चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर फुलला स्वनिर्मितीचा आनंद
esakal August 25, 2025 08:45 PM

हडपसर ता. २४ : हातात मिळालेल्या मातीच्या गोळ्याला आपल्या चिमुकल्या हातांनी आकार देत शेकडो विद्यार्थ्यांनी गणेशमूर्ती साकारल्या. स्वनिर्मितीचा आनंद चेहऱ्यावर फुलवीत या विद्यार्थ्यांनी बनविलेल्या या गणेशमूर्ती ‘जय गणेश’च्या जयजयकारात घरीही नेल्या. निमित्त होते ‘सकाळ एनआयई’ (न्यूज इन एज्युकेशन) उपक्रमांतर्गत अमनोरा मॉल येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित ‘पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनविणे’ कार्यशाळेचे.
या कार्यशाळेत परिसरातील विविध शाळांसह ग्रामीण भागातीलही काही विद्यार्थी सहभागी झाले होते. उपलब्ध करून दिलेल्या मातीच्या साह्याने व केलेल्या मार्गदर्शनानुसार विद्यार्थ्यांनी आपली प्रतिभाशक्ती वापरून काही वेळातच गणपतीच्या आकर्षक मूर्ती साकारल्या. मातीच्या गोळ्यांच्या साहाय्याने आकारास आलेली बैठक, स्ट्रॉबेरीच्या आकाराने साकारलेले पोट, दोन वळकुंड्याने साकारलेले हात, त्यावर उलटा गाजराचा आकार लावून साकारलेला चेहरा, चेरीच्या आकाराने लावलेले कान, तर आपापल्या प्रतिभाशक्तीतून मुकुटाची सजावट करीत या विद्यार्थ्यांनी सोप्या पद्धतीने गणेशमूर्ती साकारली. आपण साकारलेल्या या कलाकृती वारंवार न्याहाळताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. सोहम कुंभार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेसाठी इंदापूर येथील प्रसन्न बंगाळे हे आपल्या मुलासह कार्यशाळेत सहभागी झाले होते. ते म्हणाले, ‘‘एनआयई नेहमीच नवनवीन उपक्रम राबवत असते. या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी मुलगा रुद्रने हट्ट केला. मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव देण्याचे काम या प्रशिक्षणातून होत असल्याचे दिसून आले.’’
‘‘क्रमिक अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांना अशा उपक्रमातून बाह्य ज्ञान प्राप्त होत असते. माझा मुलगा योगीराजला चित्रकलेची आवड आहे. ही कार्यशाळा त्या अनुषंगाने प्रतिभाशक्तीला चालना देणारी असल्याने त्याला यामध्ये सहभागी केले,’’ अशी भावना उमा हिरेमठ यांनी व्यक्त केली. ॲड. योगेश तुपे, आर्यन कदम पाटील, प्रियांका चव्हाण, माधवी वाळके आदींनी या उपक्रमाचे कौतुक केले.
दरम्यान, सहभागी विद्यार्थी व पालकांनी कार्यशाळेत बनविलेल्या गणेशमूर्तींसह सेल्फी व फोटो काढून घेतले. सहभागी विद्यार्थ्यांना या वेळी प्रमाणपत्रे देण्यात आली.
....................................
अमनोरा मॉल : ‘सकाळ एनआयई’च्या वतीने आयोजित पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनविणे कार्यशाळेत सहभागी झालेली चिमुकली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.