गाझा पट्टीत राहणारे लोक अन्नाचं दुर्भिक्ष्य आणि उपासमार यातून कशाप्रकारे आयुष्य कंठत आहेत, हे जाणून घेण्याचा प्रयत्न बीबीसीनं केला.
बीबीसीनं तिथल्या लोकांशी संवाद साधला. या अन्नाच्या दुर्भिक्ष्यातून निर्माण झालेल्या या दुष्काळाचा आपल्या शरीरावर आणि मनावर कसा तीव्र परिणाम होत आहे, हे त्यांनी आपल्या शब्दातून व्यक्त केलंय.
संयुक्त राष्ट्रांच्या पाठिंब्याने नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार गाझाच्या काही भागात अन्नाच्या दुर्भिक्ष्यामुळे दुष्काळ असल्याचं वास्तव पुढे आलं आहे.
तिथे अशाप्रकारचा दुष्काळ असल्याचं अधिकृतपणे मान्य होण्याची खरं तर ही पहिलीच वेळ आहे.
'हा दुष्काळ खूप उशिरा जाहीर करण्यात आलाय'रीम तौफिक खादर 41 वर्षांच्या आहेत. त्या पाच मुलांच्या आई आहेत. त्या याच गाझा शहरात राहतात.
त्या सांगतात की हा दुष्काळ खूप उशिरा जाहीर करण्यात आला आहे. पण, तरीही अशी घोषणा झाली, हेदेखील फार महत्त्वाचं आहे.
एका व्यक्तीनं सांगितलं की, "गेल्या पाच महिन्यांपासून कोणतंही प्रथिनं आमच्या पोटात जाऊ शकलेलं नाहीये. माझा सर्वांत लहान मुलगा चार वर्षांचा आहे. त्याला फळं आणि भाज्या कशा दिसतात, किंवा त्यांची चव कशी असते, हेदेखील अद्याप माहिती नाहीये.
गाझामधील लोक उपाशी असल्याचा दावा इस्रायलने फेटाळलाइस्रायलने गाझामध्ये जाणाऱ्या मदतीवर कडक निर्बंध लादले आहेत, असं संयुक्त राष्ट्रांचं म्हणणं आहे.
मात्र, इस्रायलने हा दावा फेटाळून लावला आहे.
इस्रायलने गाझामधील लोक उपाशी आहेत, हा दावा देखील फेटाळला आहे.
मात्र, 100 हून अधिक मानवतावादी गट म्हणतात की गाझामधील लोक उपाशी आहेत.
अनेक संयुक्त राष्ट्रांच्या संस्थाही असेच म्हणतात.
शुक्रवारी (22 ऑगस्ट) संयुक्त राष्ट्रांच्या पाठिंब्याने फूड सेक्युरिटी फेज क्लासिफिकेशन (आयपीसी) ने एक घोषणा केली.
गाझा शहर आणि जवळपासच्या भागात दुष्काळ असल्याचं त्यांनी घोषित केलं आहे. त्यांनी म्हटलंय की, हा दुष्काळ 'पूर्णपणे मानवनिर्मित' आहे.
आयपीसीने इशारा दिला आहे की गाझामधील अर्ध्या दशलक्षाहून अधिक लोक धोक्यात आहेत. हे लोक उपासमार, अत्यंत गरिबी आणि मृत्यू अशा अतिशय वाईट परिस्थितीत जगत आहेत.
'ना उन्हापासून संरक्षण, ना थंडीपासून'राजा तलबेह 47 वर्षांची आहे. त्या सहा मुलांच्या आई आहेत. त्या सांगतात, त्यांचे 25 किलो वजन कमी झाले आहे.
त्यांनी एका महिन्यापूर्वी गाझातील झीटौन जिल्ह्यातील त्यांचं घर सोडलं. त्या आता समुद्रकिनाऱ्याजवळील एका तात्पुरत्या तंबूत राहतात.
त्यांना 'ग्लूटेन इन्टॉलरन्स'ची समस्या आहे. त्यांनी सांगितलं की त्यांना अन्नच मिळत नाही.
त्या सांगतात, "युद्धापूर्वी, एक धर्मादाय संस्था मला ग्लूटेन-फ्री प्रोडक्ट्स मिळवून देण्यास मदत करायची. कारण, हे प्रोडक्ट्स स्वतः विकत घेण्याची माझी ऐपत नव्हती."
"युद्ध सुरू झाल्यापासून, मला बाजारात आवश्यक असलेले पदार्थही मिळत नाहीत. जरी मला ते सापडले तरी मी त्यासाठी पैसे देऊ शकत नाही."
पुढे त्या सांगतात, "रोज बॉम्बस्फोटाचा सामना करावा लागणं हेच खूप कठीण झालं आहे. घरापासून लांब, या शिबिरात राहणं फारच अवघड आहे. या ठिकाणी ना उन्हापासून संरक्षण होतं ना थंडीपासून. त्यात अन्नाच्या दुर्भिक्ष्याच्या समस्येची ही आणखी भर."
'माझ्या मुलीला खाण्यासाठी जराही अन्न नाही'रिदा हिजेह 29 वर्षांची आहे. तिला लामिया नावाची पाच वर्षांची मुलगी आहे.
लामियाचं वजन 19 किलो (42 पौंड) वरून 10.5 किलो (23 पौंड) पर्यंत कमी झालं आहे. युद्धापूर्वी लामिया निरोगी होती असं रिदा सांगते.
"लामियाला यापूर्वी कोणताही आजार नव्हता. दुष्काळामुळेच हे घडलंय," रिदा सांगते.
"माझ्या मुलीला खाण्यासाठी जराही अन्न नाही. भाज्या नाहीत, फळे नाहीत," असंही ती सांगते.
आता लामियाच्या पायांना सूज आली आहे. तिचे केस पातळ झाले आहेत. तसेच तिला मज्जातंतूंच्या समस्या देखील निर्माण झालेल्या आहेत.
"ती चालू शकत नाही. मी अनेक क्लिनिक, डॉक्टर आणि हॉस्पिटल्समध्येही गेले. सर्वांनी मला सांगितलं की, माझी मुलगी कुपोषणानं ग्रस्त आहे. पण यापैकी कुणीही मला काहीही दिलं नाही. ना उपचार, ना कोणताही आधार."
'बाळं आता लहानच जन्माला येतात'मँडी ब्लॅकमन ही एक ब्रिटिश नर्स आहेत. त्या गाझामध्ये 'यूके-मेड' या चॅरिटीसाठी काम करतात.
त्यांच्या दवाखान्यात मातांचं आरोग्य, प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीनंतरची काळजी घेतली जाते.
त्या सांगतात की, त्यांच्या दवाखान्यात येणाऱ्या 70 टक्के मातांना कुपोषण असते.
त्या सांगतात, "बाळं आता लहानच जन्माला येतात. परिणामत: ते जन्माला आल्यापासूनच अधिक असुरक्षित असतात."
7 ऑक्टोबर 2023 रोजी दक्षिण इस्रायलवर हमासच्या नेतृत्वाखाली झालेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलनं ही लष्करी मोहीम सुरू केली होती.
ही मोहिम सुरू झाल्यापासून गाझामध्ये 62 हजारहून अधिक लोक मारले गेले आहेत. ज्या दिवशी हल्ला केला त्या दिवशी सुमारे 1200 लोक मारले गेले होते आणि 251 जणांना ओलीस ठेवण्यात आलं होतं.
युद्ध सुरू झाल्यापासून, दुष्काळ आणि कुपोषणामुळे किमान 271 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 112 मुले होती. हे आकडे गाझाच्या हमास-संचालित आरोग्य मंत्रालयाकडून आले आहेत.
'आम्ही कसेबसे दिवत कंठत आहोत'असील नावाची आणखी एक महिला गाझा शहरात राहते. तिनं सांगितलं की, "पाच महिन्यांपूर्वी माझं वजन 56 किलो (123 पौंड) होतं. आज माझं वजन फक्त 46 किलो (101 पौंड) आहे."
तिनं सांगितलं की, गेल्या अनेक महिन्यांपासून तिनं साधं एखादं फळ वा एखादा मांसाचा तुकडाही खाल्लेला नाही.
तिनं आतापर्यंत तिच्याकडे असलेली सगळी बचत जगण्यासाठी आवश्यक असलेल्या साध्या अन्नावर खर्च केली आहे.
असील तिच्या नणंदेसोबत राहते. तिच्या नणंदेला एका महिन्याचे बाळ आहे.
असील म्हणाली की, "ती (नणंद) किफायतरशीर दरात 'बेबी फॉर्म्यूला' शोधण्यासाठी खूप प्रयत्न करत आहे."
ती म्हणाली की जेव्हा त्यांना बेबी फॉर्म्यूला मिळतो तेव्हा ते खूप महाग असतं. त्याची किंमत प्रति कॅन सुमारे 180 शेकेल (£39) आहे.
तिनं सांगितलं की, "माझ्या घरी अन्नाचा साठा नाही. माझ्याकडे एक-दोन आठवडे पुरेल इतकंही अन्न नाही."
पुढे ती सांगते की, "ज्याप्रमाणे इतर हजारो लोक एकेक दिवस कसाबसा पुढे ढकलत आहेत, अगदी तसंच आम्हीही कसेबसे दिवत कंठत आहोत."
फ्रेया स्कॉट-टर्नर आणि कॅरोलाइन हॉली यांचे अतिरिक्त वार्तांकन
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)