आशिया कप टी20 स्पर्धेचं बिगुल वाजलं असून पहिला सामना 9 सप्टेंबरला होणार आहे. त्यामुळे या स्पर्धेसाठी मोजून काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या स्पर्धेत टीम इंडिया जेतेपदासाठी प्रमुख दावेदार मानली जात आहे. मागच्या पर्वात वनडे फॉर्मेटमध्ये भारताने जेतेपदावर नाव कोरलं होतं. पण पुढच्या वर्षी टी20 वर्ल्डकप असल्याने यंदा या स्पर्धेचा फॉर्मेट टी20वर आधारित आहे. आशिया कप स्पर्धा तिसऱ्यांदा या फॉर्मेटमध्ये खेळवली जाणार आहे. त्यामुळे टी20 फॉर्मेटची आकडेवारी काही भलतीच आहे. यात एक रेकॉर्ड असा आहे की काही खेळाडू या स्पर्धेत बादच झाले नाहीत. गोलंदाजांना या खेळाडूंना बाद करणं शक्य झालं नाही. म्हणजेच मागच्या दोन पर्वात या खेळाडूंनी नाबाद खेळी केली असंच म्हणावं लागेल. टी20 आशिया कप स्पर्धेत नाबाद राहात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम बांगलादेशच्या खेळाडूच्या नावावर आहे. तर भारताच्या एका दिग्गज खेळाडूचा टॉप 2 मध्ये समावेश आहे.
टी20 आशिया कप स्पर्धेच्या इतिहासात बांगलादेशच्या मोसाद्देक हुसैन याने नाबाद राहात सर्वाधिक धावा केल्या आहेत. मोसाद्देक हुसैन 2022 मध्ये आशिया कप टी20 स्पर्धेत बांग्लादेश संघाकडून खेळला होता. या पर्वात त्याने दोन सामने खेळले आणि एकदाही आऊट झाला नाही. त्याने 180 च्या स्ट्राईक रेटने 72 धावा केल्या. त्यामुळे त्याच्या नावावर हा विक्रम आहे. पण यंदाच्या स्पर्धेत त्याला काही संघात स्थान मिळालं नाही. इतकंच काय तर संघात पुनरागमनासाठी धडपड करत आहे. दरम्यान या यादीत भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी हा देखील आहे. महेंद्रसिंह धोनीने 2016 मध्ये आशिया कप टी20 संघात भाग घेतला होता. तेव्हा धोनीने पाच सामने खेळले होते. यावेळी त्याने चार सामन्यात फलंदाजी केली. चारही वेळा नाबाद राहिला. त्याने 280 च्या स्ट्राईक रेटने बिनबाद 42 धावा केल्या आहेत.
मोसाद्देक हुसैन आणि एमएस धोनी वगळता रवि बिश्नोई, दिनेश कार्तिक, आर अश्विन, ओमानचा सुफयान महमूद, पाकिस्तानचा मोहम्मद हसनैने आणि श्रीलंकेचा असिथा फर्नांडो हे नाबाद राहिले आहेत. पण यापैकी बहुतांश खेळाडूंनी टी20 आशिया कपचं एकच पर्व खेळलं आहे. आता नव्याने भाग घेणाऱ्या खेळाडूंना हा विक्रम मोडण्याची संधी आहे. धावांसोबत नाबाद राहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे हा विक्रम यंदा कोण आपल्या नावावर करतो हे महत्त्वाचं आहे. 73 धावा करून नाबाद राहिल्यास हा विक्रम त्या खेळाडूच्या नावावर होईल.