टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज रोहित शर्मा याने टी 20i नंतर कसोटी क्रिकेटला अलविदा केला. त्यानंतर आता रोहित फक्त वनडे क्रिकेटमध्ये खेळताना दिसणार आहे. रोहित वनडे टीमचा कॅप्टन आहे. रोहित टी 20i आणि टेस्ट निवृत्तीनंतर क्रिकेटपासून दूर आहे. रोहित अखेरीस आयपीएलमध्ये खेळला होता. रोहित तेव्हापासून मैदानात दिसला नाही. रोहित आता ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या व्हाईट बॉल सीरिजमध्ये खेळताना दिसणार आहे. रोहितचा ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या वनडे सीरिजमध्ये खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
रोहितसह भारतीय संघातील अनेक खेळाडू हे ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी संघ निवडीआधी बंगळुरुतील सेंटर ऑफ एक्सीलेंस इथे फिटनेस टेस्टसाठी पोहचले होते. रोहितने बंगळुरुत फिटनेस टेस्ट दिली. रोहितची 2 टप्प्यात ही टेस्ट पार पडली. त्यानंतर आता या टेस्टचा निकाल लागला आहे. रोहित या फिटनेस टेस्टमध्ये यशस्वी झाला की अपयशी ठरला? जाणून घेऊयात.
रोहित शर्मा, शुबमन गिल आणि भारताचे इतर खेळाडू अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर फिटनेस टेस्टसाठी सेंटर ऑफ एक्सीलेंस येथे पोहचले. या खेळाडूंची शनिवार आणि रविवार 2 टप्प्यात टेस्ट घेण्यात आली. बीसीसीआयने काही दिवसापूर्वी खेळाडूंची फिटनेस तपासण्यासाठी यो-यो टेस्टसह ब्रॉन्को टेस्टचा समावेश केला होता. मात्र खेळाडूंची ब्रॉन्को टेस्ट झाली की नाही? याबाबत अधिकृत माहिती नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सर्व खेळाडूंची यो यो टेस्ट करण्यात आली आहे.
रेव्हस्पोर्ट्सनुसार, 31 ऑगस्ट हा खेळाडूंच्या फिटनेस टेस्टचा दुसरा दिवस होता. दुसऱ्या दिवशी सर्व खेळाडूंची यो यो टेस्ट पार पडली. मात्र सर्वांचं लक्ष हे रोहितकडे लागून होतं, कारण रोहित आयपीएल 2025 नंतर क्रिकेटपासून दूर होता.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, रोहितने कोणत्याही अडथळ्याशिवाय फिटनेस टेस्ट दिली. रोहित या फिटनेस टेस्टमध्ये पासही झाल्याचा दावा केला जात आहे. तसेच रोहित या फिटनेस टेस्टनंतर मुंबईत परतला आहे.
रिपोर्ट्सनुसार, रोहित व्यतिरिक्त शुबमन गिल, प्रसिध कृष्णा, जसप्रीत बुमराह, शार्दूल ठाकुर, मोहम्मद सिराज या खेळाडूंनीही फिटनेस टेस्ट दिली आणि ते यशस्वीही ठरले. आता अवघ्या काही दिवसातच जसप्रीत बुमराह आणि शुबमन गिल आशिया कप स्पर्धेत सहभागी होणार आहेत.