पुणे - अमेरिकेतील कोलंबस शहरात सात दिवसांचा सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. कोलंबस गणेश मंडळातर्फे आयोजित या वार्षिक गणेशोत्सवाचे हे २१ वे वर्ष होते.
गणेश चतुर्थीच्या दिवशी विधिवत श्री गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. उत्सवानिमित्त दररोज विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण झाले. कोलंबस इंडियाना मराठी शाळा आणि बालविहारच्या विद्यार्थ्यांनी, तसेच स्थानिक गायकांनी मराठी व अमराठी भजने, अभंग, भक्तिगीते सादर केली.
पं. अविराज तायडे यांची शास्त्रीय संगीताची मैफील आणि डॉ. चारुदत्त आफळे यांचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील कीर्तन हे उत्सवाचे आकर्षण ठरले. सत्यनारायण पूजा, विष्णुसहस्रनाम पठण आणि अथर्वशीर्ष पठणाने वातावरण भक्तिमय झाले.
यावेळी मंडळाच्या २१ वर्षांच्या प्रवासावर आधारित एका पुस्तकाचेही प्रकाशन झाले. मंडळाचा यावर्षीचा देखावा २१ व्या वर्षांची विशेष नोंद घेऊन साकारण्यात आला होता. गेल्या २० वर्षांतील देखाव्यांचे काही घटक एकत्र करून तयार केलेल्या या देखाव्याने भाविकांचे लक्ष वेधून घेतले होते. कोलंबसमध्ये सुमारे तीन हजार भारतीय वास्तव्यास आहेत. उत्सवात दररोज ५०० भाविक उपस्थित होते, अशी माहिती मंडळाच्या अध्यक्ष डॉ. शर्वरी कोल्हटकर-देशपांडे यांनी दिली.
‘ओंकार-द गणेश फेस्टिव्हल मंथ’ची घोषणा
उत्सवादरम्यान चित्रकला, मेहंदी, पाककला, बुद्धिबळ, कॅरम, अंताक्षरी, अथर्वशीर्ष पठण, हनुमान चालिसा पठण, गीता अध्याय पठण अशा विविध स्पर्धांचेही आयोजन केले होते. पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तयार करण्याची कार्यशाळाही घेण्यात आली.
उत्सवाचे सांस्कृतिक महत्त्व लक्षात घेऊन कोलंबसच्या महापौरांनी १५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर हा कालावधी ‘ओंकार-द गणेश फेस्टिव्हल मंथ’ म्हणून अधिकृतपणे घोषित केला. उत्सवाची सांगता पारंपरिक पालखीतून काढलेल्या भव्य विसर्जन मिरवणुकीने झाली.