आशिया कप स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होणार, हे काही दिवसांपूर्वी निश्चित झालं आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यावर बहिष्कार घालण्यात यावा, अशी मागणी क्रिकेट चाहत्यांसह देशवासियांकडून केली जात होती. पाकिस्तान विरूद्धच्या सामन्याला विरोध वाढत होता. त्यामुळे सामना रद्द केला जाणार का? असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला होता. मात्र भारताच्या क्रीडा मंत्रालयाने टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध खेळणार असल्याचं स्पष्ट केलं. मात्र दोन्ही संघात द्विपक्षीय मालिका होणार नसल्याचं क्रीडा मंत्रालयाने स्पष्ट केलं. त्यामुळे आता पुन्हा एकदा 2 कट्टर प्रतिस्पर्धी आमनेसामने येणार आहेत. टीम इंडियाच हा सामना जिंकेल, अशा विश्वास चाहत्यांना आहे. भारत-पाकिस्तान सामन्याबाबत अनेक भाकीतं केली जातात. आता पाकिस्तानचा माजी फिरकीपटू दानिश कानेरिया याने या महामुकाबल्याबाबत भविष्यवाणी केली आहे.
दानिशने भारत-पाकिस्तान यांच्यापैकी कोण जिंकणार? हे सांगितलं आहे. “टीम इंडिया पाकिस्तानला सहज पराभूत करेल, मला खात्री आहे. टीम इंडियात एकसेएक स्टार खेळाडू आहेत. टीम इंडियाचा विजयाची प्रबळ दावेदार आहे”, असं दानिशने म्हटलं. दानिशने त्याच्या युट्यूब चॅनेलवर ही प्रतिक्रिया दिली. आशिया कप 2025 स्पर्धत 8 संघ सहभागी होणार आहेत. टीम इंडिया आणि पाकिस्तान ए ग्रुपमध्ये आहेत.
यंदा आशिया कप स्पर्धेत उलटफेर पाहायला मिळेल, असा अंदाज दानिशने व्यक्त केला. तसेच दानिशने अंतिम फेरीत कोण पोहचणार? हे देखील सांगितलं. “यावेळेस अंतिम सामन्यात टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात अंतिम सामना होऊ शकतो. स्पर्धा टी 20 फॉर्मेटने होत आहे. अफगाणिस्तान ज्या प्रकारे टी 20 फॉर्मेटमध्ये खेळत आहेत ते पाहता ते अंतिम फेरीत पोहचतील” असं दानिशने नमूद केलं.
“भारतीय संघ फार मजबूत आहे, त्यामुळे ते अंतिम फेरीत पोहचतील. तसेच अफगाणिस्तान इतर संघांना आव्हान देत अंतिम फेरीत पोहचेल. पाकिस्तानसाठी अफगाणिस्तान मोठं आव्हान असणार आहे”, असंही दानिश कानेरियाने म्हटंल.
दरम्यान आशिया कप स्पर्धेत भारत-पाकिस्तान यांच्यात साखळी फेरीव्यतिरिक्त आणखी 2 आणि एकूण 3 सामने होऊ शकतात. उभयसंघात साखळी फेरीतील सामना 14 सप्टेंबरला होणार आहे. त्यानंतर समीकरण जुळल्यास 21 सप्टेंबरला दोन्ही संघ सुपर 4 मध्ये आमनेसामने येतील. तसेच दोन्ही संघात आंतिम सामना होऊ शकतो.