GST Council And IPL Franchise : भारतात क्रिकेट या खेळाला फारच महत्त्व आहे. क्रिकेटचे चाहते तुम्हाला प्रत्येक घरात सापडतील. आयपीएलच्या हंगामात तर भारतभरात क्रिकेटचीच चर्चा असते. याच लोकप्रियतेच्या जोरावर आजघडीला क्रिकेट या खेळाच्या माध्यमातून दरवर्षी कोट्यवधी रुपयांच्या उलाढाली होतात. आपल्या आवडत्या क्रिकेटरला फलंदाजी, गोलंदाजी करताना लाईव्ह पाहण्यासाठी चाहते हजारोंची तिकिटे काढून थेट मैदानात जाऊन सामने पाहतात. आता मात्र क्रिकेटचे सामने लाईव्ह पाहण्याची आवड असणाऱ्या क्रिकेट चाहत्यांसाठी वाईट बातमी आली आहे. क्रिकेटचे सामने लाईव्ह पाहायचे असतील तर आता जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार आता स्टेडियममध्ये जाऊन क्रिकेट पाहणे आता महागणार आहे. कारण आता जीएसटी परिषदेने क्रिकेटच्या सामन्यांच्या तिकिटावरील कर 28 टक्क्यांवरून थेट 40 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. सरकारच्या या निर्णयाचा थेट परिणाम आता तिकिटांच्या किमतीवर होईल. म्हणजेच आता थेट स्टेडियममध्ये जाऊन क्रिकेटचा सामना लाईव्ह पाहणे आता महागणार आहे. याच कारणामुळे आता आयपीएलमधील संघांचे मालक यावर नाखुश आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे आपयीएल फ्रँचायझींच्या कमाईवर नकारात्मक परिणाम पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आयपीएल सामन्यांच्या तिकिटांवरील जीएसटी 28 टक्क्यांवरून थेट 40 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यामुळे आयपीएलच्या फ्रँचायझींच्या कमाईवर परिणाम पडणार आहे. महानगर वगळता छोट्या शहरांतून येणाऱ्या आपयीएलच्या संघांना याचा जास्त फटका बसू शकतो, असा दावा केला जात आहे. स्टेडियममध्ये प्रेक्षकांच्या क्षमतेनुसार तिकीटविक्रीतून आयपीएलच्या संघांची साधारण 8 ते 12 टक्के कमाई होते. मात्र मोठ्या शहरांत दर्शकांची संख्याही जास्त असते आणि तिकिटांची किंमतही जास्त असते. तुलेनेने छोट्या शहरातील स्टेडियमचे चित्र मात्र वेगळे असते. त्यामुळे तिकीट वाढल्यामुळे दर्शकांची संख्या कायम राखण्याचे आव्हान असेल.
पंजाब किंग्ज संघाचे सीईओ सतीश मेनन यांनीदेखील सरकारच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. तिकिटांवर 40 टक्के जीएसटी फारच जास्त आहे, असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळेच आता सरकारच्या या निर्णयाचा नेमका काय परिणाम होईल, यावर अभ्यास चालू असल्याचे मेनन यांनी सांगितले आहे. तसेच आगामी काळात जीएसटी परिषदेला आपल्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची विनंती केली जाऊ शकते, असेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, अगोदरच सरकारने रियल गेंमिग अॅपवर बंदी घातलेली आहे. त्यामुळे ड्रीम 11 यासारख्या कंपन्यांकडून मिळणाऱ्या स्पॉन्सरशीपवर परिणाम पडणार आहे. असे असताना सरकारने तिकिटांवर 40 टक्के जीएसटी आकारण्याचा निर्णय घेतल्यामुळे जास्तच फटका बसेल, असे मत व्यक्त केले जात आहे. त्यामुळे आता नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.