'ड्राय डे'ला मध्यभागात मद्य विक्री
esakal August 30, 2025 12:45 AM

पुणे, ता. २८ : गणेशोत्सवामुळे शहर आणि जिल्ह्यात बुधवारी (ता. २७) मद्य विक्रीला बंदी (ड्राय डे) घातली असतानाही मद्य विक्री करणाऱ्या मटका अड्डाचालकासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी रात्री खडक पोलिसांच्या पथकाने शुक्रवार पेठेत छापा टाकून ही कारवाई करत देशी, विदेशी दारूचा साठा जप्त केला आहे.
वैभव विजय डोंगरे (वय २६), गुड्डू कुमार भोलाकुमार कुमार (वय २६) आणि अड्डाचालक नंदू नाईक (रा. सर्व शुक्रवार पेठ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिस कर्मचारी आशिष चव्हाण यांनी खडक ठाण्यात फिर्याद दिली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून बुधवारी संपूर्ण जिल्ह्यात मद्य विक्रीला बंदी घातली होती. मध्य भागात दारू विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी नजर ठेवली होती. त्यानुसार बुधवारी सायंकाळी खडक ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक कुलदीप व्हटकर, आशिष चव्हाण, हर्षल दुडूम, किरण ठवरे आदींसह पथक गस्तीवर होते. या वेळी शुक्रवार पेठेतील शाहू चौक परिसरात एका उपाहारगृहाच्या पाठीमागील खोलीत बेकायदा मद्यविक्री सुरू असल्याची माहिती चव्हाण यांना मिळाली. त्यांच्या पथकाने छापा टाकत वैभव डोंगरे व गुडुकुमार यांना ताब्यात घेतले. नाईक याच्या सांगण्यावरून मद्यविक्री करत असल्याची माहिती डोंगरे आणि कुमार यांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी नाईकसह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.