भारताचं टेन्शन वाढलं! पाकिस्तान आणि बांगलादेशने केला असा करार; आता…
GH News August 25, 2025 09:15 PM

भारत आणि अमेरिकेचे संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. अमेरिकेने भारताची कोंडी करण्याचा पुरेपूर प्लान आखला आहे. भारतीय वस्तूंवर अमेरिकेत 50 टक्के टॅरिफ लादला आहे. त्यामुळे भारतीय वस्तू 50 टक्क्यांनी अमेरिकेत महागणार आहेत. त्यामुळे भारतीय वस्तूंची मागणी घटणार आहे. भारताच्या निर्यातीवरही परिणाम होणार आहे. दुसरीकडे चीनसोबत पुन्हा चांगले संबंध प्रस्थापित करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. पण चीनवर विश्वास ठेवणं कठीण आहे. असं असताना भारतातील दोन शेजारी राष्ट्र डोकेदुखी ठरत आहे. बांगलादेशमध्ये राजकीय उलथापालथ झाल्यानंतर नवीन समीकरणं उदयास आली आहेत. दुसरीकडे, पाकिस्तान आणि बांग्लादेश यांच्यात मैत्रिपूर्ण संबंध प्रस्थापित होत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे भविष्यात भारताला आणखी सतर्क राहावं लागणार आहे. कारण पाकिस्तान कायमच दहशतवादाला खतपाणी घालत आला आहे. आता बांगलादेशशी चांगले संबंध प्रस्थापित करून तिथली भूमी दहशतवादी कारवायांना खतपाणी घालण्यासाठी वापरू शकतो. अशीच भीती आता एका करारानंतर गडद होताना दिसत आहे.

पाकिस्तान आणि बांगलादेशने सरकारी आणि राजनैतिक पासपोर्ट धारकांसाठी व्हिसा-मुक्त प्रवास करारावर स्वाक्षरी केली आहे. दोन्ही राष्ट्रांनी हा निर्णय घेतला आहे. मात्र या संधीचा फायदा घेऊन पाकिस्तान पुढे काय कुरापती करेल सांगता येत नाही. पाकिस्तानचे उपपंतप्रधान-परराष्ट्रमंत्री मुहम्मद इशाक दार आणि बांगलादेशचे परराष्ट्र व्यवहार सल्लागार मोहम्मद तौहिद हुसेन यांच्यातील प्रतिनिधीमंडळ पातळीवरील चर्चेनंतर व्हिसा-मुक्त कराराला औपचारिक मान्यता देण्यात आली. तर द्विपक्षीय व्यापाराला चालना देण्यासाठी कार्यगटाची स्थापना, परराष्ट्र सेवा अकादमी सहकार्य, न्यूज एजन्सी संवाद, अभ्यास भागीदारी, सांस्कृतिक देवाणघेवाण हे करारही केले आहेत.

इतकंच काय तर पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने बीएनपी आणि जमात ए इस्लामीसह अनेक राजकीय पक्ष्यांच्या भेटी घेतल्या. त्यांनी 1971 मध्ये बांगलादेशच्या स्वातंत्र्याला विरोध केला होता. त्यामुळे पाकिस्तानच्या मनात काय शिजते आहे याचा अंदाज नेटकरी सोशल मीडियावर बांधत आहे. दोन्ही देशाच्या शिष्टमंडळाने एक संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी दार यांनी स्पष्ट केलं की, ‘पाकिस्तान बांगलादेशसोबत भागीदारीचं एक नवं युग सुरु करू इच्छित आहे.’

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.