'लालबागच्या राजा'चं विसर्जन नेमकं का रखडलं? 'गुजरातच्या तराफ्यावर' कोळी बांधव आणि मंडळानं काय म्हटलं?
BBC Marathi September 09, 2025 11:45 AM
Getty Images

मुंबईतील लोकप्रिय 'लालबागचा राजा'चं विसर्जन यंदा अभूतपूर्व खोळंबल्याचं पहायला मिळालं. यावर्षी 'लालबागचा राजा'ची मिरवणूक तब्बल 33 तासांहून अधिक वेळ चालली.

समुद्र चौपाटीवर पोहचूनही विसर्जन करण्याला अडचणी आल्या आणि 12 तासांहून जास्त वेळ प्रत्यक्षात विसर्जनाला लागले.

यावरून सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. याला गुजरातहून आणलेला नवीन अत्याधुनिक तराफा कारणीभूत असल्याचा आरोप होत आहे.

या पार्श्वभूमीवर नेमकं काय घडलं? विसर्जन खोळंबल्याची कारणे काय आहेत? कोळी बांधव आणि मंडळानं नेमकं काय म्हटलं आहे? जाणून घेऊया.

विसर्जनाला विलंब का झाला?

लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाचं यंदा 92 वं वर्ष होतं. दरवर्षीप्रमाणे विसर्जनाची मिरवणूक पारंपरिक पद्धतीने सुरू झाली.

6 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता लालबाग येथून विसर्जनाच्या मिरवणुकीला सुरुवात झाली.

ही मिरवणूक लालबाग-चिंचपोकळी फूल-भायखळा-नागपाडा चौक-गोल देऊळ-ओपेरा हाऊस ब्रीज-गिरगाव चौपाटी या मार्गाने पहाटे 6 वाजेपर्यंत विसर्जनस्थळापर्यंत म्हणजे गिरगाव चौपाटीत समुद्र तटापर्यंत पोहचते.

यंदा मिरवणूक गिरगाव चौपाटी इथं पोहचायला नेहमीप्रमाणे थोडा उशीर झाला.

7 सप्टेंबरला सकाळी साधारण 8 वाजता लालबागचा राजा गणपतीची मूर्ती गिरगाव चौपाटी येथे पोहचली. परंतु त्यावेळी समुद्राला भरती होती.

Getty Images

संततधार पाऊस आणि वारा आणि त्यात भरती असल्याने सुरुवातीला अडचणी आल्या. तसंच लालबागचा राजा मंडळानं अत्याधुनिक तराफ्यातून विसर्जन करायचं नियोजन असल्याचं बोललं गेलं. परंतु भरतीच्या वेळी मूर्ती तराफ्यावर चढवताना अडचणी आल्या.

एका प्रत्यक्षदर्शीनं दिलेल्या माहितीनुसार, "हा तराफा अत्याधुनिक होता. त्याला दोन इंजिन आणि कंट्रोलर बसवलेला होता. 360 डिग्रीमध्ये फिरणारा तराफा होता. त्यामुळे दरवर्षी ज्याप्रमाणे कार्यकर्ते, भाविक आणि स्थानिक कोळी बांधव आपला हातभार लावत तराफा समुद्रात खेचायचे तसं यावेळी नियोजन नव्हतं. परंतु समुद्राच्या लाटा उसळत असल्यानं नवीन तराफ्यातून नेण्यातही अडचणी येत होत्या."

या सगळ्याला रात्री साधारण 9 वाजले. म्हणजे सकाळी 8 वाजल्यापासून ते रात्री 8 वाजेपर्यंत विसर्जन करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. त्यानंतर आरती करून विसर्जन करण्यात आले.

यासंदर्भात माध्यमांशी बोलताना मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांनी सांगितलं," समुद्राच्या भरतीची जी वेळ होती त्या आधीच भरती आल्यानं विसर्जनात सकाळी थोडी अडचण निर्माण झाली. यावेळी विसर्जनासाठी अत्याधुनिक तराफा बनवला होता. परंपरेनुसार, कोट्यवधी भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाचं विसर्जन करायचं ठरवलं होतं. परंतु ते होऊ शकलं नाही."

गुजरातचा तराफा आणि कोळी बांधवांना डावलल्याचा आरोप

खरं तर दरवर्षी परंपरेनुसार 'लालबागचा राजा'ची मूर्ती गिरगाव चौपाटीवर पोहचल्यानंतर तिथले स्थानिक कोळी बांधवही विसर्जनासाठी भाग घेतात. परंतु यावर्षी गुजरात येथून तराफा आणल्याचं त्यांनी सांगितलं.

गिरगाव चौपाटी येथील नाखवा हिरालाल वाडकर सांगतात, "काही कारणामुळे ओहोटी-भरतीचा अंदाज मंडळाला आला नाही. वाडकर बंधू गेल्या अनेक वर्षांपासून लालबागच्या राजाचं विसर्जन करत आलेलो आहोत. यावर्षी लालबागच्या राजाचं विसर्जन करण्यासाठी गुजरातचा तराफा आणण्यात आला. मंडळानं हे काम त्यांना दिलंय."

Getty Images

'लालबागचा राजा' मंडळानं मात्र हे आरोप फेटाळले आहे. मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं,"तराफा गुजरातचा नव्हता. ठाण्याची कंपनी आहे. त्यांच्याकडून तराफा घेतलेला आहे. आम्ही गेल्या 25 वर्षांपासून कोळी बांधवांसोबत हे काम करत आलो आहोत. विसर्जनावेळी ते सुद्धा सोबत होते."

"विसर्जनाला इतका विलंब झाला, कारण आम्ही विसर्जनस्थळी नेहमीपेक्षा उशिराने पोहचलो आणि भरतीची वेळ होती. समुद्राच्या लाटा जबरदस्त होत्या. तिथे कोळी बांधवही होते. तेही म्हणाले की, खूप लाटा येत आहेत. केवळ भरती असल्यानं आम्हाला अडचणी आल्या," असंही सुधीर साळवी यांनी सांगितलं.

समाज माध्यमांतून टीका

लालबागच्या राजाचे विसर्जन अनेक तास रखडल्यानं समाज माध्यमांवरही तीव्र प्रतिक्रिया येत आहेत.

यावेळी कोणी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केल्या, तर कोणी मंडळावर सडकून टीका केली.

Getty Images

गुजरातहून तराफा आणला आणि कोळी बांधवांना मात्र डावललं अशा प्रतिक्रियाही समाज माध्यमांवर येत आहेत. यावर स्वतः कोळी बांधवांकडून प्रतिक्रिया समोर आल्यानं नागरिकांनीही गुजरातचा तराफा आणल्यावरून मंडळावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

मात्र, मंडळानं गुजरातहून तराफा आणल्याचा आरोप फेटाळला. तसेच तराफा गुजरातचा नसून ठाण्याच्या कंपनीकडून घेतल्याचं म्हटलं आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

  • गणेशोत्सव कुणी सुरू केला? लोकमान्य टिळक की भाऊ रंगारी?
  • या गणेशमूर्ती प्रत्येकाचं लक्ष वेधून घेतात, एकाच ठिकाणी आहेत 6000 गणेश मूर्ती
  • गणपतीला आवडणाऱ्या मोदकाच्या 'या' रंजक गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.