मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेना रवाना झाले आहेत. आज रात्री ते शिवनेरीवर मुक्कामी असणार आहेत. 29 ऑगस्टला मनोज जरांगे पाटील हे मुंबईत पोहोचणार असून आझाद मैदानात उपोषणाला बसणार आहेत. मात्र आता रात्रीच सरकारचे प्रतिनिधी मनोज जरांगे पाटलांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आज रात्री ही भेट होणार असल्याचे बोलले जात आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
सरकारचे प्रतिनिधी रात्रीच जरांगे पाटलांना भेटणार…सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज रात्री सरकारचे प्रतिनिधी मनोज जरांगे यांना भेटणार आहेत. मनोज जरांगे यांच्यासोबत वाहनांची संख्याही जास्त आहे, त्यामुळे ऐन गणेशोत्सवाच्या काळात वाहनांची गर्दी होण्याची शक्यता आहे. याबाबत सरकारचे काही प्रतिनिधी जरांगे पाटलांना भेटण्याची शक्यता आहे. मात्र या प्रतिनिधींमध्ये कोणते नेते असणार याबाबत माहिती समोर येऊ शकलेली नाही. एक वरिष्ठ नेता जरांगे पाटलांची भेट घेणार असल्याचे बोलले जात आहे. हा नेता सरकारचा निरोप जरांगे पाटलांनी देणार असल्याचेही बोलले जात आहे.
सरकारकडून प्रस्ताव दिला जाणार?सरकारच्या प्रतिनिधींकडून मनोज जरांगे पाटील यांच्या समोर आंदोलन मागे घेण्याबाबत प्रस्ताव ठेवला जाणार का? जरांगे पाटलांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला जाणार का? किंवा सरकारकडून काही आश्वासन दिले जाणार का? तसेस सरकारने जर काही प्रस्ताव दिला तर तो जरांगे पाटील स्वीकारणार का? हे आणि यासारखे प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत. मात्र आता या सर्व प्रश्नांची उत्तर अल्पावधित समोर येणार आहेत.
सरकार चर्चेसाठी तयार – विखे पाटीलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकार मनोज जरांगे पाटलांसोबत चर्चा करण्यासाठी तयार असल्याचे म्हटले आहे. ‘चर्चा करण्यासाठी आंदोलनकर्त्यांची तयारी पाहिजे, त्यांची तयारी असेल तर आम्ही देखील तयार आहोत, मात्र त्यासाठी दोन्हीही बाजूने समन्वय झाला पाहिजे. उच्च न्यायालयाच्या निर्देशाबाबत जरांगे पाटलांनी निर्णय घ्यायचा आहे, शासनाची यात कुठलीही भूमिका नाही, सरकारने यापूर्वीही प्रतिष्ठेचा प्रश्न केलेला नव्हता आणि आताही नाही’ असं विधान विखे पाटलांनी केलं आहे.