US Tariff On India : वर्ल्ड पॉलिटिक्समध्ये भारताचं महत्व वाढवणारं अमेरिकी उपराष्ट्रपतींच वक्तव्य, पण…
Tv9 Marathi August 25, 2025 04:45 PM

अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंस यांनी भारतावर टॅरिफ लावण्याच्या राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्पयांच्या निर्णयाच समर्थन केलं आहे. त्यांनी सुद्धा तोच तर्क दिलाय, जो ट्रम्प देत असतात. युद्ध रोखण्यासाठी रशियावर दबाव टाकण्यासाठी हा निर्णय घेतल्याच जेडी वेंस यांचं म्हणणं आहे. रशियाची तेल निर्यात कमी करुन त्यांना आर्थिक दृष्टया कमकुवत करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेतल्याच वेंस यांनी सांगितलं. टॅरिफ लावण्यामागे रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यात भारताची भूमिका जागतिक पातळीवर किती महत्त्वाची आहे, हे जेडी वेंस आपल्या बोलण्यातून अधोरेखित करतात. पण त्याचवेळी चीनवर असे कुठलेही प्रतिबंध न लावता ट्रम्प यांचं धोरण किती दुटप्पी, तकलादू आहे, हे स्पष्ट होतं.

अमेरिकेने भारतावर 50 टक्के टॅरिफ लावला आहे. यात 25 टक्के टॅरिफ सुरु आहे. येत्या 27 ऑगस्टपासून अतिरिक्त 25 टक्के पेनल्टी टॅरिफ सुरु होईल. रशियाकडून भारत तेल खरेदी करतो, म्हणून हा अतिरिक्त 25 टक्क टॅरिफ लावण्यात आला आहे. याच टॅरिफच्या मुद्यावरुनच सध्या भारत-अमेरिकेचे संबंध ताणले गेले आहेत. अमेरिकेत भारतीय वस्तू महाग झाल्या आहेत. त्यामुळे तिथले लोक दुसऱ्या पर्यायी वस्तुंचा शोध घेतली. त्यातून भारतीय अर्थव्यवस्थेच नुकसान होईल. काही सेक्टर्समधील नोकऱ्या संकटात येतील.

भारताने कधी तेल खरेदी सुरु केली?

भारताने वारंवार रशियाकडून तेल खरेदीच्या निर्णयाच समर्थन केलं आहे. रशियाकडून तेल खरेदी राष्ट्रीय हिताची असल्याच भारताच म्हणणं आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये रशियाने युक्रेन विरोधात युद्ध पुकारलं. त्यानंतर पाश्चिमात्य देशांनी रशियाकडून तेल खरेदी बंद केली. रशियावर निर्बंध आणले. त्यानंतर भारताने रशियाकडून स्वस्त दरात तेल खरेदी सुरु केली.

तर हेतू सफल कसा होणार?

भारताच्या तेल खरेदीमुळे रशियाला युद्धात अप्रत्यक्ष मदत होतेय, असा अमेरिकेचा दावा आहे. पण त्याचवेळी शेजारचा चीन रशियाकडून भारतापेक्षा जास्त तेल खरेदी करतोय, त्याने रशियाला युद्ध सुरु ठेवण्यासाठी बळ मिळत नाहीय का? या प्रश्नाच अमेरिकेकडे उत्तर नाहीय. युद्ध रोखण्यासाठी भारतावर टॅरिफ लावणाऱ्या ट्रम्प यांनी रशियावर मात्र कुठलेही नवीन प्रतिबंध लावलेले नाहीत. मूळ आजारावरच ते उपचार करणार नसतील, तर हेतू सफल कसा होणार?. रशियाचे राष्ट्रपती पुतिन आणि युक्रेनचे प्रमुख जेलेंस्की जेव्हा चर्चेसाठी एका टेबलावर येतील, तेव्हाच यातून काही मार्ग निघू शकतो.

‘कोणी तुमच्यावर जबरदस्ती करत नाहीय’

भारतावर टॅरिफ लावून ट्रम्प यांनी रशियाला शांतता चर्चेसाठी टेबलावर येण्यास भाग पाडलं, असं वेंस यांचं म्हणणं आहे. ‘रशियाने हत्या बंद केल्या, तर त्यांचा वर्ल्ड इकोनॉमीमध्ये पुन्हा समावेश करु’ असं वेंस म्हणाले. रशियाकडून तेल खरेदी ही भारत आणि विश्व दोघांच्या हिताची असल्याच परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर नुकतच म्हणाले. जयशंकर म्हणाले की, “हे हास्यासपद आहे, व्यापाराच समर्थन करणारं अमेरिकी प्रशासन दुसऱ्यासोबत व्यापार करण्याचे आरोप करतय” “जर, तुम्हाला भारताकडून तेल रिफाइंड प्रोडक्टमध्ये खरेदी करण्यात अडचण असेल, तर नका खरेदी करु. यासाठी कोणी तुमच्यावर जबरदस्ती करत नाहीय” असं जयशंकर स्पष्टपणे म्हणाले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.