भारतीय संघ सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात आशिया कप 2025 स्पर्धेसाठी 4 सप्टेंबरला दुबईसाठी रवाना होणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यानंतर 5 दिवसांनी आशिया कप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. स्पर्धेतील पहिला सामना हा 9 सप्टेंबरला होणार आहे. एका ट्रॉफीसाठी या स्पर्धेत 8 संघात चुरस असणार आहे. बीसीसीआय निवड समितीने या स्पर्धेसाठी भारतीय संघात युवा आणि अनुभवी खेळाडूंना संधी दिली आहे. या स्पर्धेला आता काही दिवसांचा अवधी बाकी आहे. त्याआधी भारतासाठी आनंदाची बातमी मिळाली आहे.
भारताच्या स्टार खेळाडूला तब्येत बिघडल्याने दुलीप ट्रॉफी स्पर्धेत सहभागी होता आलं नाही. मात्र आता खेळाडू पूर्णपणे बरा झाला आहे. इतकंच नाही तर या खेळाडूने आशिया कप स्पर्धेआधी सरावालाही सुरुवात केली आहे. त्यामुळे भारताला दिलासा मिळाला आहे.
आशिया कप स्पर्धेआधी भारताचा उपकर्णधार शुबमन गिल याची तब्येत बिघडली होती. त्यामुळे भारतीय संघाची डोकेदुखी वाढली होती. शुबमनला आजारामुळे दुलीप ट्रॉफी स्पर्धेतील सामन्यातही सहभागी होता आलं नाही. मात्र आता काही दिवसांनंतर शुबमनने आशिया कप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर सरावाला सुरुवात केली आहे. शुबमनचा सोशल मीडियावर सराव करतानाचा फोटो सोशल माीडियावर व्हायरल झाला आहे.
दरम्यान आशिया कप स्पर्धेनिमित्ताने शुबमनचं टी 20i संघात वर्षभरानंतर पुनरागमन झालं आहे. शुबमनने अखेरचा टी 20i सामना 30 जुलै 2024 रोजी खेळला होता. शुबमनने टी 20i कारकीर्दीत आतापर्यंत 21 सामने खेळले आहेत. शुबमनने या दरम्यान 30.42 च्या सरासरीने 578 धावा केल्या आहेत. शुबमनने या दरम्यान 1 शतक आणि 3 अर्धशतकं झळकावली आहेत.
शुबमनचा जोरदार सराव
दरम्यान शुबमन इंग्लंड दौऱ्यानंतर थेट आशिया कप स्पर्धेनिमित्ताने मैदानात उतरणार आहे. शुबमन गिल याने इंग्लंड विरुद्ध कसोटी कर्णधार म्हणून पदार्पण केलं. शुबमनने इंग्लंड विरुद्धची 5 सामन्यांची कसोटी मालिका कर्णधार आणि फलंदाज म्हणून गाजवली. शुबमनने ही मालिका 2-2 ने बरोबरीत राखण्यात यश मिळवलं. तसेच शुबमनने या 5 सामन्यांमध्ये 75.40 च्या सरासरीने एकूण 754 धावा केल्या. शुबमनने या दरम्यान 4 शतकं आणि 1 द्विशतक झळकावलं. त्यामुळे आता शुबमन टेस्टनंतर टी 20I क्रिकेटमध्ये कशी कामगिरी करतो? याकडे क्रिकेट चाहत्यांची नजर असणार आहे.