Asia Cup 2025 : रोहितचा वर्ल्ड रेकॉर्ड धोक्यात, आशिया कप स्पर्धेत हिटमॅनचा विक्रम मोडीत निघणार!
GH News September 01, 2025 02:16 AM

आगामी टी 20i वर्ल्ड कप 2026 च्या पार्श्वभूमीवर यंदा 20 फॉर्मेटने आशिया कप स्पर्धेतील सामने होणार आहेत. या बहुप्रतिक्षित आशिया कप स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून यूएईमध्ये सुरुवात होणार आहे. क्रिकेट चाहत्यांना या स्पर्धेत षटकार-चौकारांचा पाऊस पाहायला मिळू शकतो. विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांनी टी 20i क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यांना त्यांची निवड करण्यात आली नाही. त्यामुळे टीम इंडिया अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच रोहित-विराटशिवाय आशिया कप स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. या स्पर्धेत यंदा रोहितचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक होण्याची शक्यता आहे.

टी 20i क्रिकेटमध्ये कॅप्टन म्हणून सर्वाधिक षटकार लगावण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड रोहित शर्मा याच्या नावावर आहे. मात्र आता रोहितचा हा विक्रम धोक्यात आहे. रोहितचा हा विक्रम आयसीसीच्या टी 20i रँकिंगमध्ये 15 व्या स्थानी असलेल्या यूएई संघाचा कर्णधार मुहम्मद वसीम याला मोडीत काढण्याची संधी आहे.

रोहितचा वर्ल्ड रेकॉर्ड

रोहितने कॅप्टन म्हणून टी 20i क्रिकेटमधील 62 डावात 105 षटकार लगावले आहेत. तर यादीत मुहम्मद वसीम दुसऱ्या स्थानी आहे. वसीमने 53 डावात 104 षटकार लागवले आहेत. त्यामुळे वसीमला रोहितचा वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर करण्यासाठी फक्त 2 सिक्सची गरज आहे.

दरम्यान यूएईत आशिया कप स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. त्याआधी पाकिस्तान, यूएई आणि अफगाणिस्तान यांच्यात टी 20i ट्राय सीरिज खेळवण्यात येत आहे. यूएईला या मोहिमेतील आपल्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानकडून पराभूत व्हावं लागलं. वसीमने या सामन्यात 18 बॉलमध्ये 33 रन्स केल्या. वसीमने या दरम्यान 3 चौकार आणि 2 षटकार लगावले.

यूएईचा या मालिकेतील दुसरा सामना हा 1 सप्टेंबरला होणार आहे. यूएईसमोर या सामन्यात अफगाणिस्तानचं आव्हान असणार आहे. या सामन्यात वसीमकडे 2 षटकार ठोकून आशिया कपआधीच हा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी आहे.

कॅप्टन म्हणून टी 20i क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार

एरोन फिंच – 82 सिक्स

इयोन मॉर्गन – 86 सिक्स

मुहम्मद वसीम – 104 सिक्स

रोहित शर्मा – 105 सिक्स

रोहित फिटनेस टेस्टमध्ये पास!

दरम्यान रोहित टी 20i आणि टेस्ट क्रिकेटमधील निवृत्तीनंतर आता वनडेत मॅचेस खेळताना दिसणार आहे. रोहित ऑस्ट्रेलिया दौऱ्यात होणार्‍या वनडे सीरिजमध्ये खेळताना दिसू शकतो. त्याआधी रोहितने बंगळुरुतील सेंटर ऑफ एक्सीलेंसमध्ये फिटनेस टेस्ट दिली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रोहित या फिटनेस टेस्टमध्ये पास झाला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.