Manoj Jarange Patil Mumbai Protest : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठीमनोज जरांगे यांनी मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण चालू केले आहे. काहीही झालं तरी मी हे उपोषण मागे घेणार नाही, अशी थेट भूमिका जरांगे यांनी घेतली आहे. तसेच जरांगे यांनी मला गोळ्या घातल्या तरी चालेल. मला तरुंगात टाकले तरी मी तुरुंगात उपोषण करेन, असेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान जरांगे यांच्या भूमिकेनंतर राज्य सरकारने घालून दिलेल्या अटींचा मुद्दा उपस्थित होत आहे. तसेच या अटींमुळे नवा घोळ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नेमकी अटक काय आहे?मनोज जरांगे यांनी 29 ऑगस्टपासून मुंबईत उपोषण करण्याची अगोदरच घोषणा केली होती. मुंबईतील गणेशोत्सवाची गर्दी लक्षात घेता त्यांना मात्र आझाद मैदानावर आंदोलन करण्यास परवानगी नाकारण्यात आली होती. जरांगे यांच्या ठाम भूमिकेनंतर मात्र सरकारने नमते घेत जरांगे यांना फक्त एका दिवसासाठी आंदोलन करण्याची परवानगी दिली होती. 29 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 9 वाजेपर्यंतच त्यांना आंदोलन करण्यात येणार होते. त्यानंतर हे आंदोलन थांबवावे सरकारने अप्रत्यक्षपणे सुचवले होते. तसेच आझाद मैदानावरील 5000 हजार लोकांची मर्यादाही ओलांडू नये, असेही सरकारने सांगितले होते.
नेमकी अडचण काय आहे?मराठा आंदोलक आणि मनोज जरांगे यांची भूमिका लक्षात घेता आता सरकारने घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन होण्याची शक्यता आहे. आझाद मैदानावर आंदोलकांची संख्या 5000 पेक्षा जास्त झाली आहे. दुसरीकडे जरांगे यांनी मी माघार घेणार नसल्याचे सांगितल्याने एका दिवसापुरत्या आंदोलनाच्या नियमाचेही उल्लंघन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता नेमके काय होणार? सरकार यातून काही मार्ग काढणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
जरांगे यांना आंदोलनासाठी मुदतवाढ मिळणार का?दरम्यान, सरकारने जरांगे यांना आंदोलन करण्यासाठी मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी केली जात आहे. गेवराई मतदारसंघाचे आमदार विजयसिंह पंडित यांनी मी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार असून मुदत वाढवण्याची मागणी करणार आहे, असे सांगितले आहे. त्यामुळे जरांगे यांच्या आंदोलनाला सरकार मुदतावाढ देणार का? याबाबत संध्याकाळपर्यंत काही निर्णय होणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.