पिंपरी, ता. २४ : रविवारची प्रसन्न सकाळ, ऊन-पावसाचा खेळ, अनेकांची सहकुटुंब उपस्थिती, पर्यावरण राखण्याची सामुहिकरित्या घेतलेली शपथ, एकत्रितरीत्या करण्यात आलेले वृक्षारोपण, त्यानंतर घेतले जाणारे फोटो असे चित्र ‘सकाळ माध्यम समूह’ आणि यशदा रिॲल्टी यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘माय ट्री-मैत्री’ या वृक्षारोपण मोहिमेत दिसून आले.
मुंबई-पुणे महामार्गालगत व भक्ती शक्ती चौकापासून जवळच असणाऱ्या परिसरात ही मोहीम रविवारी (ता.२४) पार पडली. विविध क्षेत्रांतील मान्यवर व्यक्तींसोबतच पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवड शहराच्या कानाकोपऱ्यातून आलेले शेकडो नागरिक, महिला, तरुण व विद्यार्थी यांची विशेष उपस्थिती होती. आपल्या घरातील मुलांसोबत झाडे लावताना अनेकांच्या चेहऱ्यावर आपला रविवार सत्कारणी लागल्याचे वेगळेच समाधान दिसत होते.
कार्यक्रमात सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर सहभागी झालेल्या नागरिकांनी सहकुटुंब कडुनिंब, पिंपळ, आपटा, अर्जुन, वड अशा नानाविध देशी झाडांचे रोपण केले. बहुतांश नागरिकांसाठी हा पहिलाच अनुभव असल्याने झाडे लावताना सर्वांच्याच विशेषतः लहानग्यांच्या चेहऱ्यावर उत्सुकता दिसून येत होती. अनेकांनी आपले आई, वडील, मुले यांच्यासोबत वृक्षारोपण केले. आपण लावलेल्या झाडांना आपल्या पूर्वजांची नावे देऊन या झाडांशी एक भावनिक नाते तयार केले. आयोजकांकडून वृक्षारोपणासाठी झाडे देण्यात आली होती. मात्र अनेकांनी उस्फूर्तपणे घरी तयार केलेली झाडे आणून लावली. झाडे लावल्यानंतर त्यांची निगा राखण्याचाही संकल्प सहभागींनी घेतला
ठळक मुद्दे
- सकाळी आठ वाजल्यापासूनच नागरिकांची गर्दी
- गर्भवती महिलांचीही उपस्थिती
- लहानग्यांमध्ये वृक्षारोपणाचा लक्षणीय उत्साह
- सहकुटुंब वृक्षारोपण; लावलेल्या झाडाला प्रिय व्यक्तीचे नाव
- स्वयंसेवकांकडून आलेल्या नागरिकांना मार्गदर्शन
- वृक्षारोपणाचे साहित्य, खत यांची उपलब्धता
- वृक्षारोपणानंतर ‘पीसीसीओई’च्या एनएसएस पथकाकडून परिसराची स्वच्छता