राहुरीमध्ये एलसीबीची माेठी कारवाई! 'दोनशे टन सुपारीसह तंबाखू जप्त'; साडेआठ कोटींचा मुद्देमाल हस्तगत
esakal August 29, 2025 10:45 PM

अहिल्यानगर: स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने राहुरी येथील चिंचोली शिवारातून दोनशे टन लाल सुपारीसह आठ टन तंबाखू जप्त केली आहे. या कारवाईत १३ ट्रकसह आठ कोटी ४३ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. दरम्यान, ही सुपारी व तंबाखू कर चुकवून आणली असल्याचे प्राथमिक पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक राहुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्याची माहिती घेत असताना निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना गोपनीय माहिती मिळाली की, गुटखा बनविण्यासाठी लागणारी निकृष्ट दर्जाची लाल रंगाची सुपारी व तंबाखूने भरलेले ट्रक अवैधपणे गुजरातकडे जात आहेत. सध्या हे ट्रक राहुरी तालुक्यातील चिंचोली शिवारात आहेत. या माहितीनुसार कबाडी यांच्या पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकून सुपारी व तंबाखूने भरलेल्या १३ ट्रक ताब्यात घेतल्या. या ट्रक कर्नाटककडून गुजरातकडे निघाल्या होत्या. ट्रकमध्ये गुटखा बनविण्यासाठी लागणारी सुपारी व तंबाखू होती.

शासनाचा कर चुकवून व बनावट बिले तयार करून या ट्रक ही वाहतूक करत होत्या. चालकांकडे विचारपूस केली असता ही तंबाखू व सुपारी वाहन मालक मोहंमद अक्रम (कर्नाटक) यांच्या मालकीची असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्याकडे कोणताही वाहतूक परवाना, तसेत संबंधित मालाची कोणतीच बिले आढळून आली नाहीत. जी बिले होती ती हस्तलिखित व बनावट होती. त्यावर माल पोहोचविण्याचा पत्ता दिल्ली येथील होता. या सुपारी व तंबाखूची वाहतूक कर चुकवून, तसेच बनावट बिले तयार करून होत असल्याचे आढळून आल्याने पथकाने १३ ट्रकसह सुमारे पान ४ वर दोनशे टन लाल सुपारी व आठ टन तंबाखू जप्त केली, तसेच चालकांना देखील चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

ताब्यात घेतलेले ट्रकचालक

अबरार अल्लाउद्दीन खान (वय ३०, रा. हरियाणा), तोफिक हनिफ खान (वय ३०, रा. हरियाणा), अक्रम इसब खान (वय २८, रा. राजस्थान), इर्शाद ताजमोहंमद मेहू (वय ३०, रा. हरियाणा), अशोक पोपट पारे (वय ४७, रा. मिरजगाव, ता. कर्जत, अहिल्यानगर), रखमाजी लक्ष्मण मगर (वय ३४, पाटेगाव, ता. कर्जत, अहिल्यानगर), कालीदास बाबुराव काकडे (वय ६३, रा. सावडी, ता. करमाळा, जि. सोलापूर), आसिफ पप्पू मेव (वय २६, रा. हरियाणा), जमशेर अब्दुल रज्जाक खान (वय ४५, रा. हरियाणा), सचिन जिजाबा माने (वय ३९, रा. केडगाव, अहिल्यानगर)

हा मुद्देमाल जप्त

पथकाने सहा कोटी १७ लाख ८५ हजार रुपये किमतीची २०६ टन लाल सुपारी, १५ लाख ६० हजार रुपये किमतीची सात हजार ८०० किलो तंबाखू व दोन कोटी १० लाख रुपये किमतीची १३ वाहने असा एकूण आठ कोटी ४३ लाख ४५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे, तसेच चालकांना देखील चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

Maratha Reservation: 'भरपावसात मनोज जरांगेंवर पुष्पवृष्टी'; शेंडी, नेप्ती चौफुला येथे समर्थकांकडून उत्स्फूर्तपणे स्वागत

अवैधपणे मिळून आलेल्या या सुपारी व तंबाखूबाबत खात्री करण्यात आली. त्यानंतर कावाई करण्यात आली. मिळून आलेल्या मुद्देमालाबाबत कारवाईसाठी राज्य कर सह आयुक्त, वस्तू आणि कर सेवा विभाग यांच्याशी पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे, तसेच पोलिसांनी या सुपारी व तंबाखूबाबत संबंधित दोन फर्मकडून माहिती मागविलेली आहे.

- सोमनाथ घार्गे, पोलिस अधीक्षक

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.