Pune Satara Highway Traffic Jam : पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील कापूरहोळजवळील हरिश्चंद्री गावाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.
गणेशोत्सवाच्या (Ganesh Chaturthi) पार्श्वभूमीवर गावी जाणाऱ्या गणेशभक्तांची प्रचंड गर्दी झाल्याने महामार्गावर वाहनांचा ताफा एकाचवेळी रस्त्यावर आला आहे. पुणे, मुंबईसारख्या महानगरांत नोकरीनिमित्त वास्तव्य करणारे नागरिक गणेशोत्सवासाठी गावी परतत असल्याने महामार्गावर गाड्यांचा मोठा ओघ वाढला आहे.
याशिवाय, हरिश्चंद्री परिसरात सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामामुळे महामार्गावरील वाहतूक आणखीनच विस्कळीत झाली आहे. त्यामुळे पुण्याहून साताऱ्याकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या आहेत.
दरम्यान, प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. महामार्गावरील विविध ठिकाणी अशीच परिस्थिती दिसून येत असून, प्रशासनासमोर वाहतूक सुरळीत करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.