विकासकामांचा वाद टोकाला, महिलेच्या पोटात लाथ मारली अन्… कल्याणमध्ये पुन्हा राडा
Tv9 Marathi August 25, 2025 04:45 PM

कल्याण तालुक्यातील निंबवली गावात कामाच्या वादातून दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. या हाणामारीमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. गावातील विकास कामांवरून सुरू असलेल्या जुन्या वादामुळे पोलीस पाटलाच्या पतीवर एका महिलेला मारहाण केल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे दोन्ही गटांनी एकमेकांवर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. ज्यात अनेक जण जखमी झाले. टिटवाळा पोलिसांनी दोन्ही बाजूंकडून परस्पर विरोधी तक्रारी दाखल केल्या असून दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे.

नेमकं काय घडलं?

कल्याणच्या निंबवली गावातील पोलीस पाटील उर्मिला केने यांचे पती उमेश केने आणि त्याच गावातील रहिवासी किरण केने यांच्यात गावातील कामांच्या वाटपावरून अनेक दिवसांपासून वाद होता. उमेश केने यांचा गट सर्व विकासकामे आपल्यालाच मिळावीत यावर आग्रही होता, तर किरण केने यांचा गटही या कामांमध्ये सहभागी होऊ इच्छित होता. या वादामुळे त्यांच्यात सतत कुरघोड्या सुरु होत्या. तसेच या जुन्या वादामुळे दोन गटांमध्ये तणाव वाढत होता.

आता याच वादातून एका वेगळ्या घटनेचा राग काढत उमेश केने यांनी किरण केने यांच्या पत्नीच्या पोटात लाथ मारली, असा आरोप किरण केने यांनी केला आहे. किरण केने यांच्या म्हणण्यानुसार, समृद्धी महामार्गावर कारला फास्टॅग लावण्यावरून झालेल्या वादाचा राग उमेश केने यांनी काढला. आपल्या पत्नीला मारहाण झाल्याचे पाहून किरण केने संतप्त झाले. त्यांचा उमेश केने यांच्यासोबत मोठा वाद झाला. थोड्या वेळातच हा वाद विकोपाला गेला. त्या दोन्ही गटांनी एकमेकांवर धारदार शस्त्रांनी हल्ला केला.

या हाणामारीत दोन्ही बाजूंचे लोक जखमी झाले आहेत. काही जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेनंतर दोन्ही गटांनी टिटवाळा पोलीस ठाण्यात एकमेकांविरोधात तक्रारी दाखल केल्या. यावेळी उमेश केने यांनी गंभीर आरोप केले. गावातील काही लोक त्यांची बदनामी करत होते. याबद्दल जाब विचारण्यासाठी गेलो असता, किरण केने आणि त्यांच्या 4 ते 5 साथीदारांनी धारदार शस्त्रांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला, असे उमेश केने म्हणाले. तर किरण केने यांनी गावातील सर्व कामे आपल्यालाच मिळावीत यासाठी पोलीस पाटलाच्या पतीने त्यांच्या पत्नीला मारहाण केल्याचा आरोप केला आहे.

गावात तणावपूर्ण शांतता

या दोन्ही तक्रारींनंतर, टिटवाळा पोलिसांनी दोन्ही गटांविरोधात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकूण दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. सध्या याचा पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे गावात तणावपूर्ण शांतता पाहायला मिळत आहे. सध्या कल्याण पोलीस परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.