खेड आगारातून ३०४ बसफेऱ्या
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. ७ : परतीला निघालेल्या गणेशभक्तांच्या सोयीसाठी यंदा येथील आगारप्रमुख रणजित राजेशिर्के व त्यांच्या सहकाऱ्यांनी तब्बल ३०४ जादा फेऱ्यांचे नियोजन केले. २ ते ४ सप्टेंबर या कालावधीत एसटी प्रशासनाने महाडनाका येथील गोळीबार मैदानातून जादा बसफेऱ्या सोडत केलेल्या नेटक्या नियोजनामुळे प्रवाशांची मनस्तापातून सुटका झाली.
येथील एसटी प्रशासनाने २ सप्टेंबरपासून गणेशभक्तांच्या परतीसाठी जादा बसफेऱ्या सोडल्या. पहिल्याच दिवशी ६४ तर दुसऱ्या दिवशी तब्बल १५३ जादा बसफेऱ्या सोडून गणेशभक्तांच्या मार्गातील विघ्न दूर केले. ४ सप्टेंबर रोजीही ८७ बसफेऱ्या मार्गस्थ करण्यात आल्या. तब्बल ३०४ बसफेऱ्यांमधून प्रवास करत गावी आलेल्या गणेशभक्तांनी मुंबई गाठली. गोळीबार मैदान येथे नव्या बसस्थानकाची उभारणी करण्यात येणार असून, कामदेखील सुरू झाले आहे. या ठिकाणी बांधकामासाठी करण्यात आलेल्या खोदाईमुळे जादा बसफेऱ्या उभ्या करण्यास अडसर निर्माण झाला होता. अशाही परिस्थितीत एसटी प्रशासनाने जादा बसफेऱ्या उभ्या करताना सुरळीतपणा आणून प्रवाशांची गैरसोय दूर केली.