PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेत नाशिकचे दीड लाख शेतकरी वंचित
esakal August 30, 2025 12:45 AM

नाशिक: पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेमधून अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लाभतो आहे, पण नाशिक जिल्ह्यातील एक लाख ६३ हजार ४४६ शेतकरी आजही योजनेच्या अनुदानापासून वंचित असल्याची खात्रीलायक माहिती मिळत आहे. परिणामी या शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.

देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने शेतकरी सन्मान योजना आणली. या योजनेमध्ये दर वर्षी शेतकऱ्यांना तीन टप्प्यांत दोन हजार याप्रमाणे सहा हजार रुपये वितरित केले जातात. महाराष्ट्रातील महायुती सरकारने या योजनेत पुढाकार घेत केंद्राप्रमाणे सहा हजार रुपयांचे अनुदान सुरू केले.

त्यामुळे राज्यातील लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्षाकाठी अनुदानाची १२ हजार रुपयांची रक्कम जमा होते. दरम्यान, नाशिक जिल्ह्यात पाच लाख ३५ हजार ८५९ शेतकऱ्यांनी या योजनेत समाविष्ट होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात मात्र ६९.५० टक्केच शेतकऱ्यांची नोंद झाली.

Agriculture News : गावात मृद चाचणी, तरुणांना रोजगाराची संधी; जिल्ह्यात पंधरा ठिकाणी प्रयोगशाळा

जिल्ह्यातील एकूण लाभार्थ्यांपैकी तीन लाख ४६ हजार २०८ शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ मिळत आहे, तर २६ हजार २०५ लाभार्थी शेतकरी सध्या योजनेत निष्क्रिय असून, त्यामागे तांत्रिक बाबी कारणीभूत आहेत; परंतु आजही एक लाख ६३ हजार ४४६ शेतकऱ्यांची योजनेमध्ये नोंदणीच नसल्याची बाब समोर आली आहे. परिणामी संबंधित शेतकऱ्यांवर हक्काच्या अनुदानापासून वंचित राहण्याची वेळ ओढावली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर संबंधित शेतकऱ्यांकडून लवकरात लवकर अनुदान सुरू करावे, असा सूर आळवला जात आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.