीस ते पन्नास हजार रुपये मिळतात. त्यानंतर गावी जात असल्याचे महंमद खान यांनी सांगितले.