आताही मला सरकारने गोळ्या घातल्या तरी मी बलिदान द्यायला तयार आहे. मी मरण पत्करायला तयार आहे, पण मागे हटणार नाही असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानात बेमुदत आमरण उपोषणाला सुरवात केली. सातत्याने 48 तास प्रवास करून अखेर मनोज जरांगे पाटील आज सकाळीन मुंबईतील आझाद मैदानात दाखल झाले. हजारो आंदोलकांच्या गर्दीतून त्यांच्या गाडीला वाट काढणंही मुश्किलं झालं होतं. अखेर दहाच्या सुमारास ते आझाद मैदानात आले आणि मंचावर चढून छत्रपती शिवरायांना अभिवादन करून त्यांनी उपस्थितांना संबोधित केलं. मुंबईत जाळपोळ किंवा दगडफेक करू नका असं सांगत जरांगे पाटील यांनी आंदोलकांना शांततेचं आव्हान केलं. आपण समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी इथे आलो आहोत. शांततेत रहा, गडबड गोंधळ करून नुकसान करून घेऊ नका असं त्यांनी सांगितलं.
सरकारला आपल्याला सहकार्य करायचे नव्हते म्हणून मराठ्यांना मुंबईत यावं लागलं असं म्हणतं मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर आरोप केला. आपल्या सर्व मागण्या पूर्ण झाल्याशिवाय मी मागे हटणार नाही. सरकारने गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही असा पुनरुच्चार त्यांनी केला. डोक्यावर गुलाल पडल्याशिवाय आता इथून हटणार नाही असे ते म्हणाले. सरकारने बेमुदत उपोषण करू द्यावं, मराठ्यांची नाराजी अंगावर घेऊ नका असंही जरांगे यांनी यावेळी म्हटलं.
मराठा आरक्षणाची मागणी करत दोन वर्षांपूर्वी 29 ऑगस्ट रोजी जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटीमध्ये उपोषण सुरू केलं होतं. त्यानंतर आज मुंबईतलं हे आठवं उपोषण आहे. ओबीसीमधून मराठा आरक्षण देण्यात यावं अशी मागणी त्यांनी केली आहे.
हायकोर्टाने नाकारली होती परवानगी
29 ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलनाची हाक जरांगे पाटील यांनी दिली होती. मात्र हायकोर्टाकडून मनोज जरांगे पाटील यांना आंदोलनासाठी आझाद मैदानाची परवानगी नाकारण्यात आली होती. अखेर पोलिसांनी काही अटीशर्तींसह जरांगे यांना आझाद मैदानात 1 दिवसाच्या आंदोलनाची परवानगी दिली होती. त्यानंतर आज हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते, मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले. मनोज जरांगे यांनी उपोषणाला सुरूवात केली असून जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत इथून उठणार नाही, तोपर्यंत आमरण उपोषण थांबणार नाही असा निर्धार जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे.
मनोज जरांगे यांनी आत्तापर्यंत केलेली उपोषणं
पहिलं उपोषण29 ऑगस्ट ते 14 सप्टें, 2023 (अंतरवाली-सराटी)
दुसरं उपोषण : 25 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2023 ( अंतरवाली सराटी)
तिसरं उपोषण : 26 आणि 27 जानेवारी 2024 ( नवी मुंबई)
चौथं उपोषण : 10 ते 26 फेब्रुवारी 2024 ( अंतरवाली सराटी)
पाचवं उपोषण : 4 ते 10 जून 2024 ( अंतरवाली)
सहावे उपोषण : 20 ते 24 जुलै 2024 (अंतरवाली)
सातवं उपोषण : 25 ते 30 जानेवारी 2025 (अंतरवाली)
आठवं उपोषण : 29 ऑगस् (मुंबई – आझाद मैदान)