Kolhapur Gas Explosion : कोल्हापुरात गॅस पाईपलाईनचा स्फोट, चारजण जळाले; लहान मुलांचा समावेश, भिंतींना तडे
esakal August 27, 2025 04:45 AM

Kolhapur Accident News : घरगुती गॅसचा पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनमध्ये स्फोट झाल्याची भीषण घटना कळंबा जेल परिसरातील मनोरमा कॉलनीमध्ये आज रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. त्यामध्ये दोन लहान मुलांसह त्यांची आई आणि आजोबा जखमी झाले. इशिका अमर भोजणे (वय ३), प्रज्वल अमर भोजणे (वय साडेपाच), शीतल अमर भोजणे (२९), अनंत भोजणे (६०) अशी जखमींची नावे आहेत. त्यांना सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. स्फोटाची तीव्रता इतकी गंभीर होती, की त्यामध्ये घरातील प्रापंचिक साहित्याचे मोठे नुकसान झाले.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, मनोरमा कॉलनीमध्ये पाईपलाईनच्या माध्यमातून गॅस पुरवठा सुरू करण्यात आला आहे. त्यात इथल्या भोजणे कुटुंबीयांच्या घरी आजच या पाईपलाईनची जोडणी करण्यात आली. घरातील हॉलमध्ये आजोबा अनंत यांच्यासमवेत इशिका आणि प्रज्वल बसले होते. शीतल या किचनमध्ये स्वयंपाक करत होत्या. त्याच दरम्यान अचानकपणे गॅस पाईपलाईनमधून गॅस येऊ लागला आणि काही क्षणातच गॅसचा स्फोट झाला. त्यामध्ये शीतल यांच्यासह आजोबा आणि दोन लहान मुले जखमी झाले. त्यातील शीतल या तर पेटलेल्या स्थितीतच घराबाहेर पळत आल्या.

स्फोटाचा आणि शीतल, लहान मुलांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून कॉलनीतील नागरिकांनी भोजणे कुटुंबीयांच्या घराकडे धाव घेतली. शेजाऱ्यांनी शीतल यांच्या अंगावर चादर आणि इतर काही साहित्याच्या माध्यमातून आग आटोक्यात आणली. त्यांच्यासह प्रज्वल, इशिका आणि अनंत यांना तातडीने एका टेम्पोमध्ये घालून सीपीआर रुग्णालयामध्ये दाखल केले. त्यातील शीतल आणि अनंत गंभीर आहेत. महापालिकेचे अग्निशमन दलाचे दोन बंब तत्काळ दाखल झाले. त्यांनी आगीची स्थिती नियंत्रणात आणली. शीतल यांचे पती अमर भोजणे ताराबाई पार्कातील एका हॉटेलमध्ये कुक म्हणून नोकरी करतात.

Ajit Pawar Kolhapur : कोल्हापुरात क्रीडा विभागाचा खेळखंडोबा, अजित पवारांचे अधिकाऱ्यांच्या खेळीवर खडे बोल

खिडकीच्या काचा फुटून समोरच्या घरात

या स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती, की त्यात भोजणे कुटुंबीयांच्या घराच्या भिंतीला तडे गेले. हॉल, किचन आणि बेडरूममधील साहित्य जळून खाक झाले. त्याबरोबरच त्यांच्या खिडकीच्या काचा फुटून समोरच्या रमेश पाटील यांच्या घरात गेल्या. प्रापंचिक साहित्याचे नुकसान झाले.

दहा लाखांचे नुकसान

दरम्यान, अग्निशमन दलाचे बंब आणि जवान घटनास्थळी येईपर्यंत त्या कॉलनीतील नागरिकांनी गॅस पाईपलाईनचे बटन बंद केल्याने आग आटोक्यात आणली. घरातील प्रापंचिक साहित्याला लागलेली आग अग्निशमन दलाच्या जवानांनी आटोक्यात आणली. आगीत घराचे सुमारे दहा लाखांचे नुकसान झाले.

स्विच सुरू राहिल्याने....

भूमिगत गॅस वाहिनीमधून भोजने कुटुंबीयांना गॅस पुरवठा करण्यासाठी नवीन पाईपलाईन जोडण्याचे काम सोमवारी सायंकाळी पावणे सहा वाजता सुरू होते. कर्मचाऱ्यांनी गॅस जोडणीचे काम अपूर्ण असताना गॅस पुरवठा करणाऱ्या पाईपचा स्विच सुरू ठेवला होता. त्यामुळे घरामध्ये सर्वत्र गॅस पसरून अचानक स्फोट झाला.

कंत्राटदाराचे दुर्लक्ष व कर्मचाऱ्यांचा बेफिकीरपणामुळे दुर्घटना घडल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. दरम्यान महिन्यापूर्वी कोल्हापूर- गारगोटी राज्य महामार्गावर लाकडी खांब उभा करण्यासाठी पार मारली होती. त्यामुळे वाहिनीला गळती लागली होती.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.