Ganesh Festival 2025 : गणरायाला लंडनमध्ये निरोप; भारतीय परंपरेचा जागतिक उत्सव
esakal September 07, 2025 10:45 PM

शेंदूरवादा : लोकमान्य टिळकांनी पुण्यात सुरू केलेला हा गणेशोत्सव सबंध देशात कोणतीही जात, धर्म, पंथ न मानता साजरा केला आहे. जागतिकीकरणाच्या युगात दुसऱ्या देशांमध्ये स्थायिक झालेल्या भारतीयांची संख्या मोठी आहे. परदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांना तिथल्या दररोजच्या जीवनशैलीची सवय झाली असली तरी सण आणि उत्सवांच्या काळात भारतात पारंपरिक पद्धतीने साजऱ्या होणाऱ्या सणांची आठवण त्यांना येत असेल का, हा प्रश्न आपल्याला नेहमी पडतो. खरंतर देश कोणताही असो आपले सण साजरे करायला सर्वानाच आवडतं, गरज असते ती फक्त तयारी करून ते उत्साहाने साजरे करण्याची.

आशीच तयारी करीत देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावणारा गणेशोत्सव सातासमुद्रापार गेला आहे. लंडन येथे व्यवसाय नोकरी निमित्त गेलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसह तेथील भारतीय बांधवांना सध्या एकत्रित येण्यासाठी कारण ठरलेल्या दहा दिवसीय गणेशोत्सची सांगता शनिवारी (ता.सहा) अनंत चतुर्थीच्या दिवशी लंडन येथील टावर ब्रिज जवळ विसर्जनाने झाली. या दहा दिवसांत रोज विविध कार्यक्रम त्या ठिकाणी सुरू होते.

येथे राहणाऱ्या भारतीय बांधवांच्या भावी पिढीचा संबंध मातृभूमीशी आणि येथील मातीशी टिकून राहण्यासाठी येथे विविध भारतीय उत्सव साजरे केले जात आहे. खरं तर प्रत्येक देशात अशी मराठी मंडळं देशाबाहेर आपली संस्कृती जपण्यात हिरिरीने कार्यरत आहेत. गणेशोत्सवासह पंढरपूरची वारी, दिवाळी, कोजागिरीसारखे सणही या ठिकाणी उत्साहाने साजरी केली जात असल्याचे विनोद देवकर, अनिल खेडकर, पल्लवी पवार, ऋषिकेश मेढे, ऋषिकेश गाडे, अदिती पाटील यांनी सांगितले.

युनायटेड किंगडम येथे मोठ्या प्रमाणावर गणेश उत्सव साजरा होत असून येथे जवळपास तीन टक्के नागरिक भारतीय आहे. वेगवेगळ्या शहरात 40 ते 50 मंडळाच्या माध्यमातून ढोल ताशा पथकाने स्वागत, वेगवेगळ्या ठिकाणी आरत्यांची नियोजन, महाप्रसाद व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले आहे.भारतीय संस्कृती इतर देशांमध्ये पोहोचवण्याचे काम आपले बांधव या ठिकाणी करत आहे. ऋषीमुनींच्या प्राचीन संस्कृतीचा वारसा विविध धार्मिक कार्यक्रमातून पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे.

अनिल खेडकर : ( गणेश भक्त लंडन)

सर्वात छान वाटते ते म्हणजे परदेशात असूनही परंपरा, संस्कार आणि भक्तिभाव आम्ही उत्कटतेने जोपासण्याचा प्रयत्न करतो. आम्ही यंदा गणपती बाप्पासाठी साकारलेला पंढरपूर वारीचा देखावा म्हणजे महाराष्ट्राच्या मातीशी जोडलेली ओळख. लहान लहान मुले परंपरेबद्दल सांगत एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे भक्तीचा वारसा कसा हस्तांतरित करण्याचा प्रयत्न आणि खरी संस्कारांची पेरणी.

आपण कुठेही असलो तरी आपल्या मुळांशी जोडलेलो राहू शकतो.

अदिती पाटील (मूळचे धुळे जिल्ह्यातील सध्या लंडन येथे राहते.)

महाराष्ट्रात जसा सामूहिक उत्सवाचा माहोल असतो, तो इथे तितक्या प्रमाणात अनुभवता येत नाही. शिवाय वेळेचा ताळमेळ बसवावा लागतो. मुलांची शाळा, नोकरी आणि स्थानिक दिनक्रमात उत्सवाची पूजा/आरती जुळवणे आव्हानात्मक ठरते. सजावटीसाठी लागणारे पारंपरिक साहित्य, फुलं, मातीचे गणपती मिळवणं कठीण होतं.

पण या अडचणींच्या पलीकडे जाऊन जेव्हा कुटुंब, मित्र आणि लहान मुले मिळून उत्सवात भाग घेतात, तेव्हा तो आनंद अडचणींपेक्षा कितीतरी पटीने मोठा वाटतो.

पल्लवी पवार (लंडन L&D (training)Director )

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.