Cheteshwar Pujara : मला विश्वास आहे.., पंतप्रधान मोदींचं पुजाराला निवृत्तीनंतर खास पत्र, नक्की काय म्हटलं?
GH News August 31, 2025 11:18 PM

भारतीय कसोटी संघाचा प्रमुख फलंदाज आणि वॉल 2 म्हणून ओळखला जाणारा चेतेश्वर पुजारा याने काही दिवसांपूर्वीच सर्वच प्रकारच्या क्रिकेटला अलविदा केला. पुजाराचं भारतीय कसोटी क्रिकेटमध्ये आमूलाग्र योगदान राहिलं. पुजाराने भारताला अनेक सामन्यांमध्ये विजय मिळवून देण्यात निर्णायक भूमिका बजावली. मात्र पुजारा गेल्या 2 वर्षांपासून कसोटी संघापासून दूर होता. पुजाराने यानंतरही आपण संघाला गरज असेल तेव्हा हजर असू, असं म्हटलं होतं. मात्र निवड समितीने पुजाराला संधी दिली नाही. त्यामुळे जे अपेक्षित होतं, तसंच झालं. पुजाराने क्रिकेटला रामराम केला. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुजाराला पत्र लिहत त्याचे आभार मानले आहेत. मोदींनी या पत्रात काय म्हटलं? जाणून घेऊयात.

मोदींनी पुजाराला निवृत्तीनंतरच्या दुसऱ्या इनिंगसाठी शुभेच्छा दिल्या. मोदींनी पुजारासाठी लिहिलेलं पत्र सोशल मीडियावर पोस्ट केलंय. मोदींनी पुजाराच्या खेळाचं कौतुकही केलं.

मोदींचं पुजाराला पत्र

“तुम्ही क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतल्याचं समजलं. तुम्ही केलेल्या कामगिरीसाठी आणि दिलेल्या योगदानाबद्दल चाहत्यांसह क्रिकेट विश्वातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. मी तुमचं क्रिकेट कारकीर्दीबाबत अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो”, असं मोदींनी पत्रात म्हटलंय.

पुजाराकडून मोदींचे आभार

पुजाराच्या बॅटिंगबाबत मोदींनी काय म्हटलं?

“क्रिकेटच्या सर्वात छोट्या फॉर्मेटचा बोलबाला असलेल्या युगात तुम्ही सर्वात जुन्या फॉर्मेटमधील सुंदरतेची आठवण करुन द्यायचात. स्वभाव, एकाग्रता आणि दीर्घकाळ बॅटिंग करण्याच्या क्षमतेमुळे तुम्ही भारतीय फलंदाजीचा आधारस्तंभ ठरलात. तुमच्या क्रिकेट कारकीर्दीत विशेष करुन विदेशात आव्हानात्मक परिस्थितीत दृढनिश्चय आणि कौशल्याचं दर्शन झालं”, असं मोदींनी म्हटलं.

“ऑस्ट्रेलियातील कसोटी सामन्यामधील तुमची कामगिरी कायमच लक्षात राहिल, जेव्हा तुम्ही भारताच्या ऐतिहासिक कसोटी मालिका विजयाचा पाया रचला होतात. तसेच तगड्या गोलंदाजांपैकी एक असलेल्या गोलंदाजाचा तुम्ही सामना केलेलात. तेव्हा तुम्ही जबाबदारी घेणं म्हणजे काय असतं हे दाखवून दिलं होतं”, असं म्हणत मोदींनी पुजाराने 2020-2021 ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील शेवटच्या कसोटी सामन्यात केलेल्या कामगिरीचा उल्लेख केला. भारताने तेव्हा गाबात अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वात शेवटचा सामना जिंकत मालिका आपल्या नावावर केली होती. भारताला विजयी मिळवून देण्यात तेव्हा ऋषभ पंत आणि चेतेश्वर पुजारा या दोघांनी निर्णायक भूमिका बजावली होती.

“तुमचे वडील हे क्रिकेटर असण्यासह तुमचे गुरुही आहेत, त्यांना तुमच्या गर्व आहे, याबाबत मला विश्वास आहे. आता पूजा आणि आदिती (पुजाराची पत्नी आणि मुलगी) या दोघी तुमच्यासोबत अधिक वेळ घालवता येईल म्हणून आनंदी असतील”, असंही मोदींनी पुजाराच्या कुटुंबियांबाबत म्हटलं.

“एक समालोचक म्हणून तुमचं विश्लेषण क्रिकेट चाहत्यांच्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे. तुम्ही खेळासह जोडले रहाल आणि भावी खेळाडूंना प्रोत्साहन द्याल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. तसेच मोदी यांनी पुजाराला त्याच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.