Indian Navy : रशिया-युक्रेन, इस्रायल-हामास, इस्रायल-इराण यांच्यातील संघर्षामुळे सध्या जागतिक पातळीवर अस्थिरता आहे. या युद्धांमुळे जागतिक बाजारपेठेवर परिणाम पडलेला आहे. तसेच या संघर्षामुळे युद्ध लढण्याची पद्धत आणि त्यासाठीचे शस्त्रही बदलेलेले आहेत, याची जाणीव आता जगाला झाली आहे. याच कारणामुळे बदललेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी जगातील महासत्ता तसेच इतर देश आपल्या संरक्षण दलाला बळ देण्याचा प्रयत्न करत आहेत. भारतही यात मागे राहिलेला नाही. भारताने आत्मनिर्भरतेचे धोरण स्वीकारून आता जगाला धडकी भरवणारी योजना समोर आणली आहे.
आता भारत आपलं समुद्रावरील वर्चस्व वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्याचाच एक भाग म्हणून भारताने पुढच्या 15 वर्षांचा रोडमॅप तयार केला आहे. या रोडमॅपअंतर्गत भारत अणुउर्जेवर चालणारे विमानवाहू जहाज निर्माण करण्याचा विचार करत आहे. ही योजना सत्यात उतरली तर अणुउर्जेवर विमानवाहू जहाजाची निर्मिती करणारा भारत जगातील तिसरा देश असेल. भारताला नेहमीच चीन आणि पाकिस्तान या प्रतिस्पर्धी देशांचे आव्हान असते. हे आव्हान स्वीकारून भारत आता विमानवाहू जहाज निर्मितीत ही ऐतिहासिक कामगिरी करणार आहे. रशिया, फ्रान्स, अमेरिका अशा विदेशी पुरवठादारांवर अवलंबून न राहता स्वदेशी संरक्षणविषयक कंपन्यांच्या मदतीने शस्त्र निर्मिती करण्याचाही भारताचा विचार आहे.
संरक्षण मंत्रालयाने आपल्या 2025 सालच्या रोडमॅपमध्ये आगामी काळात भारत अनेक आव्हान आणि जबाबदाऱ्या स्वीकारणार आहे. त्यामुळे भारताचे लष्कर, सेना सुसज्ज असणे गरजेचे आहे, असे नमूद करण्यात आलेले आहे. भारताकडे सध्या दोन विमानवाहू जहाज आहेत. यातील एक जहाज हे रशिया निर्मीत तर दुसरे जहाज हे संपूर्ण स्वदेशी आहे. आता तिसरे प्रस्तावित विमानवाहू जहाज हे अणुउर्जेवर असण्याची शक्यता आहे.
भारताने संरक्षण दलाला बळकटी मिळावी यासाठी आपल्या रोडमॅपमध्ये Electromagnetic Aircraft Launch Systems खरेदी करण्याचाही प्रस्ताव आहे. दरम्यान, या योजना प्रत्यक्षात उतरल्या तर भारताचे समुद्रावरील वर्चस्व आणखी वाढेल. शेजारी असलेल्या पाकिस्तानलाही याचा चांगलाच धसका बसू शकते.