आशिया कप 2025 स्पर्धेआधी श्रीलंका टीम झिंबाब्वे दौऱ्यावर आहे. श्रीलंकेने या दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेतील सलग दोन्ही सामने जिंकून झिंबाब्वेचा सुपडा साफ केला आहे. श्रीलंकेने पहिल्या सामन्यात शेवटच्या ओव्हरमध्ये 7 धावांनी थरारक विजय मिळवला. त्यानंतर श्रीलंकेने आज 31 ऑगस्टला 5 विकेट्सने सामना जिंकत यजमान झिंबाब्वेला क्लिन स्वीप केलं. झिंबाब्वेने श्रीलंकेसमोर 278 धावांचं आव्हान ठेवलं होतं. श्रीलंकेने हे आव्हान 3 चेंडूआधी 5 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. श्रीलंकेने 49.3 ओव्हरमध्ये 278 धावा केल्या. ओपनर पाथुम निसांका आणि कॅप्टन चरिथ असलंका या दोघांनी श्रीलंकेच्या विजयात प्रमुख भूमिका बजावली.
श्रीलंकेसाठी पाथुमुने सर्वाधिक धावा केल्या. पाथुमने 136 बॉलमध्ये 89.71 च्या स्ट्राईक रेटने 122 रन्स केल्या. पाथुमने या खेळीत 16 चौकार लगावले. तर चरिथने 61 चेंडूत 71 धावांची निर्णायक खेळ केली. चरिथने या खेळीत 7 चौकार लगावले. या दोघांव्यतिरिक्त सदीरा समरविक्रमा याने 31, नुवानिदु फर्नांडो याने 14 आणि कुसल मेंडीस याने 5 धावांचं योगदान दिलं. तर जनिथ लियानगे आणि कामिंदु मेंडीस या जोडीने श्रीलंकेला विजयापर्यंत पोहचवलं. जनिथने नाबाद 19 धावा केल्या. तर कामिंदुने नॉट आऊट 5 रन्स केल्या.
पाथुमने या शतकी खेळी दरम्यान खास कामगिरी केली. पाथुमच्या एकदिवसीय कारकीर्दीतील हे 7 वं शतक ठरलं. तसेच पाथुमने लिस्ट ए क्रिकेटमध्ये 4 हजार धावांचा टप्पा पार केला. पाथुमने त्या व्यतिरिक्त एकदिवसीय क्रिकेटमध्ये 17 अर्धशतकं झळकावली आहेत.
त्याआधी श्रीलंकेने टॉस जिंकून झिंबाब्वेला बॅटिंगसाठी भाग पाडलं. झिंबाब्वेने 50 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 277 धावांपर्यंत मजल मारली. झिंबाब्वेसाठी बेन करन आणि सिकंदर रझा या दोघांनी अर्धशतकी खेळी केली. करनने सर्वाधिक 79 धावा केल्या. तर रझाने नाबाद 59 धावा केल्या. रझाची ही सलग दुसरी अर्धशतकी खेळी ठरली. या दोघांव्यतिरिक्त क्लाईव्ह मदांडे याने 36 धावांच योगदान दिलं. इतरांनाही ठिकठाक सुरुवात मिळाली. मात्र श्रीलंकेच्या गोलंदाजांसमोर त्यांना मोठी खेळी साकारता आली नाही.
दरम्यान आता उभयसंघात वनडेनंतर टी 20I मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेत एकूण 3 सामने होणार आहे. मालिकेतील पहिला सामना हा 3 सप्टेंबरला होणार आहे.