सर्वप्रथम आमच्या लाखो वाचकांना श्रीगणरायाच्या आगमनाप्रीत्यर्थ अनेक उत्तम शुभेच्छा! (श्री गणेशा,, यांस बुद्धी देवो, ही शुभेच्छा समाविष्ट! लेको, काहीही वाचता तुम्ही…असो.) गणेश विघ्नहर्ता आहे, सुखकर्ता आहे. भक्ताच्या घरी येवोन सारे काही शुभमंगल करायचे, आणि गावी निघोन जायचे हा बाप्पाचा परिपाठ आहे.
तथापि या मंगलमय उत्सवात काही पथ्ये पाळली पाहिजेत. ही पथ्ये पाळली तर गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित होईल, यात आम्हाला शंका वाटत नाही. पथ्ये पुढीलप्रमाणे :-
१. माणसे प्रामुख्याने तीन प्रकारची असतात. एक, आमच्या घरी गणपती आहे असे सांगणारा. दुसरा प्रकार, आमचा गणपती मोठ्या काकांकडे गावाला असतो, असे सांगणारा आणि तिसरा, दरवर्षी २१ गणपतींचे दर्शन घेण्याचा संकल्प व्यक्त करुन तीन-चार गणपती बघून येणारा. आणखीही काही प्रकार आहेत, पण ते सामान्य आहेत. आपण कुठे बसतो, याचा शोध घ्यावा.
२. गणेशोत्सवाच्या काळात दिवाळीतील लुकलुकणाऱ्या दिव्यांची माळ काढलीच पाहिजे असे नव्हे! ती काही श्रीगणेशाची पूर्वअट नाही. जमेल तसे घरगुती डेकोरेशन करावे. देवाला चालते.
३. दुसऱ्यांच्या घरी गणरायाच्या दर्शनासाठी जाण्यापूर्वी सुट्ट्या पैशांची सोय करुन मगच घराबाहेर पडावे. सुट्टे पैसे आहेत, म्हणून रिक्षावाल्यास अर्पण करू नये, मग पंचाईत होते. विघ्नहर्त्यासमोर पैसे टाकताना तबकातील बाकीच्या नोटा-नाणी किती ‘मोठ्या’ आहेत, हे न्याहाळू नये. आपण आपल्या मगदुराप्रमाणे ठेवावेत.देवाला चालते.
४. दर्शनासाठी आल्यागेल्या भक्त-आप्तांना (हे दोन्ही या दिवशी प्राय: एकच असतात.) विनाकारण मसाला दूध, वेफर्स, आदी पदार्थ देऊ नयेत. मसाला दूध तीन लिटर घेतले तर उरते, आणि सहा लिटर घेतले तर कमी पडते!!
५. येणाऱ्याजाणाऱ्या भक्त-आप्तास प्रसादाचे पेढे आणि अन्य तदनुषंगिक व्यंजने पुडीत बांधून घरी नेण्यास द्यावीत.
६. मोदक गणपतीला आवडतात, असे सांगून स्वत:च बेमुदत हाणण्याची पूर्वापार प्रथा मानवजातीत आहे. मोदकाचा आस्वाद घेताना ‘बासमती तांदळाची पिठी बरी की ब्रँडेडच बरी’, ही चर्चा फोल असते. ब्रँडचे नाव आम्ही घेणार नाही, पण ब्रँडेडच वापरावी. चांगले झाले तर आपण केले म्हणावे, फसले तर ब्रँडेड पिठीची बदनामी सोयीची जाते.
७. हल्ली एका पाहणीत आढळून आले आहे की, बहुतेकांना आरत्या पाठ नाहीत. दुसऱ्या कोणाकडून ‘क्लू’ मिळाल्याशिवाय आरतीचे कडवे पुढे सरकत नाही. आरत्यांची बारकी बुके येतात. ती ऐनवेळी सांपडली नाहीत की घोळ होतो.
८. मंत्रपुष्पांजली म्हणताना शंख वाजवावा अशी अनिवार इच्छा काही महाभागांना होते. हे असले प्रकार जपूनच करावेत! आपले काम काय, आपले वजन काय, प्रकृतीचे मान काय, हे सारे तपासूनच शंख हाती घ्यावा.
९. आपण काय हृदयनाथ मंगेशकर नाय की अजय अतुल किंवा शंकर महादेवन नाय! उगाच कशाला उंटाचा मुका घ्यावा? मंत्रपुष्प म्हणताना उगाच धीरगंभीर आवाज लावायचा ट्राय मारु नये. कानाला लय विनोदी वाटतंय! कुछ समझे?
१०. झांजा किंवा टाळ्या वाजवताना त्या एका तालात वाजतील, असा प्रयत्न तरी करावा. तिसरीकडेच बघत चौथ्याच तालात बेताल झांजा वाजवल्याने रसभंग होतो.
११. आपल्या आळीतला उत्सव हा जगभर गाजावा, असे वाटणे स्वाभाविक असले तरी आसपासच्या रहिवाश्यांना उलट वाटेल असे वागणे टाळावे. विनायकाला मोदक आवडत असला तरी डीजे अजिबात चालत नाही, हे शास्त्र लक्षात घ्यावे.
मोरया रे!!