Bronco Test : ब्रोंको टेस्टचं आव्हान, भारतीय खेळाडूंचा लागणार कस, जाणून घ्या
GH News September 06, 2025 11:17 PM

गल्लीपासून ते आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत क्रिकेटची क्रेझ दिवसेंदिवेस वाढतेय. कसोटी, वनडेनंतर आता 2 दशकांपासून टी 20 क्रिकेटची चलती पाहायला मिळतेय. टेस्ट आणि वनडे फॉर्मेटची लोकप्रियता टी 20 क्रिकेटच्या काळातही कायम आहे. मात्र वनडे आणि टेस्टच्या तुलनेत चाहत्यांचा ओढा हा टी 20 क्रिकेटकडे जास्त आहे. खेळाडूंना फॉर्मेटनुसार खेळण्याची पद्धत, आक्रमकता, वेग या आणि अशा अनेक बाबतीत कमी जास्त प्रमाणात गरजेनुसार बदल करावा लागतो. खेळाडूंना परिस्थिती आणि फॉर्मेटनुसार खेळावं लागतं. टी 20 क्रिकेटमध्ये धावा करण्याचा वेग हा कसोटी आणि वनडे फॉर्मेटच्या तुलनेत कितीतरी पट जास्त आहे. फॉर्मेटनुसार खेळण्याची पद्धत आणि इतर संबंधित मुद्द्यांमध्ये बदल पाहायला मिळतो. मात्र या सर्व मुद्द्यांना फिटनेसचा मुद्दा अपवाद आहे. खेळाडूंसाठी फिटनेस किती महत्त्वाचा मु्द्दा आहे हे क्रीडा चाहत्यांना पर्यायाने क्रिकेट चाहत्यांना वेगळं सांगायची गरज नाही.

काही दशकांआधी फक्त फिटनेस टेस्ट इतकाच विषय होता. मात्र क्रिकेटमध्ये तंत्रज्ञानामुळे मोठ्या प्रमाणात बदल झाले. त्यामुळे क्रिकेटचं स्वरुप बदललं. क्रिकेटच्या बदलेल्या स्वरुपामुळे सर्वच बाबतीत बदल पाहायला मिळाला. बदलेल्या स्वरुपामुळे फिटनेसची गरजही बदलली. खेळाडूंना परिस्थितीनुसार शारिरीक आणि मानसिक फिटनेसमध्ये बदल करावा लागला.

खेळाडूंना एखाद्या मालिकेत किंवा सामन्यात खेळण्यासाठी फिट असणं गरजेचं असतं. खेळाडू कायमच फिटनेसवर मेहनत घेत असतात. मात्र आता खेळाडू फिटनेस कायम ठेवण्यासाठी आहारावरही अधिक लक्ष केंद्रीत करताना दिसतात. फिटनेससाठी पूरक आहार मिळावा यासाठी खेळाडू त्यांच्यासह कूकही ठेवतात. यावरुन खेळाडू फिटनेसाबत महत्त्वं अधोरिखित होतं. बीसीसीआयकडून आतापर्यंत खेळाडूंचा फिटनेस जाणून घेण्यासाठी योयो टेस्टचा आधार घेतला जात होता. मात्र आता खेळाडूंना आणखी एका आव्हानाचा सामना करावा लागणार आहे.

टीम इंडियाचे स्ट्रेंथ-कंडीशनिग कोच एड्रीयन ले रुक्स यांनी फिटनेस जाणून घेण्यासाठी एक नवीन टेस्ट सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार खेळाडूंना ब्रोंको टेस्टचा सामना करावा लागणार आहे. खेळाडूंना ब्रोंको टेस्टद्वारे स्वत:चा फिटनेस सिद्ध करावा लागणार आहे. ब्रोंको टेस्टद्वारे फुटबॉलपटू आणि रग्बी खेळणाऱ्या खेळाडूंची फिटनेस टेस्ट केला जातो. या निमित्ताने ब्रोंको टेस्ट म्हणजे काय आणि त्याची गरज का पडली? हे सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

ब्रोंको टेस्टबाबत थोडक्यात

रग्बी या खेळापासून ब्रोंको टेस्टची सुरुवात करण्यात आली. खेळाडूंची सहनशक्ती आणि त्यांचा फिटनेस जाणून घेण्याच्या हेतूने ब्राँको टेस्टची आखणी करण्यात आली. ब्राँको टेस्ट देताना खेळाडूंना सातत्याने धावत रहावं लागतं. ब्रोंको टेस्ट कशी होते? हे समजून घेऊयात.

ब्रोंको टेस्ट देत असताना खेळाडूंना पहिले 20 मीटर, त्यानंतर 40 आणि मग 60 मीटर सलग धावावं लागतं. या 3 इव्हेंटचा एक सेट मोजला जातो. खेळाडूंना असे एकूण 5 सेट पूर्ण करावे लागतात. या ब्रोंको टेस्टमध्ये खेळाडूला अवघ्या 6 मिनिटांत हे 5 सेट पूर्ण करावे लागतात. त्यामुळे खेळाडूंसमोर वेगात धावण्यासह 6 मिनिटांआधी ही टेस्ट पूर्ण करण्याचं दुहेरी आव्हान आहे.

ब्रोंको टेस्टची गरज काय?

अनेक खेळाडू मैदानासह जीममध्ये जोरदार वर्कआऊट करतात. खेळाडू तासंतास जीममध्ये फिटनेसवनर मेहनत घेत असतात. नेमक्या याच मुद्द्याला कोचिंग स्टाफने हात घातलाय.

कोचिंग स्टाफनुसार, क्रिकेटपटू मैदानापेक्षा जास्त जीममध्ये वेळ घालवतात. मात्र खेळाचा खरा दबाव हा मैदानात असतो. बॉलरचा स्टामिना आणि सातत्य या गोष्टी महत्त्वपूर्ण असतात.

शुबमन गिल याच्या नेतृत्वात टीम इंडियाने इंग्लंड विरूद्धची 5 सामन्यांची कसोटी मालिका 2-2 ने बरोबरीत राखली. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या मालिकेत वर्कलोड मॅनजमेंटमुळे 5 पैकी फक्त 3 सामन्यांमध्येच खेळला. तसेच बुमराह या 3 सामन्यांमध्येही एका स्पेलमध्ये 4-5 पेक्षा जास्त ओव्हर टाकू शकला नाही. बुमराहला एका स्पेलमध्ये जास्तीत जास्त ओव्हर टाकण्यात अपयशी ठरला. ब्रोंको टेस्टमुळे एखादा वेगवान गोलंदाज जास्तीत जास्त ओव्हर टाकण्यासाठी शारीरिकत्या सक्षम आहे की नाही, हे निश्चित होईल. त्यामुळेच खेळाडूंचा फिटनेस आणि सहनशक्ती वाढवण्याच्या दृष्टीने ब्रोंको टेस्ट लागू करण्यात आली आहे.

बीसीसीआयकडून आधीपासूनच योयो टेस्ट आणि 2 किलोमीटर ट्रायल टेस्टद्वारे फिटनेस टेस्ट घेतली जाते. मात्र आता ब्रोंको टेस्टचाही समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आता भविष्यात खेळाडूंचा फिटनेस आणखी सुधारेल आणि त्याचा सकारात्मक परिणाम मैदानात दिसेल, अशी आशा चाहत्यांना आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.