यंदा आशिया कप 2025 स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. तर 28 सप्टेंबरला अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. नियमांत बदल करण्यात आल्याने यंदा पहिल्यांदाच या स्पर्धेच्या इतिहासात 6 ऐवजी 8 संघ सहभागी होणार आहे. आयसीसी रँकिंगच्या जोरावर 5 संघ थेट पात्र ठरत होते. तर 1 संघ पात्रता फेरीतून निश्चित व्हायचा. मात्र बदललेल्या नियमांमुळे आणखी 2 संघांना संधी मिळाली. त्यामुळे यंदा 8 संघात थरार रंगणार आहे. या संघांना 4-4 नुसार 2 गटात विभागण्यात आलं आहे. या 8 पैकी आतापर्यंत 5 संघ जाहीर करण्यात आले आहेत. त्यानंतर आता 26 ऑगस्ट रोजी आशिया कप स्पर्धेसाठी सहाव्या संघाची घोषणा करण्यात आली आहे.
ओमानची या स्पर्धेत खेळण्याची ही पहिलीच वेळ आहे. ओमान घरच्या मैदानात झालेल्या एसीसी प्रीमियर कप 2024 स्पर्धेत उपविजेता ठरला. ओमानने यासह आशिया कप स्पर्धेचं तिकीट मिळवलं.
ओमान क्रिकेटने आशिया कप स्पर्धेसाठी 17 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. जतिंदर सिंह याच्याकडे ओमान संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. जतिंदरने गेल्या वर्षभरात उल्लेखनीय कामगिरी करुन टीम मॅनेजमेंटला प्रभावित केलंय. त्यामुळे जतिंदरचा या स्पर्धेतील आपल्या पहिल्याच हंगामात छाप सोडण्याचा प्रयत्न असणार आहे.
टीम मॅनेजमेंटने या 17 सदस्यीय संघात 4 नव्या खेळाडूंना संधी दिली आहे. या चौघांमध्ये सुफियान यूसुफ, झिक्रिया इस्लाम, फैजल शाह आणि नदीम खान यांचा समावेश आहे. या चौघांचा या संधीचं सोनं करुन संघात स्थान कायम राखण्याचा प्रयत्न असणार आहे.
ओमानसाठी सुफियान यूसुफ विकेटकीपर म्हणून जबाबदारी सांभाळणार आहे. विशेष म्हणजे या संघात हम्माद मिर्जा याचाही समावेश करण्यात आला आहे. हम्मादने 2024 साली झालेल्या एसीसी एमर्जिंग आशिया कप स्पर्धेत भारताविरुद्ध कडक खेळी केली होती. त्यामुळे ओमान टीमला या स्पर्धेत हम्मादकडून त्यापेक्षा मोठ्या खेळीची आशा असणार आहे.
12 सप्टेंबर, विरुद्ध पाकिस्तान
15 सप्टेंबर, विरुद्ध यूएई
19 सप्टेंबर, विरुद्ध टीम इंडिया
आशिया कप 2025 स्पर्धेसाठी ओमान टीम : जतिंदर सिंह (कर्णधार), हम्माद मिर्जा, विनायक शुक्ला (विकेटकीपर), सुफियान यूसुफ (विकेटकीपर), आशीष ओडेदरा, आमिर कलीम, मोहम्मद नदीम, सुफियान महमूद, आर्यन बिष्ट, करण सोनावले, जिक्रिया इस्लाम, हसनैन अली शाह, फैजल शाह, मोहम्मद इमरान, नदीम खान, शकील अहमद आणि समय श्रीवास्तव.