द बिग स्टोरी
86760
86761
स्मार्ट वीज मीटर दिलासा की डोकेदुखी?
प्रगती की पिळवणूक? : वीज ग्राहकांच्या तक्रारी वाढल्या
लीड
महाराष्ट्रात महावितरण कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर पारंपरिक वीज मीटर बदलून नवे स्मार्ट वीज मीटर बसवले जात आहेत. ‘डिजिटल इंडिया’, ‘स्मार्ट ग्रीड’ यांसारख्या घोषणांच्या पार्श्वभूमीवर हा बदल अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा भाग मानला जात आहे; परंतु प्रत्येक बदलासोबत संधी आणि आव्हाने दोन्ही असतात. स्मार्ट मीटरच्या संदर्भातही एकीकडे अचूकता व कार्यक्षमता यांचे फायदे सांगितले जात असताना, दुसरीकडे ‘अन्याय्य व जादा वीज बिले'' याबाबतच्या ग्राहकांच्या तक्रारीही वाढत आहेत. त्यामुळे या बदलाला सामोरे जाताना सर्वांनीच तटस्थ, माहितीपूर्ण आणि समतोल नजरेतून पाहणे आवश्यक झाले आहे.
......................
* का निर्माण झाली गरज?
वीज ग्राहकांकडे पूर्वी इलेक्ट्रिक मीटर होते. त्यात सहजपणे फेरफार करता येत होता. त्यामुळे इलेक्ट्रिक मीटर बदलून तेथे डिजिटल मीटर बसविण्यात आले. या बदलावेळी देखील वीज ग्राहकांनी विरोध केला होता; मात्र बहुतांश ग्राहकांना डिजिटल मीटर बसविण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात आली. सध्या सर्व ग्राहकांकडे हेच वीज मीटर सुरू आहेत. डिजिटल वीज मीटरमधील वीज वापर, त्याचे मोजमाप तथा रीडिंग आणि बिल तयार करण्याची प्रक्रिया वेळखाऊ होती. कर्मचारी थेट ग्राहकांच्या घरी जाऊन वीज रीडिंग घेतो आणि नंतर हे रीडिंग महावितरणकडे नोंदवतो. यात मानवी चुकांची शक्यता वाढली. तसेच डिजिटल वीज मीटरमध्येही फेरफार आणि छेडछाड होत असल्याचे महावितरणच्या लक्षात आले. याखेरीज कोणत्या वेळेला किती वीज वापरली जाते, याची माहिती अचूक माहिती वीज कंपन्यांना मिळत नसे. त्यामुळे अचानक भार वाढल्यावर वीज निर्मिती आणि वापर यांच्यातील ताळमेळ साधण्यासाठी अनेक वेळा महावितरणला वीजपुरवठा खंडित करावा लागतो. या पार्श्वभूमीवर सर्व ग्राहकांना स्मार्ट वीज मीटर बसविण्यासाठी राज्य आणि केंद्राने पुढाकार घेतला आहे. यात उत्तरेकडील अनेक राज्यांमध्ये स्मार्ट वीज मीटर बसविण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आली आहे. सिंधुदुर्गात सध्या सरासरी १६ टक्के तर महाराष्ट्रात सरासरी ४५ टक्के ग्राहकांच्या घरी स्मार्ट वीज मीटर बसविण्याची कार्यवाही पूर्ण झाली आहे. स्मार्ट मीटरबाबत सध्या वीज ग्राहकांचा रोष आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यामुळे डिजिटल ऐवजी स्मार्ट वीज मीटर किंवा टीओडी मीटर बसविण्याची कार्यवाही धीम्या गतीने सुरू आहे. पुढील वर्षभरात मात्र सर्व जुने डिजिटल मीटर बदलून तेथे नवीन वीज मीटर बसविण्याची कार्यवाही होण्याची शक्यता आहे.
* अचूक नोंदीचा दावा
स्मार्ट वीज मीटरचे काम डिजिटल मीटरप्रमाणेच असले तरी त्यामध्ये सीमकार्ड आणि वीज रीडिंग नोंद करण्याची स्वयंचलित स्वतंत्र प्रणाली आहे. पारंपरिक मीटरमध्ये महिन्याच्या शेवटी असणारे रीडिंग आणि यापूर्वी घेतलेले रीडिंग यांची वजाबाकी करून महिन्याचा वीज युनिट वापर निश्चित केला जातो. त्यानुसार वीजबिल निश्चित केले जाते, तर स्मार्ट मीटर तासागणिक वीज वापर नोंदवते. ही नोंद महावितरणच्या सर्व्हरकडे पाठविली जाते. त्यामुळे मानवी चुकांमुळे होणारे चुकीचे मीटर रीडिंग टळते. ग्राहकांना आपण तासाला किंवा दिवसाला किती वीज वापरतोय, याची अचूक माहिती उपलब्ध होते. ग्राहक स्वतः मोबाईल अॅपवरील ‘महाविद्युत’ या पोर्टलवरून दिवसागणिक किंबहुना तासागणिक आपला वीज वापर किती होतोय, ते पाहू शकतो. महावितरणला रीडिंग घेण्यासाठी माणसे पाठवावी लागत नाहीत. थेट डिजिटल डेटामधून बिल तयार होते. त्यामुळे थकबाकी कमी करण्यास मदत होईल, अशी महावितरणला अपेक्षा आहे. याखेरीज ग्राहकाला जर वीज वापराचे तासागणिक आकडे दिसले, तर तो जास्त वापर कोणत्या वेळी होत आहे, हे समजू शकतो. त्यानुसार वीज बचत करू शकतो. महत्त्वाची बाब म्हणजे, वीज मीटरचा सर्व कंट्रोल महावितरणकडे असल्याने एखाद्या ग्राहकाचा वीज मीटर तातडीने ‘डिस्कनेक्ट’ ‘अथवा रीकनेक्ट’ करता येते शक्य झाले आहे. तसेच चोरी किंवा तांत्रिक बिघाड तातडीने शोधता येतो, असा महावितरणचा दावा आहे.
..........................
* दुप्पट, तिप्पट बिलांमुळे ताप
महावितरणने सिंधुदुर्गात आतापर्यंत एकूण ग्राहकांपैकी १६ टक्के ग्राहकांना स्मार्ट वीज मीटर बसविले आहेत. यात वैभववाडी तालुक्यात सर्वाधिक २९ टक्के आणि कणकवली तालुक्यात २४ टक्के वीज ग्राहकांचे मीटर बदलण्यात आले. यात प्रामुख्याने ज्या ग्राहकांचे जुने वीज मीटर सदोष होते किंवा ज्या ग्राहकांकडे पूर्वीच्या बिलांची थकबाकी शिल्लक होती, अशा ग्राहकांची वीज बिले दुप्पट, तिप्पट किंवा त्यापेक्षाही अधिक आली आहेत. त्यामुळे स्मार्ट वीज मीटरबाबत प्रचंड रोष आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. महावितरणने प्राधान्याने सदोष वीज मीटर बदलण्याला प्राधान्य दिले. या ग्राहकांनी पूर्वी कितीही वीज युनिटचा वीज वापर केला असला तरी, तो सदोष वीज मिटरमध्ये नोंदवला जात नव्हता. अशा ग्राहकांना सरासरीनुसार वीज बिलांची आकारणी होत होती. स्मार्ट मीटर बसविल्यानंतर त्या ग्राहकाचा महिन्याचा वापर निश्चित झाला. त्यानुसार जेवढा वीज वापर तेवढ्या बिलाची आकारणी झाली. याखेरीज सरासरीच्या तफावतीमधील मागील थकबाकीचेही बिल त्यामध्ये समाविष्ट झाले. स्मार्ट मीटर बसविल्यानंतर अनेक ग्राहकांना मिळालेले पहिलेच वीज बिल प्रचंड वाढले. त्यामुळे स्मार्ट मीटर विरोधात मोर्चा, आंदोलने वाढू लागली आहेत. या आंदोलनात राजकीय पक्षांनीही उडी घेतल्याने स्मार्ट मीटर विरोधात मोठी वातावरण निर्मिती झाली आहे.
.........................
* महावितरणची यंत्रणा कमी पडतेय
केंद्र, राज्याकडून आदेश असल्याने महावितरण कंपनीने वेगाने पूर्वीचे मीटर बदलून तेथे स्मार्ट मीटर बदलाची कार्यवाही सुरू केली; मात्र तेवढ्याच तत्परतेने वीज बिलाबाबत आलेल्या शंका, तक्रारी यांचे निरसन झाले नाही. गाव आणि वाडीनिहाय वीज ग्राहक मेळावे घेऊन पूर्वीचा डिजिटल आणि सध्याचा स्मार्ट मीटर याबाबत परिपूर्ण माहिती देणे आवश्यक होते. याखेरीज नवीन स्मार्ट मीटर सुरू करण्यापूर्वी त्या ग्राहकाकडे असलेली पूर्वीची सर्व थकबाकी वसूल करणे, जुन्या मीटरमधील रीडिंग आणि नवीन मीटरमधील रीडिंग यात तफावत राहू नये, याबाबतची दक्षता घेणे आवश्यक होते; मात्र त्याबाबत पुरेसे लक्ष महावितरणकडून देण्यात आले नाही. त्यामुळे अनेक ग्राहकांची वीज बिले दुप्पट, तिप्पट झाली. परिणामी महावितरणच्या स्मार्ट मीटर विरोधात ग्राहकांचा प्रचंड रोष वाढला.
* स्मार्ट मीटरची अपरिहार्यता
निर्माण होणारी वीज, या विजेचा सबस्टेशन ते ग्राहकापर्यंतचा प्रवास, यामध्ये नेमकी किती वीज वापरली जाते, किती टक्के गळती आणि किती प्रमाणात वीज चोरी होते, याचे अचूक मोजमाप करणे महावितरणला शक्य झालेले नाही. त्यासाठी महावितरणने गेल्या तीन वर्षांत सर्व ट्रान्सफॉर्मवर स्मार्ट मीटर बसविले आहेत. या ट्रान्सफॉर्मरवरून किती ग्राहकांना वीज कनेक्शन देण्यात आले, त्यांच्याकडून किती युनिट वीज वापर होतो, किती टक्के वीज गळती होते, याचा ताळमेळ घालण्याचा प्रयत्न झाला; परंतु एका ट्रान्सफॉर्मरवरून कनेक्शन दिलेल्या सर्व ग्राहकांना एकाच वेळी बिलांची आकारणी केली जात नाही. प्रत्येक ग्राहकाच्या घरी जाऊन वीज रीडिंग घेण्याच्या तारखा वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे ट्रान्सफॉर्मरवर मीटर बसवून देखील महावितरणला आतापर्यंत ग्राहकांना पुरवलेला वीजपुरवठा, त्यातील वीज गळती आणि ग्राहकांनी प्रत्यक्ष केलेला वीज वापर याची अचूक आकडेवारी उपलब्ध झालेली नाही. ज्यावेळी सर्व ग्राहकांकडे स्मार्ट मीटर बसविले जातील, त्यावेळी एकाच तारखेला सर्व ग्राहकांचे रीडिंग घेऊन त्यांना ऑनलाईन वीज बिले दिली जाणार आहेत. यात ग्राहकांनी वापरलेली वीज आणि ट्रान्सफॉर्मवर नोंद झालेले युनिट यांची आकडेवारी तपासून वीज गळतीचे नेमके चित्र स्पष्ट होणार आहे. तसेच वीज चोरी होत असेल तर ते देखील नेमके शोधता येणार असल्याचा महावितरणचा दावा आहे.
* खासगीकरणाची भीती
मुंबई, ठाण्याचा काही भाग वगळता संपूर्ण राज्यात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी वीजपुरवठा करते. ही संस्था महाराष्ट्र शासनाच्या मालकीची सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे, तर कोकणासह राज्यातील काही भागात स्मार्ट मीटर बसविण्याचा ठेका अदानी समुहाला देण्यात आला आहे. या समुहाकडे आधीच देशभरातील विमानतळ, बंदरे आदी प्रकल्प सोपविण्यात आले आहेत. अदानी समूह वीज निर्मिती क्षेत्रातही आहे. त्यामुळे भविष्यात महावितरण कंपनी ऐवजी अदानी समुहाकडून समांतर वीजपुरवठा केला जाईल. सुरुवातीला विजेचे दर कमी आणि महावितरण बंद झाल्यानंतर भरमसाठ वाढविले जातील, अशी भीती ग्राहकांमध्ये आहे. महावितरणने मात्र हा दावा फेटाळून लावला आहे. वीजपुरवठ्याचा दर कुठली वीज निर्मिती किंवा वहन करणारी कंपनी निश्चित करत नाही, तर महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोग युनिट दराची निश्चिती करते. त्यामुळे वीज दरवाढीची भीती अनाठायी असल्याचा दावा महावितरणकडून करण्यात आला आहे.
* शेतकऱ्यांचाही विरोध
सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांनीही स्मार्ट वीज मीटरला विरोध केला आहे. इथल्या बहुतांश शेतकऱ्यांकडे कृषी पंप आहेत. या कृषी पंपांना ट्रान्सफॉर्मरवरून कनेक्शन देण्यात आले आहे. हे कनेक्शन बंद करून तेथे ''मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना'' अंतर्गत स्मार्ट मीटर बसवले जात आहेत. हे स्मार्ट मीटर वेगाने फिरण्याची भीती असल्याने नव्या मीटरला शेतकऱ्यांमधूनही तीव्र विरोध होत असल्याची भावना शेतकरी विश्वनाथ खानविलकर यांनी व्यक्त केली.
* खरेच मीटरची चूक ?
महावितरणचे म्हणणे आहे की, स्मार्ट मीटर बसविल्यानंतर बिलात झालेली वाढ मीटरच्या चुकीमुळे नसून, याआधी वीजवापर पूर्णतः मोजला जात नव्हता. त्यामुळे जुन्या बिलांपेक्षा अचूक मोजणी झाल्यावर बिल वाढल्याचे वाटते. काही वेळा घरात नव्याने आलेली इलेक्ट्रॉनिक उपकरणे, एसी, हीटर, पंप यांचाही वापर वाढलेला असतो. याखेरीज मोबाईल चार्जिंग, काही वेळा मोबाईल, लॅपटॉप आदींचे चार्जिंग पूर्ण झाले तरी किंवा चार्जरमधून मोबाईल काढला, पण वीजपुरवठा करणारे बटन बंद करण्यात आले नाही, तरीही वीज वापर सुरू राहतो. अनेकवेळा टीव्ही, संगणक आदी उपकरणे फक्त ‘शटडा्ऊन’ किंवा रिमोटने बंद केली जातात; पण टीव्हीच्या आतील सॉकेटमधील २२० किलोवॅटचे टीव्हीला जितके लागेल तितक्या व्होल्टेजमध्ये रूपांतर करणे अखंडपणे चालू असते. पूर्वीच्या वीज मीटरमध्ये याची नोंद केली जात नव्हती. स्मार्ट मीटरमध्ये सर्व वीज वापराची मोजदाद होते. त्यामुळे देखील वीज युनिटचा वापर वाढत असतो. परिणामी वीज बिले वाढतात, असे वीज क्षेत्रातील तज्ज्ञ सागर मुळे यांचे म्हणणे आहे.
* वीज मीटरचा भार नाही
महावितरणच्या माध्यमातून बसविण्यात येणाऱ्या स्मार्ट मीटरची किंमत ६ हजार १३६ रुपये आहे. हे सहा हजार रुपयांचे मीटर १२ हजार रुपयांना घेतले, या अपप्रचाराला काही अर्थ नाही. मीटर बसविणाऱ्या खासगी एजन्सीला दहा वर्षे मीटरची देखभाल दुरुस्ती करणे, निर्मितीच्या दोषामुळे मीटरमध्ये बिघाड झाल्यास ते मोफत बदलणे, रीडिंग उपलब्ध करून देणे तसेच ग्राहकांना सेवा देणे आदी जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागणार आहेत. एजन्सीला त्यासाठी वेगळा मोबदला दिला जाणार आहे. स्मार्ट मीटरसाठीचे पैसे संबंधित कंपन्यांना दहा वर्षांत टप्प्याटप्प्याने द्यायचे आहेत. जेवढे मीटर बसतील, तेवढ्या मीटर्सचेच पैसे द्यायचे आहेत. स्मार्ट मीटरसाठी द्यावे लागणारे पैसे महावितरण आपल्या स्वतःच्या महसुलातून देणार असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली.
कोट
टप्प्याटप्प्याने ग्राहकांकडील जुने वीज मीटर बदलून तेथे टीओडी (टाईम ऑफ डे) स्मार्ट मीटर बसविण्याची कार्यवाही सुरू केली आहे. केंद्रानेच तसे धोरण आखले असून, आम्ही त्याची अंमलबजावणी करत आहोत. आतापर्यंत शासकीय कार्यांलयातील मीटर बदलाची कार्यवाही अंतिम टप्प्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यात सदोष वीज मीटर बदलले आहेत, तर ज्या ग्राहकांनी पारंपरिक ऐवजी टीओडी स्मार्ट मीटरची मागणी केली, त्यांनाही ते बसवले जात आहेत. पुढील टप्प्यात सर्वच ग्राहकांचे जुने वीज मीटर बदलून तेथे नवीन टीओडी स्मार्ट मीटर बसविले जाणार आहेत. नवीन मीटर जेवढा वीज वापर तेवढेच बिल आकारणीसाठी सक्षम आहेत. ज्या ग्राहकांचे वीज मीटर सदोष आहेत, त्यांना सरासरीनुसार बिले दिली जात होती, तर नवीन मीटर बसविल्यानंतर योग्य वीज वापराची देयके आकारणी होत आहेत. यात काही ग्राहकांची वीजबिले वाढली; मात्र बहुतांश ग्राहकांच्या बिलामध्ये फारसा फरक पडलेला नाही. आतापर्यंत सिंधुदुर्गात तब्बल ४६,७६६ टीओडी स्मार्ट वीज मीटर बसविले आहेत. ज्यांचे मीटर सदोष होते, त्यांना वाढीव बिले आल्याने विरोध झाला; पण वाढीव बिलाची तक्रार आलेल्या सर्व ग्राहकांच्या समस्यांचे निराकरण करा, अशा सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.
- अरविंद वनमोरे, अधीक्षक अभियंता, महावितरण कुडाळ
कोट
महावितरणची पूर्वी वीज बिले सरासरीनुसार काढली जात होती, तर नवीन मीटर बसविल्यानंतर महिना युनिट वापरानुसार वीज बिल आणि त्यात पूर्वीची थकबाकीची आकारणी करून बिलांची वसुली केली जात आहे. त्यामुळे पूर्वी चारशे रुपयापर्यंत येणारे बिल आता साडेतीन हजार रुपयापर्यंत वाढले आहे. महावितरणने आधीच सदोष मीटर बदलायला हवे होते, आता नवीन मीटर बसविल्यानंतर त्यात पूर्वीची थकबाकी वसूल केली जाऊ नये.
- हरिश्चंद्र सावंत, वीज ग्राहक
कोट
महावितरण कंपनीने नवीन वीज मीटर बसविण्यापूर्वी ग्राहकांचे प्रबोधन करायला हवे. तालुका कार्यालयात जनसंपर्क अधिकारी नेमायला हवा. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये येऊन ग्राहकांच्या शंकांचे निराकरण व्हायला हवे. पूर्वीची थकबाकी वसुली करण्याची जबाबदारी महावितरणची होती. गेल्या एक-दोन वर्षांत त्याबाबतची कार्यवाही झाली नाही. त्यामुळे आता नवीन मीटर बसवताना पूर्वीची थकबाकी पूर्णतः माफ करायला हवी; अन्यथा ठाकरे शिवसेनेच्या वतीने पुन्हा जनआंदोलन उभारू.
- सतीश सावंत, शिवसेना विधानसभा संघटक
--------------------
कोट
स्मार्ट मीटर बसविण्यासाठी अदानी कंपनीची वेगळी टीम आहे; मात्र महावितरणचे काही अधिकारी महावितरणच्या वायरमनना महिन्याला १० स्मार्ट मीटर बसविण्यास सांगत आहेत. त्याबदल्यात अदानी कंपनी प्रत्येक मीटरमागे वायरमनला ७० रुपये देत आहे. असले प्रकार आम्ही खपवून घेणार नाही. ज्या ग्राहकांचे वीज मीटर सदोष आहेत, त्यांना रीतसर नोटीस पाठवा. त्यांना मीटर सदोष असल्याची खात्री करून द्या आणि नंतरच पुढील कार्यवाही करा. यापुढे ग्राहकांना कल्पना न देता त्यांचे जुने मीटर बदलले तर महावितरण अधिकाऱ्यांना खुर्चीत बसू देणार नाही.
- वैभव नाईक, माजी आमदार
--------------------------
कोट
सहा महिन्यांपूर्वीच महावितरणने आमचा जुना मीटर बदलून तेथे स्मार्ट मीटर लावलेला आहे. आजतागायत या मीटरबाबत आमची फारशी तक्रार नाही. फक्त पूर्वीच्या तुलनेत शंभर ते दीडशे रुपयांचे बिल वाढले आहे.
- संजय एकावडे, वीज ग्राहक, कणकवली शहर.
---
कोट
पुढील वर्षभरात राज्यातील सर्व सव्वादोन कोटी वीज ग्राहकांचे जुने मीटर बदलून तेथे स्मार्ट टीओडी मीटर लावले जाणार आहेत. ही कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर राज्यातील तब्बल २० हजार मीटर रीडर बेरोजगार होणार आहेत. नवीन तंत्रज्ञानाला आमचा विरोध नाही; पण अनेक वर्षे काम करूनही कामगारांवर बेरोजगारीची वेळ येणार आहे. त्यामुळे महावितरणने वीज रीडरला विविध पद्धतीने सेवेत सामावून घ्यायला हवे.
- रमेश जांगळे, अध्यक्ष, रीडर कंत्राटी कामगार संघटना, महाराष्ट्र
...
सिंधुदुर्गातील विभागनिहाय स्मार्ट मीटर कामगिरी
विभाग*एकूण मीटर*स्मार्ट मीटर*जुने मीटर*टक्केवारी
आचरा*२७४३५*३५५५*२३८८०*१४.८८
देवगड*४२०८५*५९७४*३६१११*१६.५४
कणकवली*५१२७५*९८५३*४१४२२*२३.७८
मालवण*३३५८७*२८८१*३०७०६*९.३८
वैभववाडी*२९०५२*६४९६*२२५५६*२८.७९
कुडाळ*४९६०१*४५२८*४५०७३*१०.०४
ओरोस*२१३६६*३८७२*१७४९४*२२.१३
दोडामार्ग*१७७३७*२९९२*१४७४५*२०.२९
सावंतवाडी*५१३८४*४६३८*४६७४६*९.९२
वेंगुर्ले*३८५३८*१९७७*३६५६१*५.५
---------------------------
एकूण*३६२०६०*४६७६६*३१५२९४*१६.११
------------------------------