महिला वनडे वर्ल्डकप स्पर्धा आता तोंडावर आली आहे. सप्टेंबर महिन्याच्या 30 तारखेपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. असं असताना या स्पर्धेसाठी बक्षिसाची रक्कम जाहीर करण्यात आली आहे. आयसीसीने या स्पर्धेसाठी बक्षिसाची रक्कम 297 टक्क्यांनी वाढवली आहे. त्यामुळे विजेत्या संघाची चांदी होणार आहे. आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनी महिला वर्ल्ड कप स्पर्धेस्ठा विजयाची रक्कम 13.88 मिलियन डॉलर्स म्हणजेच 122 कोटी रुपयांहून अधिकची आहे. या बक्षिसाच्या रकमेसह आयसीसीने महिला क्रिकेट स्पर्धेला एका वेगळ्या उंचीवर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. विजेत्या, उपविजेत्या आणि साखळी फेरीत या रकमेचं वाटप कसं होईल? चला जाणून घेऊयात या स्पर्धेत भाग घेणाऱ्या संघांना या बक्षिसाची रक्कम कशी मिळणार आहे ते..
महिला वर्ल्डकप जिंकणाऱ्या संघाला आयसीसीकडून 4.48 मिलियन डॉलर्स इतकी रक्कम मिळणार आहे. भारतीय रुपयांनुसार बक्षिसाची रक्कम जवळपास 40 कोटी रुपये असणार आहे. उपविजेत्या संघाला विजेत्या संघाच्या तुलनेत निम्मी रक्कम मिळणार आहे. म्हणजे 2.24 मिलियन डॉलर्स म्हणजेच जवळपास 20 कोटी रुपये मिळतील. उपांत्य फेरीत स्थान मिळवणाऱ्या संघाला जवळपास 10 कोटी रुपये मिळतील. तर साखळी फेरीत एक सामना जिंकणाऱ्या संघाला 34 हजार डॉलर मिळतील. तर पाचव्या आणि सहाव्या स्थानावर असलेल्या संघाला 6 कोटी मिळतील. तर सातव्या आणि आठव्या स्थानावर असलेल्या संघाला अडीच कोटी रुपये मिळतील. दरम्यान या स्पर्धेत भाग घेतलेला संघ जिंको किंवा हरो त्याला कमीत कमी 2 कोटी 50 लाख रुपये मिळणार आहेत.
भारताने एकदाही वनडे वर्ल्डकप स्पर्धा जिंकलेली नाही. यंदा भारत आणि श्रीलंकेकडे यजमानपद आहे. त्यामुळे भारतीय महिला संघाकडून अपेक्षा आहेत. या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व राहिलं आहे. तर इंग्लंड आणि न्यूझीलंडने वनडे वर्ल्डकप जिंकलेला आहे. ऑस्ट्रेलियाने सात वेळा जेतेपद, चारवेळा इंग्लंडने आणि एकदा न्यूझीलंडने जेतेपद मिळवलं आहे. या शिवाय एकाही संघाला जेतेपदाची चव चाखता आलेली नाही.