Nashik Ganesh Festival : यंदाच्या गणेशोत्सवावर निवडणुकांची छाप; नाशिकमध्ये इच्छुकांकडून जोरदार प्रचार
esakal August 30, 2025 12:45 PM

नाशिक: मागील तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगूल वाजला आहे. त्यामुळे यंदाच्या श्री गणेशोत्सवावर राजकारणाचीच छाप अधिक दिसून येत आहे. प्रत्यक्षात निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी उत्सवाच्या माध्यमातून निवडणूक प्रचाराची प्राथमिक फेरी पूर्ण करण्याचा इच्छुकांचे प्रयत्न आहेत.

नाशिक महापालिका हद्दीमध्ये जवळपास ८०० तर जिल्ह्यात तेराशे होऊन अधिक गणेश मंडळांनी देखावे सादर केले आहे. महापालिकेप्रमाणेच ग्रामीण भागात देखील निवडणुकांचा माहोल आहे. विशेष करून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका तसेच नगरपालिकेच्या निवडणूका देखील वर्ष अखेरीस होतील. त्यामुळे इच्छुक व त्यांचे कार्यकर्ते मतदारांसमोर पोहोचत आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून प्रचाराची एक फेरी पूर्ण करण्याचे अनेकांचे प्रयत्न आहे.

शहरात मंडळांचा जोर

नाशिक महापालिका हद्दीमध्ये जवळपास आठशेहून अधिक मंडळांनी परवानगीसाठी अर्ज दाखल केले. यातील साडेसहाशेहून अधिक मंडळांना परवानगी मिळाली आहे. महापालिका प्रशासन व पोलिस प्रशासनाकडून शंभर टक्के परवानगी देण्याचे धोरण आहे. महापालिका क्षेत्रामध्ये मंडळाकडून विविध प्रकारचे देखावे सादर करताना त्यात राजकारणाशी देखील छाप दिसून येत आहे. शहरात जवळपास ५१० मंडळे हे राजकारणाशी संबंधित आहे. उत्सवाच्या माध्यमातून महापालिका निवडणुकीचा बिगूल देखील मंडळांकडून वाजविण्यात आला आहे.

इच्छुकांकडून आर्थिक रसद

महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांची स्वत:ची मंडळे आहेत. त्याशिवाय, ज्या प्रभागातून निवडणूक लढवायची आहे, त्या प्रभागात छोट्या मंडळांनाही आर्थिक रसद पुरविण्यात आली आहे. काही ठिकाणी रोख, तर काही मंडळांच्या मंडपासह प्रसाद, मिरवणुकीचा खर्च इच्छुकांकडून उचलण्यात आला. मंडळांच्या स्पर्धांचा खर्चही इच्छुकांनी उचलला आहे.

Nashik Kumbh Mela : कुंभमेळ्यासाठी नाशिक महापालिका उभारणार एक हजार कोटींचा निधी

भाजपसह शिवसेना आघाडीवर

यंदाच्या उत्सवावर निवडणुकीमुळे राजकारणाची छाप दिसत आहे. यातही भारतीय जनता पक्षासह शिवसेनेचे दोन्ही गट अग्रेसर दिसून येत आहेत. यंदा सर्वाधिक मंडळे भाजपची, नंतर शिवसेनेची आहेत. त्या खालोखाल शिवसेना (उबाठा) पक्ष व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची गणेश मंडळे आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.