Eknath Shinde : असेल तसे निघून या, तानाजी सावंत यांना मंत्रिपदाची लॉटरी? एकनाथ शिंदेंच्या मनात चाललंय काय?
Tv9 Marathi August 24, 2025 11:45 PM

आरोग्य खात्याचे माजी मंत्री आणि पंरडा विधानसभेचे आमदार तानाजी सावंत निरोप मिळताच तातडीने मुंबईत दाखल झाले. त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट घेतली. दोघांमध्ये दोन तास चर्चा झाली. त्यामुळे धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आले. आता सावंत यांना मंत्रिपदाची लॉटरी लागणार का? अशी चर्चा होत आहे. तर दुसरीकडे शिंदे आता राज्यात डॅमेज कंट्रोलसाठी सक्रीय झाल्याची सुद्धा चर्चा होत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राजकीय नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे.

तानाजी सावंत सक्रीय

माजी आमदार राहुल मोटे यांनी दादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर तानाजी सावंत सक्रीय झाले आहेत. शिंदे यांनी त्यांना तातडीने मुंबईला येण्याचा निरोप दिला. सावंत यांनी मग मुंबईत येत शिंदेंची भेट घेतली. दोघांमध्ये राजकीय आणि विविध विषयांवर दोन तास चर्चा झाली. सावंत यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर याविषयीची पोस्ट केली आणि या भेटीचा वृत्तांत कथन केला. दोघांमध्ये चांगली चर्चा झाल्याचे समोर आले.

नाराजी दूर होणार?

गेल्यावर्षी परंडा तालुक्यातून तानाजी सावंत हे विजयी झाले होते. मंत्रिपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडणार असं मानण्यात येत होते. पण सावंत यांची मंत्रिमंडळात काही वर्णी लागली नाही. तेव्हापासून ते नाराज होते. तर दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यात त्यांचे बंधू आणि शिंदे गटाचे संपर्कप्रमुख शिवाजी सावंत यांनी ही रामराम ठोकला होता. त्यामुळे सावंत कुटुंबिय शिंदे सेनेवर नाराज असल्याचे बोलले जात होते. शिवाजी सावंत हे भाजपात प्रवेश करणार असल्याचे समोर येत आहे. त्यांनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यातच शिंदे यांनी सावंत यांना निरोप पाठवत तातडीने मुंबईत बोलावून घेतले. त्यामुळे सावंत यांचे पुनरागमन होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत. त्यामुळे शिंदे सेना आता डॅमेज कंट्रोल करत असल्याचे समोर येत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी अनेक ठिकाणी असे प्रयोग होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यात नाराजांची नाराजी दूर करण्याची शक्यता आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.