मूर्तिविना गणेशाचे हर्षउल्हासात विसर्जन!
esakal September 08, 2025 05:45 PM

मूर्तिविना गणेशाचे हर्षोल्हासात विसर्जन!
रुस्तम रहिवासी गणेशोत्सव मंडळाचा पर्यावरणपूरक संदेश
प्रभादेवी, ता. ७ (बातमीदार) : गणेशोत्सव म्हटला की डोळ्यासमोर गणपतीची मूर्ती, आरास, पूजा-अर्चा आणि शेवटी धूमधडाक्यातील विसर्जन डोळ्यांसमोर येते, परंतु आश्चर्याची बाब म्हणजे, रुस्तम रहिवासी गणेशोत्सव मंडळाने पर्यावरणाचा संदेश देत मूर्ती नसलेल्या गणेशाचे हर्षोल्हासात विसर्जन केले.
पर्यावरणपूरकतेचा संदेश देत लोअर परेल येथील रुस्तम रहिवासी गणेशोत्सव मंडळानी प्रत्यक्ष मूर्ती न ठेवता, भिंतीवर चार बाय चारच्या फलकावर गणेशाचे चित्र रेखाटून धार्मिक आणि सांस्कृतिक कार्याचे दर्शन घडविले.
मंडळाच्या वतीने अनंत चतुर्दशीच्या दिवशी रात्री महाआरती करून नवसाच्या नारळाचे पाणी आणि स्थापन केलेल्या कलशातले पाणी भिंतीवर शिंपडून ती मूर्ती पुसली आणि अशा अनोख्या पद्धतीने मूर्ती नसलेल्या गणेशाचे भक्तिभावाने विसर्जन केले गेले.
लोअर परेल येथील चाळीत गेल्या ४७ वर्षांपासून कधीही गणपतीची मूर्ती आणली नाही, तर चाळीच्या एका इमारतीमध्ये मोकळ्या भिंतीवर गणपतीचे चित्र रेखाटून त्याची पूजा केली जाते.
चाळीतील रहिवासी बबन कांदळगावकर यांनी ही प्रथा सुरू केली. विविध सणांच्या निमित्ताने ते चाळीतील सूचना फलकावर चित्र काढायचे एका वर्षी त्यांनी साध्या खडुने गणपतीचे चित्र काढले आणि ती प्रथा सुरू झाली. यावर्षी शैलेश वारंग यांनी हे गणपतीचे चित्र काढले होते.
रुस्तम चाळीतील युवराज पांचाळ आणि श्लोक कांदळगावकर या १३ वर्षांच्या मुलांच्या संकल्पनेतून विराज पांचाळ यांनी साकारलेले सोशल मीडियावर आधारित हे चलचित्र पाहण्यासाठीदेखील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
इतक्या वर्षांनंतर आजही ही प्रथा सूरू असून, अनंत चतुर्दशीच्या दिवशी महाआरती करून गणपतीसमोर भाविकांनी अर्पण केलेले नारळ वाढवण्यात येतात. त्याचे पाणी त्या चित्रावर टाकण्यात येते आणि ते चित्र पुसण्यात येते, अशी गणपती विसर्जनाची अवलंबलेली पद्धत आजतागायत सुरू असल्याचे कमलेश पांचाळ यांनी सांगितले. या अनोख्या पद्धतीमुळे उत्सवात ‘मूर्ती नसली तरीही विसर्जन होऊ शकते’ हा संदेश जनमानसात पोहोचवून पर्यावरण व श्रद्धेचा सुंदर संगम साधला गेला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.