Weather Update : गोवा, कोकण किनारपट्टीवर मान्सून पुन्हा सक्रिय; मुसळधार पावसाची शक्यता, मुंबईत 'हवामान'ची स्थिती कशी?
esakal August 30, 2025 12:45 AM

Mumbai Rain Update : गणेशोत्सवाच्या आगमनाच्या दिवशी, तसेच दीड दिवसांच्या गणपती विसर्जनावेळी (Ganeshotsav Rain Update) कोकण व महामुंबई परिसरात अधूनमधून जोरदार सरींची नोंद झाली. सिंधुदुर्ग आणि गोवा भागात गेल्या २४ तासांत १७० मिमीहून अधिक पाऊस पडला. मात्र, उत्तर कोकणात पावसाचा जोर तुलनेने कमी होता.

कोकणातील सर्व जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट

मुंबई वगळता कोकणातील सर्व जिल्ह्यांसाठी हवामान खात्याने आज (शुक्रवार) यलो अलर्ट जारी केला असून मुंबईत मध्यम स्वरूपाच्या सरींची शक्यता आहे. गुरुवारी सकाळपासून संध्याकाळपर्यंत महामुंबई परिसरात २० ते ४० मिमी दरम्यान पाऊस नोंदवला गेला.

दरम्यान, ओडिशाच्या दक्षिण किनाऱ्यावर व लगतच्या भागात तीव्र कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून, त्यासोबतच चक्रीवादळसदृश स्थिती व पूर्व-पश्चिम वाऱ्यांची व्यवस्था सक्रिय झाली आहे. पश्चिमेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांच्या प्रभावामुळे गोवा व कोकण किनारपट्टीवर मान्सून पुन्हा जोरदार सक्रिय झाला आहे.

सिंधुदुर्ग-गोव्यात १७० मिमीहून अधिक पाऊस

रत्नागिरी हवामान केंद्रावर बुधवारी सकाळी ८.३० पासून गुरुवार सकाळपर्यंतच्या २४ तासांत ९५ मिमी पावसाची नोंद झाली. संगमेश्वर येथे ८१ मिमी, दोडामार्ग येथे १७२ मिमी, कुडाळ येथे १०६ मिमी तर वैभववाडी येथे १११ मिमी पाऊस पडला. गोव्यात काणकोण येथे १५४ मिमी तर केपे येथे तब्बल १८० मिमी पाऊस नोंदवला गेला. या पार्श्वभूमीवर दक्षिण कोकणासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

महामुंबई परिसरात गुरुवारी सकाळी ठाणे व डोंबिवली येथे जोरदार सरी कोसळल्या. मात्र, मुंबई शहरात तुलनेने पावसाचे प्रमाण कमी होते. कुलाबा वेधशाळेत केवळ ०.२ मिमी, तर सांताक्रूझ येथे २.८ मिमी पावसाची नोंद झालीये.

पालघर-ठाण्यात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मुंबईत सोमवारपर्यंत फक्त मध्यम स्वरूपाच्या सरी सुरू राहतील. तर रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. आज (शुक्रवार) पालघर व ठाणे जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून शनिवारी व रविवारी मध्यम सरी सुरू राहतील. सोमवारी पुन्हा एकदा पालघर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढू शकतो, असा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.